विद्यार्थ्यांनी परदेशातील उच्चशिक्षणासाठी निवडलेला देश, विद्यापीठ आणि अभ्यासक्रम यांनुसार दरवर्षी शैक्षणिक शुल्क बदलते. पदवी अभ्यासक्रमांसाठी कालावधी हा दीर्घ असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना सरासरी एक- दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमापेक्षा जास्त खर्च करावा लागतो.
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा असते, आणि त्यामध्ये अमेरिकेतील विद्यापीठे ही एक प्रमुख पसंती ठरतात. नावाजलेल्या विद्यापीठांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनासाठी असणारी सुविधा, विविधतेने भरलेले कॅम्पस जीवन, आणि जागतिक स्तरावर असलेली मान्यता यामुळे अमेरिका शिक्षणासाठी एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. मात्र, त्याचबरोबर परदेशातील उच्चशिक्षणाची तयारी करत असताना विद्यार्थी-पालकांना सर्वात जास्त काळजी असते ती म्हणजे शिक्षणाच्या एकूण खर्चाची. परदेशात उच्चशिक्षणासाठी जाण्यापूर्वी थोडा गृहपाठ केल्यावर असे लक्षात येते की शिक्षण शुल्कातील कपात (ट्युशन वेव्हर), शिष्यवृत्ती वा एखादी पाठ्यवृत्ती किंवा ऑन कॅम्पस जॉब मिळाल्यावर एकूण खर्चापैकी बराच खर्च कमी होऊ शकतो.
अमेरिकेतील पदवी शिक्षणाचा खर्च किती ?
सर्वसाधारणपणे पीएचडी, एमएस किंवा एमबीएसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. अलीकडे पदवी अभ्यासक्रमांना जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्याही आता वाढू लागलेली आहे. या लेखामध्ये अमेरिकेतल्या पदवी अभ्यासक्रमासाठी एकूण किती खर्च होईल याची चर्चा करू.
विद्यार्थ्यांनी परदेशातील उच्चशिक्षणासाठी निवडलेला देश, विद्यापीठ आणि अभ्यासक्रम यांनुसार दरवर्षी शैक्षणिक शुल्क बदलते. पदवी अभ्यासक्रमांसाठी कालावधी हा दीर्घ असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना सरासरी एक- दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमापेक्षा जास्त खर्च करावा लागतो. अर्थातच शैक्षणिक शुल्क हा कोणत्याही परदेशी विद्यापीठाची गुणवत्ता ठरवण्याचा निकष नाही. किमान शैक्षणिक शुल्क असणारे विद्यापीठ हे शैक्षणिक-संशोधन वातावरणासाठी उत्कृष्ट असू शकते व एखादे महागडे विद्यापीठ सुमार दर्जाचेही असू शकते. मात्र परदेशातील जवळपास सर्वच देशांमध्ये विशेषत: अमेरिकेमध्ये बहुतांश शासकीय विद्यापीठांचे (पब्लिक युनिव्हर्सिटी) शिक्षण शुल्क खासगी विद्यापीठांपेक्षा (प्रायव्हेट युनिव्हर्सिटी) खूपच कमी आहे. पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी अनेक शिष्यवृत्ती आणि अनुदान उपलब्ध आहेत, ज्यामुळे त्यांचा खर्च कमी होईल. मात्र विद्यार्थ्यांनी निवडलेल्या सर्वच विद्यापीठांच्या शैक्षणिक शुल्काचे विश्लेषण करणे आवश्यक ठरते.
बहुतांश अमेरिकन विद्यापीठांचे २०२५ मधील केवळ शैक्षणिक शुल्कच तीस हजार डॉलर्सपासून पन्नास ते साठ हजार डॉलर्सपर्यंत आहे. या शुल्कामध्ये विद्यार्थ्याच्या निवास व भोजनाच्या खर्चाचा समावेश केलेला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या तुलनेत पदवी अभ्यासक्रमांसाठी अमेरिकेमध्ये जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किंवा इतर प्रकारची आर्थिक मदत मिळते. त्यामुळे विद्यार्थ्याला जर आर्थिक मदत मिळाली तर ही रक्कम अजून कमी होऊन जाते.
शिक्षणशुल्क कमी करण्याचे मार्ग
१) शिष्यवृत्ती : अनेक विद्यापीठे मेरिट बेस्ड व नीड-बेस्ड शिष्यवृत्ती देतात.
२) थेट आर्थिक मदत : काही विद्यापीठे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ‘Need-based Aid’ देखील देतात.
३) ऑन-कॅम्पस काम : F1 व्हिसा असलेले विद्यार्थी आठवड्याला वीस तास काम करू शकतात.
४) कम्युनिटी कॉलेज ट्रान्सफर: पहिल्या दोन वर्षांसाठी कम्युनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन नंतर विद्यापीठात ट्रान्सफर झाल्यास खर्च कमी होतो.
अमेरिकेतल्या टेक्साससारख्या काही राज्यांमधून सर्वच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या शिक्षणशुल्कामध्ये सवलत मिळते. टेक्सासमधील कोणत्याही विद्यापीठाला एखाद्या विद्यार्थ्याने जर अर्ज केला असेल तर त्या विद्यार्थ्याला ‘इन स्टेट’ विद्यार्थी म्हणून गृहीत धरले जाते, म्हणजे त्याला स्थानिक विद्यार्थ्यांएवढी फी लागू होते आणि त्यामुळे ट्यूशन वेव्हर (फी सवलत) मिळून फी बरीचशी कमी होते. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना अर्ध्याहूनही अधिक शुल्कामध्ये कपात मिळते/मिळू शकते.
आयव्ही लीगमधील विद्यापीठांचे शुल्क
आयव्ही लीगमधील विद्यापीठांचे शुल्क इतर विद्यापीठांच्या तुलनेत अधिक आहे. तसेच तिथे आर्थिक मदत मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. त्यामुळे पालकांची आर्थिकदृष्ट्या तयारी असेल तर आयव्ही लीगमधील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाल्यास तो स्वीकारावा.
एकंदरीत, अमेरिकेत शिक्षण घेणे हे महागडे असले तरी त्यामागे असलेले लाभ खूप मोठे आहेत – जागतिक दर्जाचे शिक्षण, कौशल्यवृद्धी, संशोधन संधी आणि आंतरराष्ट्रीय करिअरचा मार्ग मोकळा होतो. योग्य नियोजन, मार्गदर्शन, आणि आर्थिक मदतीच्या संधी शोधून विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिकणे शक्य आहे.
विद्यार्थ्यांसाठी: एखाद्या विद्यापीठाचे ठरावीक अभ्यासक्रमासाठी शिक्षण शुल्क किती आहे ते त्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन ‘ट्युशन कॅल्क्युलेटर’च्या माध्यमातून शकते. खाली दिलेली लिंक वापरून काही विद्यापीठांचे शुल्क किती आहे, ते तपासात येईल.
https://bigfuture.collegeboard.org/pay-for-college/get-started/net-price-calculator
theusscholar@gmail.com