भारतामध्ये डिझाइनचे व्यावसायिक शिक्षण १९६० च्या दशकात सुरू झाले. १९६१ साली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन(एन.आय.डी.) व १९६९ साली भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आय.आय.टी) मुंबई या अग्रगण्य संस्थांची महूर्तमेढ भारतात रचली गेली. या संस्था गेली साठहून अधिक वर्षे उत्कृष्ट दर्जाचे डिझाइन शिक्षण देत आहेत. डिझाइन हे क्षेत्र अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदेशास्त्र, अर्थशास्त्र या शाखांच्या तुलनेने नवीन असल्याने त्याची सखोल माहिती अनेक विद्यार्थी व पालकांपर्यंत अजूनही पोहोचलेली नाही.

आजच्या जगात, सर्जनशीलता (क्रिएटीव्हिटी) ही यशाची गुरुकिल्ली आहे. डिझाइन शिक्षण हे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील विचार आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. हे शिक्षण विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनाकडे नवीन दृष्टीने पाहण्यास, कल्पनाशक्तीचा वापर करण्यास आणि यथायोग्य व उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण गोष्टी व उपाय सुचवण्यास प्रोत्साहित करते.

डिझाइन शिक्षणात पालकांचा सक्रिय सहभाग कसा वाढू शकतो?

डिझाइन शिक्षण केवळ विद्यार्थ्यांसाठीच उपयुक्त नाही तर पालकांसाठीही फायदेशीर आहे. जेव्हा विद्यार्थी डिझाइन विषयाचे शिक्षण घेत असतात तेव्हा ते त्यांच्या पालकांसोबत नवीन प्रकल्प, संकल्पना आणि विचार प्रक्रिया व्यक्त करतात. यामुळे पालकांना त्यांच्या मुलांमधील सर्जनशीलता अधिक जागृत करण्याची आणि त्यांना त्यांच्या सर्जनशील प्रयत्नांमध्ये प्रोत्साहन देण्याची संधी मिळते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यातील बंध मजबूत होऊन ते एकत्र संवाद साधू शकतात आणि एकमेकांकडून शिकू शकतात.

डिझाइन विषयीचे प्राथमिक शिक्षण हे शैक्षणिक संस्थेच्या बाहेरही सुरू होऊ शकते. पालक आपल्या मुलांमध्ये सर्जनशीलता वाढवण्यासाठी आणि डिझाइन शिक्षणाची तोंडओळख करून देण्यासाठी खाली नमूद केलेल्या काही गोष्टी करू शकतात:

ऐतिहासिक स्थळे, संग्रहालये, कला व तंत्रज्ञान प्रदर्शन, करीयर मेळावे यांना भेटी: मुलांना शहरातील विविध ऐतिहासिक, विज्ञान संग्रहालये आणि कला प्रदर्शनांना घेऊन जाणे आणि त्यांना कलाकृती पाहण्यासाठी, त्याच्या सविस्तर नोंदी करून, शक्य असल्यास रेखाचित्र काढून आणि त्यांच्या अनुभवविषयी चर्चा करण्यासाठी प्रोत्साहित करणे. शक्य असल्यास काही डिझाइन शिक्षण संस्थांमध्ये मुलांना घेऊन जाणे.

वास्तुशिल्प, कलाकृति आणि डिझाइन यांचे निरीक्षण करण्यास प्रवृत्त करणे: रस्त्यावर चालताना विविध इमारतींचे डिझाइन, पब्लिक स्पेसेसची रचना, दुकानांच्या पाट्या, चौकातील पुतळे, संकेत चिन्हे आणि नवनवीन उत्पादनांची डिझाइन, पॅकेजिंग याकडे मुलांचे लक्ष वेधून नवीन ट्रेंडस, फॅशन, तंत्रज्ञान, प्रथा, सामाजिक बदल यावर चर्चा करणे.

मुलांना स्वत:चे निर्णय घेण्यास प्रोत्साहित करणे: मुलांना त्यांचे कपडे, वस्तु, पुस्तके निवडण्यापासून ते त्यांच्या खोलीची अंतर्गत सजावट करण्यापर्यंत, तसेच काही दैनंदिन व्यवहार करण्यासाठी लागणारे छोटे निर्णय घेण्यास प्रोत्साहित करणे. उदा. एक दोन दिवसाच्या सहलीचे नियोजन करणे, फोन व विद्युत बिल योग्य आहे का ते तपासणे, आज्जी आजोबांसाठी मोबाइल अॅप वापरुन टॅक्सी/ रिक्षा बूक करणे इत्यादि.

