परदेशातील विद्यापीठांची तयारी ही संपूर्ण प्रक्रिया मुळातच तणावात्मक आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांचा अकरावी बारावीचा व्याप सांभाळत करणे म्हणजे त्या तणावात आणखी भर पडण्यासारखे आहे, हे पालकांनी लक्षात घ्यावे. एकंदरीत, या विद्यापीठांची अर्जप्रक्रिया भारतातल्या विद्यापीठांच्या अर्जप्रक्रियेसारखी सरळ सोपी नाही. गुंतागुंतीची असलेली ही प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून अमेरिकेतील विद्यापीठांकडून वापरला गेलेला एक चांगला पर्याय म्हणजे कॉमन अॅप. कॉमन अॅप म्हणजेच कॉमन अॅप्लिकेशन. हो, सर्व विद्यापीठांना एकच समान अर्ज. अर्थात काही गोष्टी प्रत्येक विद्यापीठाच्या प्रवेश निकषांनुसार बदलतात, जसे की प्रत्येक विद्यापीठांचे वेगवेगळे निबंध ( Essay Questions) असतात. मात्र हे निबंध ( Essays) कॉमन अॅपवरून पूर्ण करून विद्यापीठाला जमा करता येतात. कॉमनअॅपवरील अर्ज अमेरिकेतील एक हजार पेक्षाही अधिक विद्यापीठे स्वीकारतात.
कॉमन अॅप या प्लॅटफॉर्मची www. commonapp. org ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्याने त्याचे अकाउंट तयार करावे. लॉगिन केल्यावर त्याला एकूण पाच पर्याय किंवा टॅब्स दिसतील- डॅशबोर्ड, माय कॉलेजेस, कॉमनअॅप, कॉलेज सर्च आणि फायनान्शियल एड. या पर्यायांच्या नावावरूनच ते कशाबद्दल आहेत हे कळतं.
● डॅशबोर्ड :
डॅशबोर्डवर विद्यार्थ्याने नोवादलेल्या सर्व विद्यापीठांची यादी दिसते. तसेच तिथेच ‘ application requirement’ नावाची एक टॅब आहे त्यावर क्लिक केल्यास विद्यार्थ्याने निवडलेल्या सर्व विद्यापीठांची तुलनात्मक यादी दिसेल.
● माय कॉलेजेस :
‘माय कॉलेजेस’ ह्या टॅबवर क्लिक केल्यास विद्यार्थी अमेरिकेतील सर्व विद्यापीठांची यादी व त्यांच्या प्रवेशाचे निकष पाहू शकतात. त्या सर्व विद्यापीठांमधून विद्यार्थ्याने ठरवलेली (किंवा त्याची आवडती) अशी जास्तीत जास्त २० विद्यापीठे तो/ती आपल्या डॅशबोर्डवर पाहू शकतो/शकते.
२०२५ मध्ये विविध विद्यापीठांना अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या कॉमन अॅप अकाऊंटवरील विद्यापीठांची यादी.
● कॉमन अॅप :
कॉमन अॅपवर ‘कॉमन अॅप’ नावाचा एक टॅब आहे ज्यामध्ये विद्यार्थ्याला त्याची स्वत:ची प्रोफाइल तयार करायची आहे. या विभागामध्ये विद्यार्थ्याला स्वत:बद्दल, त्याच्या कुटुंबियांबद्दल, त्याच्या आवडीनिवडी व छंद, तसेच अभ्यासेतर उपक्रम आणि त्याला मिळालेली बक्षिसे व पुरस्कार इत्यादी सर्व गोष्टींबद्दल माहिती देता येईल. कॉमन अॅपवर दिलेल्या प्रश्नांच्या मदतीने विद्यार्थ्याला स्वत:बद्दल चांगल्या प्रकारे ही माहिती लिहिता येते. एसओपीमध्ये शब्दांची मर्यादा विद्यापीठाने घालून दिलेली असते. त्यामुके दिलेल्या शब्दमर्यादेमध्ये अनेकदा विद्यार्थ्याला त्याच्याबद्दल किंवा त्याच्या यश-अपयशाबद्दल विस्तृतपणे लिहीता येत नाही. तर कॉमन अॅपने दिलेली ही अतिरिक्त सुविधा विद्यार्थ्यांनी योग्यप्रकारे वापरायला हवी. कॉमन अॅपच्या या सुविधेचा वापर प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:बद्दल देता येईल तेवढी माहिती विद्यापीठाला देण्यासाठी करायला हवा. विद्यापीठाला तुमच्याबद्दल जेवढी जास्त माहिती मिळेल, तुमच्यासाठी तेवढा योग्य निर्णय करण्यासाठी त्यांना मदत होईल. कारण विद्यापीठे जेव्हा तुम्हाला प्रवेश देतात तेव्हा ती फक्त तुमचे शैक्षणिक गुणवत्ता, कट ऑफ स्कोअर किंवा तुम्ही मिळवलेली बक्षिसे व पुरस्कार पाहत नाहीत तर त्या वर्षीच्या त्या वर्गामध्ये तुम्ही किती फिट आहात तेदेखील तपासतात आणि मगच तुम्हाला प्रवेश देतात.
● कॉलेज सर्च :
या टॅबमध्ये अमेरिकेतील जवळपास ११०० विद्यापीठ/महाविद्यालयांची यादी तुम्हाला पाहायला मिळेल. या विद्यापीठांच्या यादीमधील तुमच्या आवडीच्या विद्यापीठ/महाविद्यालयांचा समावेश तुम्ही ‘माय कॉलेजेस’च्या यादीत करू शकता.
● फायनान्शियल एड :
कॉमन अॅपवर विद्यापीठांची अर्ज भरताना, फी वेव्हर व शिष्यवृत्तीबद्दलदेखील तुमचे प्राधान्यक्रम तुम्हाला निवडावे लागतात. त्याबरोबरच फायनान्शियल एड म्हणजेच आर्थिक मदतीच्या विविध पर्यायांबद्दल- ग्रँट्स, स्कॉलरशिप्स, फेलोशिप्स, ट्युशन वेव्हर, शैक्षणिक कर्ज, वर्क-स्टडी म्हणजेच ऑन कॅम्पस जॉब्स या गोष्टींबद्दल माहिती येथे तुम्हाला मिळू शकते.
त्याबरोबरच तुम्ही निवडलेल्या विद्यापीठांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या वेबसाईटची थेट लिंक तुम्हाला येथे मिळेल. आर्थिक मदतीसाठी कसा अर्ज करावा याबद्दलही मार्गदर्शन या टॅबवर केलेले आहे.
विद्यार्थ्यांसाठी…
● अंतिम मुदतीपर्यंत थांबू नका लवकरात लवकर अर्ज करा.
● कॉमन अॅपमधील Application Requirement या टॅबवर जाऊन तुम्ही निवडलेल्या सर्व कॉलेजेस वा विद्यापीठांच्या प्रवेशाच्या निकषांची तुलना करू शकता.
● निबंधांची ( Essays) उत्तरे जरी जमा केलेली असली तरी अंतिम अर्ज जमा करण्यापूर्वी कधीही डॅशबोर्डला जाऊन ती उत्तरे बदलता येतात.
theusscholar@gmail. com