आशुतोष शिर्के,  रश्मी पटवर्धन
संशोधनाची सुरुवात योग्य प्रश्न विचारण्यापासून होते. निरीक्षण करणे, गृहीतक मांडणे, प्रयोग आखणे, विश्लेषण करणे आणि निष्कर्षांची पडताळणी करणे ही संशोधनाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा अनुभव खरे तर विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून मिळायला हवा पण तो फारच सीमित असतो.

अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण, व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट क्षेत्र…  भारतीय समाजात करिअरचा विचार बहुतेकदा याच परिचित पर्यायांभोवती फिरतो. चांगले गुण मिळवा, प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळवा आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर व्हा. या आकांक्षांमध्ये गैर काहीच नाही. पण या वाटांपलीकडेही करिअरचे एक अफाट जग आहे. तुम्ही वैज्ञानिक होऊ शकता, संशोधक होऊ शकता, जगाला अजून माहीत नसलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकता, ही शक्यता आपण मुलांसमोर किती वेळा मांडतो?

आपल्या शिक्षणव्यवस्थेत विज्ञान शिकवले जाते, पण वैज्ञानिक कसे व्हायचे, याची ओळख किती विद्यार्थ्यांना होते? परीक्षेत फक्त योग्य उत्तर देण्याला महत्त्व असते. संशोधनाची सुरुवात मात्र योग्य प्रश्न विचारण्यापासून होते. निरीक्षण करणे, गृहीतक मांडणे, प्रयोग आखणे, पुरावे गोळा करणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि निष्कर्षांची पडताळणी करणे ही संशोधनाची प्रक्रिया आहे. त्यात अपयश येते, आधीचे निष्कर्ष चुकीचे ठरतात आणि पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. या प्रक्रियेचा अनुभव खरे तर विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून मिळायला हवा पण तो फारच सीमित असतो हेच आपल्याकडील वास्तव आहे.

या पलीकडे जाण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनाच त्यातून मार्ग काढावा लागेल. चांगले विज्ञान शिक्षक यामध्ये सहाय्यभूत ठरू शकतील. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनांत सहभागी व्हावे, स्वत:चे प्रकल्प तयार करावेत आणि परिसरातील पाणी, प्रदूषण, कचरा किंवा शेतीविषयक समस्यांचा अभ्यास करावा. केवळ माहिती गोळा करून नमुना तयार करण्यापेक्षा एखादा प्रश्न निवडून त्याची उत्तरे पुराव्यांच्या आधारे शोधण्याचा प्रयत्न करावा. पुढे वैज्ञानिक व्याख्याने, परिसंवाद, उन्हाळी संशोधन कार्यक्रम आणि महाविद्यालयीन संशोधन प्रशिक्षणाच्या संधींचा शोध घ्यावा. आयआयएसईआर, आयआयएससी आणि आयआयटी यांसारख्या संस्थांमधील सुट्टीमधील विशेष संधींची माहिती घ्यावी.

पदवीच्या काळात प्राध्यापकांशी संपर्क साधावा, संशोधन लेख वाचावेत, प्रयोगशाळेतील प्रकल्पांत सहभागी व्हावे आणि आपल्या कामाचे अहवाल व सादरीकरणे तयार करावीत. इन्स्पायर-मॅनक योजनेसारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पनांना प्रोत्साहन देतात. परदेशातील अनेक संशोधनाभिमुख विद्यापीठे विद्यार्थ्यांना पदवीच्या काळातच संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव देतात. उदाहरणार्थ, अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इ्स्टिटट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथील अंडरग्रॅज्युएट रिसर्च अपॉच्र्युनिटीज प्रोग्राम या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रकल्पांत सहभागी होऊ शकतात.

अशा अनुभवातून संशोधनाचे नियोजन, माहितीचे विश्लेषण आणि निष्कर्ष मांडण्याची कौशल्ये विकसित होतात. काही प्रकल्पांत मानधन किंवा शैक्षणिक गुणांची संधीही असते. मात्र, संधी आणि आर्थिक मदतीच्या अटी प्रकल्पानुसार बदलतात.

संशोधनाकडे जाण्याचा एकच मार्ग नाही. मूलभूत विज्ञानातील पदवी, संशोधनाची संधी देणारे पदवी अभ्यासक्रम, प्रबंध-आधारित पदव्युत्तर शिक्षण आणि पीएच.डी. असे अनेक पर्याय आहेत. विद्यापीठ निवडताना केवळ जागतिक क्रमवारी न पाहता संबंधित विषयातील प्राध्यापक, प्रयोगशाळा, संशोधन प्रकल्प आणि आर्थिक मदतीच्या शक्यता तपासाव्यात. परदेशात जाणे ही संशोधनाची सुरुवात असण्याची गरज नाही. त्या आधी भारतातही संशोधनाच्या संधी शोधता येतात.

