भरतनाट्यम किंवा कथक सारख्या शास्त्रीय नृत्यांमध्ये ठरलेले नियम, हस्तमुद्रा आणि पायर्‍या असतात. पण कंटेम्पररीमध्ये स्वत:ची शैली तयार करण्याची मोकळीक असते.

शास्त्रीय नृत्यप्रकाराइतकाच आधुनिक काळात लोकप्रिय झालेला नृत्यप्रकार म्हणजे समकालीन (कंटेम्पररी) नृत्य. विविध नृत्यशैलींचा संगम असलेला एक मुक्त आणि अभिव्यक्तिपूर्ण नृत्यप्रकार म्हणजे कंटेम्पररी. शास्त्रीय नृत्यासारखी किंवा बॅलेसारखी त्याची विशिष्ट व्याख्या नाही. ते आताच्या काळातले नृत्य आहे.

कंटेम्पररी या नृत्यप्रकारामध्ये इतर बरेच नृत्यप्रकार सामावू शकतात. हा नृत्यप्रकार कोणत्याही ठरावीक नियमांमध्ये अडकलेला नसतो. यात भावना, कथा आणि व्यक्तिमत्त्व व्यक्त करण्यावर भर असतो. कथ्थकचा वापर करूनही कंटेम्पररी करता येते, भरतनाट्यमचा वापर करूनही कंटेम्पररी करता येते. शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली, ज्या कोणत्याही शास्त्रीय नृत्यात बसत नाहीत, पण एक नवीन पद्धतीने त्यात प्रयोग केले जातात. यात शरीराची हालचाल मोकळी असते. या प्रकाराची शैली मिश्र असते. म्हणजे यात बॅले, जॅझ, मॉडर्न डान्स यांचा प्रभाव असतो.

भरतनाट्यम किंवा कथक सारख्या शास्त्रीय नृत्यांमध्ये ठरलेले नियम, हस्तमुद्रा आणि पायर्‍या असतात. पण कंटेम्पररीमध्ये स्वत:ची शैली तयार करण्याची मोकळीक असते.  मी जेव्हा १९९७ मध्ये बुगीवुगी नावाचा रिॲलिटी शो केला, तेव्हा जिम्नॅस्ट असल्यामुळे माझ्या नृत्यप्रकारात कंटेम्पररीची झलक यायची. मी तेव्हा कोणाकडून ते नृत्य शिकले नव्हते. मी कथक शिकत होते. आता मला कळते की ती त्यावेळी जे नृत्य केले त्याला कंटेम्पररी म्हणायचे. भारतात तो नृत्यप्रकार फारसा लोकप्रिय नव्हता. समकालीन नृत्यप्रकार जेव्हा आपल्याकडे आला तेव्हा बाहेरच्या देशांमध्ये ॲक्रोबॅटिक, जिम्नॅस्टिक्सचा वापर जास्त असल्यामुळे त्या नृत्यप्रकारात उड्या, गिरक्या, रोल्सचा वापर जास्त केला जाऊ लागला. ते बघूनबघून आपल्याकडे तो नृत्यप्रकार लोकप्रिय होऊ लागला. विशेषत: रिॲलिटी शोजमुळे हा प्रकार भारतात लोकप्रिय झाला

 मी शिकवणी वर्ग सुरू केले तेव्हा कंटेम्पररीसोबत बॉलिवूडच्या गाण्यांवरील नृत्य बसविण्यास सुरूवात केली. हे करताना मला लक्षात आले की आपल्याकडे गल्लोगली बॉलिवूड गाण्यांवर नृत्य बसवणारे शिकवणी वर्ग आहेत. पण कोणीही योग्य बॉलिवूड शिकवत नाही. कधी त्यात हिपहॉप मधली एखादी स्टेप, कधी सालसामधील एखादी स्टेप घेतली जाते. या सर्वांचे मिश्रण असते. त्यामुळे योग्य पद्धतीने हे डान्स शिकवायचे तेव्हा काय पद्धतीने करायचे याचा विचार करून मी त्याचा एक अभ्यासक्रम बनवला. उभे कसे राहायचे, उडी कशी मारायची, गिरकी कशी घ्यायची. हात उचलायचा आहे तर तो कसा उचलला गेला पाहिजे  या सर्व तांत्रिक बाजू आधुनिक नृत्यातही असतात.

मुलांचा कल पाहणे गरजेचे

मुलांचा कल नृत्याकडे आहे की नाही हे पाहणे गरजेचेच आहे. अनेकदा मुलांपेक्षा पालकांचीच जास्त इच्छा असते की आपल्या मुलाने किंवा मुलीने बॉलिवूड नृत्य केले पाहिजे. शिकवणी वर्गाला गेलेच पाहिजे. पण शिकताना मुलांना मजा येत नसेल तर शिकून उपयोग नाही. माझ्या शिकवणी वर्गांमध्ये मला लक्षात आले की मूल कंटाळत आहे तर मी पालकांना तसे स्पष्ट सांगते की त्याच्या मर्जीविरुद्ध त्याला शिकायला पाठवू नका.

