कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केल्यानंतर एमबीए करण्यासाठी देशातील सर्वोत्तम मॅनेजमेंट संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणार्या ‘सीमॅट’ परीक्षेसंदर्भात जाणून घेऊ…
आर्टस, कॉमर्स, सायन्स पासून ते इंजिनीअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर पर्यंत कोणत्याही शाखेतील पदवीनंतर एमबीए करण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. देशातील जमनालाल बजाज, ख्राईस्ट युनिव्हर्सिटी, डून बिझिनेस स्कूल, एनआयए, पुम्बा , गोवा इ्स्टिटट्यूटपासून ते वेलिंगकर, के. जे. सोमय्यापर्यंत देशातील एक हजार नावाजलेल्या मॅनेजमेंट संस्थांमधील प्रवेशासाठी देशपातळीवर ‘सीमॅट’ नावाची परीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा ७ फेब्रुवारी रोजी घेतली जाईल. येत्या काही दिवसांत या परीक्षेची जाहिरात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव , कोल्हापूर, नांदेड, सोलापूर, ठाणे, यवतमाळ, नवी मुंबईसह अनेक शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. परीक्षा कॉम्प्युटरवर असेल. तीन तासांच्या या परीक्षेत पाच सेक्शन्स असतील. एकूण १०० प्रश्न असतील ज्याला चारशे गुण असतील. प्रत्येक सेक्शनला २० प्रश्न असतील ज्याला ८० गुण असतील. एक सेक्शन क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड व डाटा इंटरप्रिटेशनवर असेल. दुसरा सेक्शन लॉजिकल रिझनिंगवर असेल तर तिसरा सेक्शन व्हर्बल ॲबिलिटी व लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन वर असेल. चौथा सेक्शन सामान्य ज्ञानावर असेल तर पाचवा सेक्शन इनोव्हेशन व उद्योजकतेवर असेल. प्रत्येक बरोबर उत्तराला चार गुण मिळतील तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल.
परीक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल आणि त्याचा निकाल दोन आठवड्यांत जाहीर होईल. सीमॅट स्कोअरवर प्रवेश देणार्या विविध संस्था प्रवेशासाठीची जाहिरात प्रसिद्ध करतात, त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. काही संस्थांच्या जाहिराती सीमॅट रिझल्टच्या आधीही प्रसिद्ध होतात. विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीच्या संस्थांच्या जाहिरातींकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. संस्थेकडे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे शॉर्टलिस्टिंग संस्था सीमॅट स्कोअरच्या आधारे करते, अशा निवडलेल्या विद्यार्थ्यांना ग्रूप डिस्कशन व मुलाखतीसाठी संस्था बोलावते व त्यातील गुणवत्तेच्या आधारे अंतिम प्रवेश दिला जातो. प्रत्येक संस्थेत अर्ज करण्यापेक्षा आपल्या सीमॅट स्कोअरच्या आवाक्यात असणार्या संस्थांमध्ये अर्ज करणे फायद्याचे आहे. इन्शुरन्स मॅनेजमेंटमध्ये एमबीए देणारी देशातील एकमेव सरकारी संस्था नॅशनल इन्शुरन्स ॲकेडमीसारख्या विविध वेगळ्या संस्थांची माहिती विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे.
एमबीए करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी
* ज्या संस्थेकडे भरपूर कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी येतात आणि गेल्या ४-५ वर्षांचे प्लेसमेंट रेकॉर्ड उत्तम आहे, अशा एमबीए संस्थेमध्ये प्रवेश मिळवला पाहिजे.
* यामध्ये किती टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली याबरोबरच कमीतकमी पगार / सरासरी पगार / जास्तीत जास्त पगार यांची माहिती मिळवणे गरजेचे आहे.
* ज्या संस्था विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देतात त्यांना पसंती देणे आवश्यक आहे.
* अशा एमबीए संस्थांमध्ये प्रवेश हवा असेल तर सीमॅट प्रवेश परीक्षेमध्ये उत्तम कामगिरी करणे अत्यावश्यक आहे.
* सीमॅट प्रवेश परीक्षा ही पहिली पायरी आहे, त्यातून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशन व इंटरव्ह्यूला सामोरे जावे लागते, ज्यात इंग्रजी संभाषण कौशल्याची गरज असतेच पण त्याचबरोबरीने बिझनेस/ अर्थशास्त्र, चालू घडामोडी यांचं भरपूर वाचन करणे गरजेचे आहे.
* यासाठीची तयारी तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.
* एमबीए मध्ये फायनान्स, मार्केटिंग, एचआर अशा पारंपरिक शाखांबरोबरच आता डिजिटल मार्केटिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट, आयटी मॅनेजमेंट, हेल्थकेअर मॅनेजमेंट, फार्मास्युटिकल मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिझनेस अशा अनेक शाखा उपलब्ध झाल्या आहेत. या शाखांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी पसंती अर्ज भरणे आवश्यक आहे.
vkvelankar@gmail.com
(लेखक बीई, एमबीए असून गेली २५ वर्षे करिअर मार्गदर्शन करतात.)