समाजाने लोकप्रिय केलेल्या करिअरच्या पर्यायांनाच स्वत:च्या स्वप्नांची मर्यादा बनवू नका. कर्करोगापासून हवामानबदलापर्यंत, शेतीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत जगासमोर असंख्य अनुत्तरित प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी नव्या संशोधकांची गरज आहे. वैज्ञानिक होण्याचे स्वप्न केवळ मनात ठेवू नका.  त्यासाठी लागणारी जिज्ञासा, कौशल्ये आणि संशोधनाची वृत्ती आजपासून विकसित करा. जगाला तुमच्या संशोधन क्षमतेची गरज आहे.

प्रयोगशाळेतील कुतूहल ते कर्करोगावरील संशोधन

इ्स्टिटट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी), मुंबई येथून फार्मास्युटिकल सायन्सेसची पदवी घेताना क्षिप्रा घारपुरे यांना प्रयोगशाळेत संशोधन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाली. त्यातूनच बायोटेक्नॉलॉजी या विषयात त्यांना रस वाटू लागला आणि याच विषयात संशोधन करण्याचे क्षिप्राने ठरवले. भारतात अत्याधुनिक संशोधनाच्या मर्यादित संधी लक्षात घेऊन त्यांनी अमेरिकेत पुढील शिक्षण घेण्याचे ठरवले. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ॲट बफेलो येथे त्यांनी बायोटेक्नॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.

पहिल्या वर्षाचा आर्थिक भार कुटुंबाने उचलला. पहिल्या वर्षाच्या उत्तम शैक्षणिक कामगिरीमुळे दुसर्‍या वर्षी अध्यापन सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यातून शिक्षण शुल्कात पूर्ण सवलत आणि विद्यावेतन मिळाले. यानंतर त्यांनी टेक्सासमधील यूटी एमडी अँडरसनझ्र्यूटीहेल्थ ह्युस्टन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस येथे एक्सपेरिमेंटल थेरप्युटिक्स या विषयात पीएच.डी. केली. येथे त्यांनी अंडाशयाच्या कर्करोगावर संशोधन केले.

उपचारानंतरही काही रुग्णांमध्ये कर्करोगाचे अवशेष का राहतात, यासंबंधी एका महत्त्वाच्या प्रक्रियेचा शोध घेण्यात त्यांनी योगदान दिले. क्षिप्रा यांनी या संशोधनावर आधारित सात संशोधनलेखांचे प्रथम लेखन केले, तर इतर २२ संशोधन प्रकाशनांमध्ये सहलेखक म्हणून योगदान दिले. त्यांचे संशोधन नेचर कम्युनिकेशन्स, क्लिनिकल कॅन्सर रिसर्च आणि जर्नल ऑफ क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन यांसारख्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले. कर्करोग संशोधनासाठी अनेक शिष्यवृत्ती आणि विविध परिषदांसाठी प्रवास-पुरस्कारही या दरम्यान मिळाले.

पीएच.डी.नंतर त्याच संस्थेमध्ये क्लिनिकल स्टडीज् को-ऑर्डिनेटर म्हणून एक वर्ष कामाचा अनुभव घेतला. हे काम करताना त्यांना कर्करोगाच्या रुग्णांवरील औषधांच्या चाचण्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. औषधांची परिणामकारकता तपासण्याबरोबरच रुग्णांची सुरक्षितता आणि संशोधनातील नियमांचे पालन किती महत्त्वाचे असते, हे त्यांनी अनुभवले. भारतात परतल्यानंतर डॉ. क्षिप्रा यांनी लुपिन या औषधनिर्मिती कंपनीत नवीन औषधांच्या संधींचे मूल्यमापन करणे, विविध उपचारक्षेत्रांतील वैज्ञानिक साहित्याचा अभ्यास करणे, क्लिनिकल ट्रायल्सच्या नियोजनात योगदान देणे अशा विविध जबाबदार्‍या सांभाळल्या.

पुढे त्यांनी  ‘रेग्युलेटरी आणि सायंटिफिक मेडिकल रायटिंग’च्या क्षेत्रातही काम केले. कोविड-१९विषयी वैज्ञानिक माहिती सोप्या भाषेत समजावून सांगणारे ४० हून अधिक लेखही त्यांनी लिहिले. सध्या त्या ‘मेडरेनोव्हा’ या स्टार्ट-अप मध्ये वैज्ञानिक आणि नियामक कामकाज तसेच प्रकल्प व्यवस्थापनाशी संबंधित नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत.

mentorashutosh@gmail.com (लेखक करिअर समुपदेशक आहेत.)