आशुतोष शिर्के / रश्मी पटवर्धन
आज कायदा हा केवळ राष्ट्रीय चौकटीत मर्यादित राहिलेला नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवहार, डिजिटल डेटाचे सीमापार वहन, पर्यावरणीय संकटे, किंवा मानवी हक्कांचे प्रश्न. हे सर्व एका देशा पुरते मर्यादित नसतात. त्यामुळे कायद्याची भाषा, संकल्पना आणि व्यवहार हळूहळू जागतिक होत आहेत. आंतरराष्ट्रीय करार, व्यापार नियम, डेटा संरक्षण कायदे आणि मध्यस्थी यंत्रणा यांचा प्रभाव प्रत्येक देशाच्या कायद्यावर पडताना दिसतो.
या बदलत्या वास्तवात परदेशातील एल.एल.एम. सारख्या अभ्यासक्रमाचे स्वरूप “उच्च शिक्षणातील पदवी” असे राहिलेले नाही. “जागतिक कायदेव्यवस्था” काय असू शकते, कशी विकसित होत आहे ह्या गोष्टींची ओळख करून देणार्या आणि त्यामधील नव्या प्रयोगांच्या संधी देणार्या प्रयोगशाळा झाल्या आहेत. अमेरिका, युनायटेड किंगडम, सिंगापूर या देशांमधील आंतरराष्ट्रीय लॉ- स्कूल्स ही केवळ यातील शिक्षण देणारी केंद्रे नाहीत, तर जागतिक कायद्याच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी देणारी केंद्रे आहेत.
या जागतिक चित्रात आणखी एक निर्णायक घटक प्रवेश करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता. कागदपत्रांचे परीक्षण, करारांचे विश्लेषण आणि प्राथमिक संशोधन अशी कायद्याच्या क्षेत्रातील पारंपरिक कामे आता मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित होत आहेत. यामुळे भविष्यातील वकील हा केवळ माहिती साठवणारा नसून, विश्लेषण करणारा, तंत्रज्ञानाचे आकलन असणारा आणि धोरणात्मक विचार करणारा असणार आहे.
याच कारणामुळे काही नवी क्षेत्रे वेगाने पुढे येत आहेत. डेटा प्रायव्हसी, सायबर कायदा, ए आय आणि टेक्नॉलॉजी कायदा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि मध्यस्थी, पर्यावरणीय कायदा आणि जागतिक धोरण. या नव्या क्षेत्रांमध्ये काम करणार्या व्यावसायिकांना एका देशापुरते मर्यादित राहता येणार नाही. ते जागतिक स्तरावर कार्यरत असणार आहेत.
मात्र, या सगळ्याबरोबरच परदेशी शिक्षणासाठी लागणार्या खर्चाचे कठोर वास्तवही आहेच. परदेशातील शिक्षणाचा खर्च प्रचंड असतो, स्पर्धा तीव्र असते आणि प्रत्येक देशात सरळ वकिली करता येत नाही. त्यामुळे हा निर्णय केवळ परदेशी जाण्याच्या आकर्षणाने घेतला, तर तो दिशाभूल करणारा ठरू शकतो.
पवित्रा पोट्टाला : समतेच्या शोधात चंद्रपूर ते एडिनबर्ग
चंद्रपूरमध्ये उत्तम मार्क मिळवून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पवित्रा पोट्टाला हिने २०१८ मध्ये CLAT परीक्षा उत्तीर्ण करून महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिवर्सिटी, औरंगाबाद येथे बी.ए. एलएल.बी. साठी प्रवेश मिळवला.
पवित्राच्या कुटुंबासाठी शिक्षण हे केवळ करिअरचं साधन नव्हतं, तर समाजात सन्मान मिळवण्याचा मार्ग होता. अनुसूचित जातीतील आणि सामाजिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमी असलेली पवित्रा ही त्यांच्या कुटुंबातील पहिल्या पिढीतील शिक्षण घेणारी मुलगी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा खोल प्रभाव तिच्या कुटुंबावर आहे. “शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे,” ही शिकवण तिच्या प्रवासाला दिशा देणारी ठरली. मोठ्या भावाला परदेशात शिक्षणासाठी मदत करताना तिच्या मनातही त्या दिशेने जाण्याची प्रेरणा निर्माण झाली.
२०२४ मध्ये तिला महाराष्ट्र शासनाची ‘राजर्षी शाहू महाराज परदेश शिक्षण शिष्यवृत्ती’ मिळाली आणि त्याअंतर्गत तिने युनायटेड किंगडममधील University of Edinburgh येथे आंतरराष्ट्रीय कायद्यात एलएलएमसाठी प्रवेश घेतला.
युके मधील शैक्षणिक अनुभवाबद्दल पवित्रा म्हणते, “एडिनबर्ग विद्यापिठातील शैक्षणिक वातावरण माझ्यासाठी पूर्णपणे वेगळं होतं. भारतात आम्ही विद्यार्थी स्पून-फीडिंग अभ्यास पद्धतीला सरावलेले असतो, मात्र एडिनबर्गमध्ये स्वअभ्यासाचं खरं महत्त्व मला समजलं. सखोल वाचन, चिकित्सक विचार, स्वतःची मते मांडणे, सहाध्यायीशी तसेच प्राध्यापकांशी नम्रपणे असहमती व्यक्त करणे ईत्यादि गोष्टींवर आधारित शिक्षणप्रक्रियेमुळे माझ्यात बौद्धिक आत्मविश्वास निर्माण झाला. वर्गात मत मांडताना विद्यार्थ्याच्या सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमीपेक्षा त्याची युक्तिवाद करण्याची ताकद महत्त्वाची मानली जात होती. या वातावरणात मला शैक्षणिक स्वातंत्र्य आणि समतेचा खरा अनुभव मिळाला.
या अनुभवामुळे माझ्या अनेक भीती दूर झाल्या आणि स्वतःचा स्वतंत्र कायदेशीर दृष्टिकोन विकसित करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.” पदव्युत्तर शिक्षणादरम्यान तिने सार्वजनिक आंतरराष्ट्रीय कायदा, आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा, मानवी हक्क, मानवतावादी कायदा आणि जागतिक अन्नपुरवठा साखळीतील शाश्वतता या विषयांचा अभ्यास केला. या अभ्यासातून तिला समजलं की आजचे कायदेशीर प्रश्न हे केवळ न्यायालयीन मर्यादेत राहत नाहीत, तर ते जागतिक असमानता, कॉर्पोरेट जबाबदारी, पर्यावरण संरक्षण, कामगार हक्क आणि वंचित घटकांच्या संरक्षणाशी थेट जोडलेले आहेत.
पुढील वाटचालीबद्दल ती म्हणते, “ही शिष्यवृत्ती माझ्यासाठी केवळ संधी नाही, तर जबाबदारी आहे. सार्वजनिक पैशातून मिळालेलं हे शिक्षण भारतात उपयोगात आणणं मला महत्त्वाचं वाटतं.”