शिकवणी वर्गातील अनेक शारीरिक, मानसिक ॲक्टिव्हिटीज या मुलांना त्यांच्या अभ्यासात किंवा दैनंदिन जीवनात, शाळेत, मित्रांमध्ये वावरताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करत असतात. आपल्याकडे समकालीन नृत्याचे क्लास शामक दावर, टेरेन्स, ॲशली लोबोचे डान्सवर्क्स क्लास आहेत.

माझी मुलगी डान्सवर्क्समध्ये शिकते. माझ्याकडे ती १८ वर्षे शिकत होती. पण मला तिचा कल कळला, तो कंटेम्पररी कडे आहे तेव्हा मी तिला डान्सवर्क्सला पाठवलं. मुलांचा कल बघून त्या त्या स्टाइलमध्ये त्यांना टाकणं गरजेचे आहे. उदाहरणार्थ, माझी आई भरतनाट्यम नृत्यांगणा होती. पार्वतीकुमारांची ती शिष्या होती. पण जेव्हा मी नृत्य करायचं ठरवले, तेव्हा माझा कल पाहून तिने मला भरतनाट्यमऐवजी कथ्थकचेधडे गिरवायला पाठवले कारण मी तुडतुडी होते, माझा जिमॅ्स्टिटककडे कल होता, माझे स्पीन चांगले होते. त्यानुसार मला कथ्थक आवडेल असे ती सुचवले आणि खरेच मला तो प्रकार अधिक भावला.

रिॲलिटी आणि रील्सला भुलू नका

तुम्हाला टीव्हीवर यायचेय, म्हणून त्या वलयाला भुलून परफॉर्म करू नका. ते क्षणिक असते आणि तो आपल्या एकूण करिअरचा एक भाग असू शकतो. तुम्हाला जर नृत्य मनापासून आवडत असेल तरच या करिअरकडे वळा. कलेत तुम्हाला सर्वात आधी ती कला आवडणे आणि त्यात स्वत:त सतत सुधारणा करून एकेक उंची गाठणे आवश्यक आहे. अर्थार्जनासाठी शिकवणीसारख्या गोष्टी करणे अर्थात गरजेचे आहे. ज्या येतील त्या संधी घेत जा, त्यातून तुम्हाला मार्ग मिळत जाईल. रिॲलिटी शो संपतो तेव्हा ते सर्व ग्लॅमर संपलेले असते, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.रिॲलिटी शोमध्ये मुलांना पाठवण्यासाठी पालकच अधिक उत्सुक असतात.

पालकांना मला सांगावेसे  वाटते की तुमच्या हौसेसाठी मुलांना अशा शोज मध्ये पाठवू नका. तेथे परीक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या तर त्यातून मुलांची मानसिकता नकारात्मक होते. त्यातून त्यांनी शिकणे गरजेचे असते. त्यामुळे अशा कार्यक्रमातून केवळ उणे-अधिक शिकायला मिळाले आहे, ते घेऊन त्यांना पुढे जायला शिकवायला हवे.

दुसरे असे की आजकाल रील्स लोकप्रिय झाले आहेत. ३० सेकंदांचे रील टाकण्यासाठी डान्स क्लासला जाऊ नका किंवा ऑनलाइन शिकू नका. वैयक्तिक गुरूकडे जाऊन शिकणेच योग्य आहे असे मला वाटते. नाचाचा बेस तयार व्हायला हवा.

थोडक्यात, नृत्याची मनापासून आवड असेल तर छंदापलीकडे जाऊन त्याचा एक करिअर म्हणून नक्की विचार करता येईल. मात्र त्यासाठी स्वत:ला सतत विकसित करण्यासाठी सातत्य, चिकाटी, धीर हवा. आपला कल, आवड पाहूनच त्यानुसार नृत्यप्रकार निवडून त्यात सातत्यपूर्ण प्रयत्नांनी उंची गाठता येईल.

करिअरची संधी

नृत्याला आता एक वेगळी उंची मिळाली आहे. त्यामुळे त्याकडे केवळ एक छंद म्हणून न पाहता तुम्ही अर्थार्जनाचे साधन म्हणून पाहू शकता.

व्यावसायिक डान्सर

कोरिओग्राफी

•            कॉर्पोरेट इव्हेंट्सचे मॅनेजमेंट

•            सिनेकोरिओग्राफी, नाट्यकोरिओग्राफी करू शकता.

•            स्वत:चे शिकवणी वर्ग चालवू शकता.

•            रिअलिटी शोज, विवाह सोहळे यात क्रिएटिव्ह एंडला काम करू शकता.

फिटनेस आणि  मूव्हमेंट थेरपी

•            बॅले किंवा एखादा ॲक्ट बांधायला लिखाणही करण्याची संधी.

 (लेखिका कथक नृत्यांगना, कोरिओग्राफर आहेत.)