आशुतोष शिर्के, रश्मी पटवर्धन
‘‘कोणत्या शाखेला जगामध्ये सर्वाधिक स्कोप आहे?’’ विद्याथ्र्याची आवड, जिज्ञासा आणि नैसर्गिक क्षमता बाजूला ठेऊन आपण हा प्रश्न विचरतो. भविष्यात जास्त संधी मिळतील, असे वाटणार्या अभ्यासक्रमांची निवड भारतीय विद्यार्थी आणि पालकांकडून केली जाते. पण जगातील अनेक अग्रगण्य विद्यापीठे या प्रश्नाकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहतात.
परदेशातील विद्यापीठे आणि समाज-मानसातही पदवी म्हणजे आयुष्यभर एका करिअरमध्ये स्वत:ला बंद करून घेणे नसते. पदवी म्हणजे एखाद्या आवडत्या विषयाच्या अभ्यासाचा भक्कम पाया तयार करणे. त्या पायावर उभे राहून विद्यार्थी पुढे अनेक नवीन ज्ञानशाखांमध्ये प्रवेश करू शकतो. म्हणूनच परदेशातील विद्यापीठांमध्ये आता इंटरडिसिप्लिनरी आणि कन्व्हर्जन मास्टर्ससारख्या संकल्पना मोठ्या प्रमाणावर विकसित झाल्या आहेत.
उदाहरणार्थ, जीवशास्त्राचा विद्यार्थी पुढे बायोइन्फॉर्मेटिक्स, पब्लिक हेल्थ, न्यूरोसायन्स किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये जाऊ शकतो. इतिहासाचा विद्यार्थी पब्लिक पॉलिसी, आंतरराष्ट्रीय संबंध किंवा जर्नालिझमची वाट निवडू शकतो. गणिताचा विद्यार्थी डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा फायनान्समध्ये, तर मेकॅनिकल इंजिनीअर रोबोटिक्स, प्रॉडक्ट डिझाइन, इले्ट्रिरक वाहन तंत्रज्ञान किंवा बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पुढे जाऊ शकतो. अशा बदलांना परदेशातील विद्यापीठे प्रोत्साहन देतात, कारण त्यांना शाखेपेक्षा विद्याथ्र्याची बौद्धिक क्षमता आणि शिकण्याची तयारी अधिक महत्त्वाची वाटते.
अर्थात वैद्यकीय शिक्षण, दंतवैद्यक किंवा काही परवानाधारित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आवश्यक असते. मात्र बहुतेक नव्या ज्ञानशाखांमध्ये विद्यार्थ्याने पदवीच्या काळात विकसित केलेली जिज्ञासा, संशोधन, प्रकल्प, इंटर्नशिप आणि नवी कौशल्ये यांना अधिक महत्त्व दिले जाते. त्याने पदवी करताना कोणता विषय निवडला होता यावरून त्याच्या पुढच्या निवडीवर निर्बंध घातले जात नाहीत.
भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये मात्र अकरावीपासूनच विज्ञान, वाणिज्य किंवा कला असे कप्पे तयार केले जातात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वाटते की एकदा शाखा निवडली की आयुष्यभर त्याच मार्गाने जावे लागेल. अनेक भारतीय विद्यार्थी इतिहास, भूगोल, भाषा, जीवशास्त्र, नागरिक शास्त्र असे त्यांचे आवडते विषय केवळ त्यात काही स्कोप मिळणार नाही ह्या कल्पनेनेचं सोडून देतात. पण जागतिक विद्यापीठे याकडे अतिशय वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. भक्कम पाया एका आवडत्या विषयात तयार करा. आणि पुढे गरजेनुसार कोणत्याही नवीन ज्ञानशाखांमध्ये झेप घ्या असे या शिक्षण-व्यवस्थांचे म्हणणे असते.
म्हणूनच जगातील अनेक विद्यापीठे विद्यार्थ्यांना प्रथम एका विषयाच्या प्रेमात पडू देतात. कारण आवडीतून जिज्ञासा जन्माला येते, जिज्ञासेतून कौशल्ये विकसित होतात आणि एक्स्केलन्स तयार होतो. आणि तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये जेंव्हा उत्कृष्ट होता तेंव्हा त्या बळावर अनेक नवीन ज्ञानविश्वांची दारे तुमच्यासाठी उघडतात. म्हणूनच पदवी ही शेवट नसते, ती स्वत:ला नव्याने घडवण्याच्या आयुष्यभर चालणार्या प्रवासाची सुरुवात असते हे लक्षात ठेवले पाहिजे.
इतिहासातून जागतिक सुरक्षा विश्लेषणापर्यंत
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून दहावीत ९४ टक्के गुण मिळाल्यानंतर अथर्व देसाईने विज्ञान किंवा अभियांत्रिकीची वाट न निवडता कला शाखेची निवड केली. फर्ग्युसन महाविद्यालयात इतिहासाचा अभ्यास करताना त्याचा विशेष ओढा ‘विचारांचा इतिहास’ (हिस्टरी ऑफ आयडियाज) या विषयाकडे होता. मात्र भारतात या विषयात पुढील शिक्षणाच्या संधी मर्यादित असल्याने त्याने परदेशातील विद्यापीठांचा अभ्यास सुरू केला.
त्यातून त्याची निवड युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम येथे आंतरराष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थकारण या विषयांच्या संगमावर आधारित पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी झाली. या अभ्यासक्रमात समकालीन युद्ध, गुप्तचर व्यवस्था, दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संबंधांचे सिद्धांत, राजकीय अर्थकारण आणि परिमाणात्मक संशोधन पद्धतींचा सखोल अभ्यास होता. त्याला विद्यापीठाची प्रतिष्ठेची ‘डेव्हलपिंग सोल्युशन्स मास्टर्स स्कॉलरशिप’ मिळाली. शिक्षणादरम्यान त्याच्या संशोधन निबंधाची प्राग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली. आज अथर्व जागतिक राजकारण, युरोपमधील सुरक्षा घडामोडी, चीनची धोरणे, गुप्तचर विश्लेषण आणि भू-राजकीय जोखमींचे विश्लेषण करणार्या क्षेत्रात नेतृत्वाच्या भूमिकेत कार्यरत आहे. विविध देशांतील राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा घडामोडींचे विश्लेषण करून उद्योगजगताला धोरणात्मक सल्ला देणार्या आंतरराष्ट्रीय गटाचे तो नेतृत्व करतो. संशोधन, लेखन आणि विश्लेषण या तीनही क्षेत्रांत त्याने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अथर्वचा प्रवास एक महत्त्वाचा संदेश देतो. पदवीचा विषय आवडता असेल तर तो करिअरची मर्यादा ठरत नाही. तो विचार करण्याची पद्धत घडवतो. इतिहासाच्या अभ्यासाच्या भक्कम पायावर उभे राहून त्याने राजकारण, अर्थशास्त्र, सुरक्षा अभ्यास, संशोधन पद्धती आणि डेटा विश्लेषण यांची जोड दिली. आजच्या जगात यश हे एका शाखेत अडकण्यात नाही, तर विविध ज्ञानशाखांना जोडण्याच्या क्षमतेत आहे.
mentorashutosh@gmail.com
(लेखक करिअर समुपदेशक आहेत.)
