आर्ट्स, कॉमर्स, सायन्सपासून ते इंजिनीअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चरपर्यंत कोणत्याही शाखेतील पदवीनंतर एमबीए करण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. देशातील २१ इंडियन इ्स्टिटट्यूट ऑफ मॅनेजमेंट, आयआयटी मुंबईसह ६ आयआयटी, जमनालाल बजाजपासून वेलिंगकर, के. जे. सोमय्यापर्यंत शेकडो नावाजलेल्या मॅनेजमेंट संस्थांमधील प्रवेशासाठी देशपातळीवर कॅट नावाची परीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये आहे. जाहिरात येत्या काही दिवसांत प्रसिद्ध होईल. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, सोलापूर अशा अनेक शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल.

या दोन तासांच्या संगणकीय परीक्षेत तीन विभाग असतील. प्रत्येक विभागाला ४० मिनिटांचा वेळ असेल. एक सेक्शन क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवर असेल, ज्यामध्ये ६६ गुणांसाठी २२ प्रश्न असतील. दुसरा सेक्शन लॉजिकल रिझनिंग व डेटा इंटरप्रिटेशनवर असेल, ज्यामध्ये ६६ मार्कांसाठी २२ प्रश्न असतील, तर तिसरा सेक्शन व्हर्बल ॲबिलिटी व लॅंग्वेज कॉ्प्रिरहेन्शनवर असेल, ज्यामध्ये ७२ गुणांसाठी २४ प्रश्न असतील. प्रत्येक बरोबर उत्तराला तीन गुण मिळतील, तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल. परीक्षा नोव्हेंबरमध्ये आणि निकाल डिसेंबरमध्ये जाहीर होईल. कॅट स्कोअरवर प्रवेश देणार्‍या विविध संस्था प्रवेशासाठीची जाहिरात प्रसिद्ध करतात. काही संस्थांच्या जाहिराती कॅट रिझल्टच्या आधीही प्रसिद्ध होतात. विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीच्या संस्थांच्या जाहिरातींकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

संस्थेकडे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे शॉर्टलिस्टिंग संस्था कॅट स्कोअरच्या आधारे करते. अशा निवडलेल्या विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशन व मुलाखतीसाठी संस्था बोलावते व त्यातील गुणवत्तेच्या आधारे अंतिम प्रवेश दिला जातो. प्रत्येक संस्थेत अर्ज करण्यापेक्षा आपल्या कॅट स्कोअरच्या आवाक्यात असणार्‍या संस्थांमध्ये अर्ज करणे गरजेचे आहे. बँकिंग मॅनेजमेंटमध्ये एमबीए देणारी देशातील एकमेव सरकारी संस्था नॅशनल इ्स्टिटट्यूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंट किंवा इन्शुरन्स मॅनेजमेंटमध्ये एमबीए देणारी देशातील एकमेव सरकारी संस्था नॅशनल इन्शुरन्स ॲकॅडमी अशा प्रकारच्या विविध वेगळ्या संस्थांची माहिती विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे.

एमबीए करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी लक्षात घेण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी

  • अशा एमबीए संस्थेमध्ये प्रवेश मिळवला पाहिजे की ज्या संस्थांकडे भरपूर कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी येतात आणि गेल्या ४-५ वर्षांचा प्लेसमेंट रेकॉर्ड उत्तम आहे.
  • यामध्ये किती टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली, याबरोबरच कमीतकमी पगार / सरासरी पगार / जास्तीत जास्त पगार यांची माहिती मिळवणे गरजेचे आहे.
  • ज्या संस्था विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देतात, त्यांना पसंती देणे आवश्यक आहे.
  • अशा एमबीए संस्थांमध्ये प्रवेश हवा असेल तर कॅट प्रवेश परीक्षेत उत्तम कामगिरी करणे अत्यावश्यक आहे.
  • कॅट प्रवेश परीक्षा ही पहिली पायरी आहे. त्यातून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशन व इंटरव्ह्यूला सामोरे जावे लागते. त्यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्याची गरज असतेच, पण त्याचबरोबरीने बिझनेस / अर्थशास्त्र, चालू घडामोडी यांचे भरपूर वाचन करणे गरजेचे आहे.
  • यासाठीची तयारी तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.
  • एमबीएमध्ये फायनान्स, मार्केटिंग, एचआर अशा पारंपरिक शाखांबरोबरच आता डिजिटल मार्केटिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट, आयटी मॅनेजमेंट, हेल्थकेअर मॅनेजमेंट, फार्मास्युटिकल मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिझनेस अशा अनेक शाखा उपलब्ध झाल्या आहेत. या शाखांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी पसंतीचा अर्ज भरणे आवश्यक आहे.

vkvelankar@gmail.com
(लेखक बीई, एमबीए असून गेली
२५ वर्षे करिअर मार्गदर्शन करतात.)