छोटे नवीन प्रकल्प करण्यास व त्यात चुका झाल्यास त्यातून शिकण्यास प्राधान्य: डिझाइनही अनुभवजन्य शिक्षण प्रक्रिया (एक्सपिरीयनशिअल लर्निंग) असल्याने टप्प्या टप्प्याने केलेल्या सुधारणांच्या पुनरावृत्तीतून घडणाऱ्या शिकण्यावर त्यामध्ये विशेष भर दिल जातो. त्यामुळे मुलांना सदैव नवनवीन प्रकल्प करण्यास व ते करत असताना होणाऱ्या चुकांकडे सजगपणे बघून त्या चुकांपासून शिकण्याची संधी देणे. उदा. आपल्या मुलाला घरच्या छताला लावलेले पंखे/ सीलिंग फॅन विनासायास स्वच्छ करण्यासाठी नवीन उपाय – वस्तु, व्यवस्था, पद्धती – शोधण्याचा प्रकल्प दिल्यास, प्रथम काही संशोधन, संकल्पना, आराखडे, प्रतिकृति बनवाव्या लागतील, त्या सुरवातीच्या प्रयोगतील काही चुकांमधून मधून शिकूनच पुढील डिझाइनबनावट येईल. यासर्व प्रक्रियेमध्ये मुलांना प्रोत्साहन आवश्यक असते.

आतापर्यंत आपण डिझाइन शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेवर आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांवर होणारा सकारात्मक परिणाम पाहिला. पण डिझाइन शिक्षण केवळ इतक्यापुरते मर्यादित नाही. डिझाइन शिक्षणामध्ये समानुभूतीचा (एमपथी) एक महत्वाचा घटक आहे. समानुभूती म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या भावना, विचार आणि अनुभवांना समजून घेण्याची आणि त्यांच्याशी समरस होण्याची क्षमता. डिझाइनशिक्षणामध्ये संवेदनशीलता आणि समानुभूतीचा समावेश केल्याने विद्यार्थी आणि पालक या दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो.

डिझाइन शिक्षण: विद्यार्थी आणि पालक यांना कसे एकत्र गुंफते?

नात्यामधील अधिक परिपक्वता: डिझाइनप्रकल्प करताना विद्यार्थी वेगवेगळ्या लोकांच्या – वापरकर्त्यांच्या गरजा, संदर्भ, आवडी-निवडी आणि समस्यांवर विचार करतात. यामुळे त्यांच्यात समानुभूतीची भावना निर्माण होते. पालक या प्रकल्पांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊन मुलांना वेगवेगळ्या दृष्टिकोनांवर चर्चा करण्यास प्रोत्साहित करू शकतात. त्यांना मॉडेल्स, प्रतिकृति बनवण्यास हातभार लावू शकतात, यामुळे पालक आणि मुलांमधील संघभावना वाढते व नातं अधिक परिपक्व बनण्यास मदत होते.

सखोल सामाजिक जाणीव: डिझाइन शिकणारे विद्यार्थी समाजातील अनेक समस्यांचा विविध अंगांनी अभ्यास करतात. ते वेगवेगळ्या लोकांच्या गरजा आणि समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांच्यात समानुभूतीची भावना वाढते आणि समाजाबद्दल जाणीव निर्माण होते. पालक या प्रक्रियेत सहभागी होऊन मुलांना समाजातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यास प्रोत्साहित करू शकतात. यामुळे विद्यार्थी समाजाच्या समस्यांवर अधिक गांभीर्याने विचार करतात आणि त्यांच्यावर उपाय शोधण्यासाठी प्रेरित होतात. यामुळे विद्यार्थ्याना समाजातील विविधतेची आणि समस्यांची उकल होते आणि त्यांचे पालक या प्रक्रियेत त्यांना मार्गदर्शन करू शकतात.

विविध दृष्टिकोनांची देवाण घेवाण: डिझाइन शिक्षण विद्यार्थ्यांना वापरकर्ता केंद्रित (युजर सेंट्रिक) समस्यांवर विस्तृत, बहुयामी व बहुअंगी विचार करण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करते. पालक या प्रक्रियेत सहभागी होऊन मुलांना वेगवेगळ्या लोकांच्या जगाबद्दल आणि त्यांच्या आव्हानांबद्दल चर्चा करण्यास प्रोत्साहित करू शकतात. त्याचप्रमाणे त्यांच्या व्यवसायाच्या अनुभवांतून विचार करण्याचे इतर पैलू पण मांडू शकतात.

सारांश असा की पालक जरी डिझाइनक्षेत्राशी संलग्न नसले, तरीही त्यांचा सक्रिय सहभाग, नवीन शिकण्याची आवड, जिज्ञासा व गाठीशी असलेला व्यावसायिक अनुभव, त्यांच्या पाल्याच्या डिझाइन शिक्षणात मोलाचे योगदान करून, त्यांचा शिक्षण प्रवास अधिक आनंददायी व अर्थपूर्ण बनवू शकतात.

किरण सबनीस / भारतीय प्रौद्यगिकी संस्थान (IIT) बॉम्बे मधून डिझाइनमध्ये पदवीत्तर, कॉर्पोरेट व शिक्षण क्षेत्रात २८ वर्षाहून अधिक अनुभव

kiran.sabnis123@gmail.com