श्रीराम गीत
काही मुले किंवा मुली सुद्धा अलीकडे स्पष्टपणे आल्या आल्या सांगतात, ‘‘मला काहीही शिकले तरी सुद्धा धंदाच करायचा आहे. नोकरीत पाटय़ा टाकण्याची इच्छा नाही. मला खूप खूप पैसा मिळवायचा आहे. त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का?’’




अशावेळी हे सारे आपल्या मुलांच्या तोंडून ऐकताना पालकांचा चेहरा थोडासा पडलेला असतो किंवा गडबडलेला असतो. फारच क्वचित एखादे पालक कौतुकाने आपल्या मुलांकडे नजर टाकतात. पण त्या कौतुकामध्ये जे मला जमले नाही, जे करावे वाटत होते ते आता आपले चिरंजीव करायला निघाले आहेत एवढाच भाव असतो. लोकसत्ता मुख्यता मराठी माणूस वाचतो. बहुसंख्य मराठी माणसांना धंदा जमत नाही असा एक कायम सूर विविध जाणकारांकडून लावला जात असतो. या सगळय़ातला विनोदाचा सूर सोडला तरी तथ्य थोडेफार असतेच. असे सांगणाऱ्या मुलांना मी मग एकच प्रश्न विचारतो, ‘‘कोणता धंदा तुला करावासा वाटतो?’’
यावरचे उत्तर मात्र खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षण करायला लावणारे आणि गंभीर असते. ‘‘तेच तर तुम्ही सांगा ना, ते तुम्ही सांगणार आहात म्हणून तर मी आलोय तुमच्याकडे.’’
सूज्ञ वाचकांना या सगळय़ा संभाषणाचा मतितार्थ सांगायची अजिबात गरज नाही. कोणताही व्यवसाय, धंदा, उत्पादन तयार करणे किंवा त्याची विक्री करणे, विविध मालाची उलाढाल करणे, विविध पद्धतीच्या सेवा देणे, विक्री पश्चात सेवा देणे, एखाद्या मोठय़ा कंपनीची फ्रेंचाईजी घेऊन मोठय़ा स्वरूपाचा व्यवसाय करणे इतक्या विविध अंगाने हा सारा पसारा मांडता येतो. या प्रत्येकात प्रचंड स्पर्धा असतेच असते.
पण मला धंदा करायचा आहे असे म्हणणाऱ्या मुलाला यातील कोणत्याच बाबींबद्दल माहितीच नसेल तर? या साऱ्या संदर्भात मी एक वाक्य माझ्या लहानपणापासून ऐकत आलो आहे आणि तेच मी इतरांनाही सांगत आलो आहे. दुसऱ्याच्या पैशाने धंदा करायला शिकायचा. म्हणजेच उमेदवारी करताना धंदा समजून घ्यायचा. मग भांडवलाची व्यवस्था करून वयाच्या २८ व्या वर्षी स्वत:चा धंदा सुरू करायचा. थोडक्यात पदवी घेतली एकविसाव्या वर्षी, नंतर पाच ते सहा वर्षे उमेदवारी करून धंदा शिकण्यात गेली. या दरम्यान किंवा त्यानंतर भांडवलाची व्यवस्था केली. तर अर्थातच वय होते २८ पूर्ण. अशा पद्धतीत धंद्यामध्ये जरी अपयश आले तरी ते पचवायचे कसे, त्यातून मार्ग काढायचा कसा, हेही शिकून झालेले असते. या पद्धतीत यशस्वी झालेली असंख्य मराठी उदाहरणे आसपास सुद्धा तुम्हाला सहज सापडतील.
पण माझे पप्पा मला पैसे देणार आहेत. धंदा कोणता करायचा ते तुम्ही सांगा. कसा करायचा ते मी ठरवेन. आणि मग मी खोऱ्याने पैसे ओढेन. अशी स्वप्ने पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हा खरा काळजीचा विषय आहे. बारा ते अठरा या वयादरम्यान विविध पद्धतीच्या ऐकीव माहितीवर आधारित स्वप्ने पाहिली जातात. पण अठराव्या वर्षी स्वप्नातून जागे होणारे आयुष्यात यश मिळवायची पायाभरणी करतात हे मात्र नक्की.
सैन्यात शिपाई म्हणून भरती व्हायचे असो किंवा एनडीएमध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून जायचे असो. हेच वय असते. आयआयटीची तीव्र स्पर्धा किंवा मेडिकल प्रवेशासाठीचा कठोर अभ्यास करण्याचेही हेच वय असते.
मग प्रत्येक शहरात याआधी उल्लेख केलेले विविध धंदे करणाऱ्यांशी स्पर्धा करून खूप पैसा मिळवणे असे स्वप्न पाहणाऱ्यांनाही कशात उमेदवारी करायची यावर विचार सुरू करण्यासाठी, जेव्हा मला धंदाच करायचाय पैसेच मिळवायचे आहे असं मनात येतात तेव्हापासून पदवी वेळेपर्यंत हाती पाच सहा वर्षे तर असतातच ना? थोडे विनोदाने पण त्या मुलांच्या भाषेतच बोलायचे झाले तर लग्नाचा जोडीदार शोधताना ‘स्टेडी गोइंग रिलेशनशिप’ मध्ये राहायचे म्हणून तीन-तीन वर्षे तुम्ही काढताच ना?
थोडक्यात ही सुद्धा एक तीव्र स्पर्धा असते. त्याची तयारी करायची तर पाच ते सहा वर्षे द्यावी लागतात. नोकरीच्या रॅट रेस पेक्षा ही स्पर्धा जास्त रॅटस् बरोबर खेळायची असते आणि ते सारे विविध आकारमानाचे जानेमाने आणि तरबेज गलेलठ्ठ असतात.