ॲड प्रवीण निकम

लेखमालेच्या मागील काही लेखांपासून पण काही शिष्यवृत्त्यांविषयी माहिती जाणून घेत आहोत. ज्यात काही विशिष्ट अभ्यासक्रम किंवा प्रवर्गाचा तर विचार केलेला आहेच पण त्याच बरोबर काही शिष्यवृत्त्या हे प्रामुख्याने सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्याच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या दिसतात. अर्थात अशा शिष्यवृत्त्यांची निवड प्रक्रिया, अटी-शर्ती किंवा शिष्यवृत्ती देण्यासाठीचे विभाग ठरलेले असले तरी त्या-त्या ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना पंख देण्यासाठीच जाणूनबुजून याबाबत सखोल विचार करत त्या सुरू केल्याचे दिसते. आज पण अशाच एक शिष्यवृत्तीबाबत बोलणार आहोत जी एक सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे.

सायबेज सॉफ्टवेअर प्रा. लिमिटेट कंपनी जी सॉफ्टवेअर क्षेत्रातील नावाजलेली कंपनी आहे, या कंपनीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ( CSR) उपक्रमांची जबाबदारी स्वीकारताना ‘सेवा सुविधा नसलेल्या समुदायांपर्यंत पोहोचणे’ हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन, मानवी प्रतिष्ठेचा विचार करून सामाजिक क्षेत्रातील आपली नैतिकता जपत स्वत:चे एक ब्रीदवाक्य ठरवले ‘आम्ही ज्या समुदायांमध्ये काम करतो त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात सक्रियपणे योगदान देणे’. आणि या वचनाला जागत समाजातील दुर्बल घटकांसाठी एक चांगली, शाश्वत जीवनशैली तयार करणे आणि देशाचा मानवी विकास वाढविण्याच्या उद्देशाने सामाजिक ऋणाची परतफेड करण्यासाठी सामाजिक विकासाशी सुसंगत अशा सायबेज आशा (ऑक्टोबर २००३) आणि cybagekhushaboo खुशबू चॅरिटेबल (जुलै २००९) ट्रस्टची स्थापना करून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा >>> शिक्षणाची संधी : इंडियन नेव्हीमध्येबी.टेक.करण्याची संधी

या उपक्रमांतर्गत अर्थपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक-आर्थिक योजना आखल्या गेल्या ज्याचा उद्देश समाजातील दुर्बल, गरजू, वंचित लोकांच्या उन्नतीसाठी सर्वोतोपरी मदत करणे हा आहे. सायबेज आशा (CybageAsha) चे मुख्य कार्यक्रम ग्रामीण उत्थान, दारू-व्यसनमुक्ती, समाजकल्याण आणि गो-ग्रीन उपक्रम आहेत, तर खुशबू शिष्यवृत्ती कार्यक्रम (cybagekhushaboo scholarship) आणि शैक्षणिक समुपदेशनाद्वारे गरजू विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सुविधा देते. हे परिणामकारक उपक्रम सायबॅगियन्सच्या मदतीने स्वतंत्रपणे राबवले जातात जे त्यांच्या सेवा स्वयंसेवा करतात किंवा सायबेजच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या सक्षम मार्गदर्शनाखाली इतर स्वयंसेवी संस्थांसोबत काम केले जाते.

या खुशबू चॅरिटेबल ट्रस्टने उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी जो एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे त्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर आणि त्यांचा अभ्यास पूर्ण करण्याच्या इच्छेवर अधिक भर दिला गेला आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी पात्रता निकषांचा विचार केला तर –

१. अर्जदार विद्यार्थ्याला किमान ६० टक्के गुणांसह १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ज्यात कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असावे.

२. अर्जदार विद्यार्थ्याला किमान ८० टक्के गुणांसह १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ज्यात कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे.

३. पुणे, नाशिक, अहमदनगर येथील रहिवासी असणाऱ्या जे-जे विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात त्यांच्या शिष्यवृत्तीचे केवळ वार्षिक आधारावर नूतनीकरण केले जाते.

४. पुढील वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी अर्जदाराने गुणपत्रिका आणि फी रचना सादर करणे आवश्यक आहे.

५. शैक्षणिक वर्षात विद्यार्थी कोणत्याही विषयात अनुत्तीर्ण झाल्यास शिष्यवृत्ती बंद केली जाते.

खुशबू शिष्यवृत्ती कार्यक्रमात (cybagekhushaboo scholarship) अभियांत्रिकी, वैद्याक, फार्मसी, नर्सिंग, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, बीसीए, बीबीए, एमबीए इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश असून ह्या शिष्यवृत्तीसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मदत मिळू शकते. ऑनलाइन फॉर्म भरताना नोंदणी मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक डाउनलोड करून फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म स्पष्टपणे आणि पूर्णपणे भरलेला असावा, सर्व माहिती/ प्रश्न भरणे अनिवार्य असून ट्रस्ट अयोग्यरित्या भरलेला फॉर्म विचारात घेणार नाही.

विनंती केल्यानुसार कोणतीही कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी झाल्यास, ट्रस्ट अर्जदाराच्या फॉर्मचा विचार करत नाही. तेव्हा या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना तुम्हाला उपलब्ध होणार फॉर्म व माहिती काळजीपूर्वक भरण्याची खबरदारी सर्वच विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. अर्जदाराला शिष्यवृत्ती मंजूर करताना ट्रस्ट काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार निश्चितपणे करते ज्यात कागदपत्रांची पडताळणी सोबतच अर्जदाराची मुलाखत, गृहभेट आणि फीचे मूल्यांकन या महत्त्वपूर्ण गोष्टी बघितल्या जातात.

या शिष्यवृत्तीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही http://www. cybagekhushboo.org या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता. १५ ऑगस्ट २०२४ ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे.