किरण सबनीस
डिझाइन क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी आपल्याला डिझाइन संस्थामध्ये कशाप्रकारे व कोणते विषय शिकवले जातात हे समजावून घेणे गरजेचे आहे. कारण डिझाइन शिक्षण हे पारंपरिक शिक्षणपेक्षा तुलनेने वेगळे आहे. यामध्ये ‘प्रयोगशील स्वशिक्षणावर’ (प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग) अधिक भर दिला जातो. अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीला ‘अनुभवजन्य शिक्षण’ (एक्सपिरिएन्शिअल लर्निंग) असेही संबोधले जाते. अनुभवजन्य शिक्षणाची ढोबळ व्याख्या अशी की – प्रत्यक्ष कृतीचा अनुभव घेऊन त्यावर केलेल्या सखोल चिंतनातून व प्रयोगातून शिकणे.
प्रथम आपण ‘पारंपरिक शिक्षण’ व ‘अनुभवजन्य शिक्षण’ पद्धतीमधील फरक थोडक्यात समजावून घेऊ.
पारंपरिक पद्धतीमध्ये शिक्षक स्वतःकडे असलेले व जोपासलेले ज्ञान, माहिती, अनुभव त्यांच्या विद्यार्थ्यांना संभाषणातून, नोट्स मधून व पाठयपुस्तकातून देत असतात, यामध्ये पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नोत्तरे विचारणे, विविध लेखी व तोंडी परीक्षा घेणे यावर भर दिला जातो. बऱ्याच अंशी पाठ्यपुस्तके किंवा संदर्भ पुस्तके यांच्या कक्षा ठरलेल्या असतात. यामध्ये प्रत्यक्ष प्रयोगातून शिकण्यापेक्षा सिद्धांत व त्याची तात्विक बाजू समजावून घेण्यासाठी विद्याथ्यांना मार्गदर्शन दिले जाते.
‘अनुभवजन्य शिक्षण’ हे कसे भिन्न आहे यासाठी आपण त्याचा थोडा इतिहास समजावून घेऊ. १९७० च्या दशकात डेविड कोल्ब या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी अनुभवजन्य शिक्षणाची संकल्पना मांडली. मात्र भारतातही या पद्धतीची मुळे पूर्वीपासूनच दिसून येतात. महात्मा गांधी यांनी मांडलेली “नई तालीम” आणि रविंद्रनाथ टागोर यांचे शिक्षणविचार हे “कृतीतून शिकणे” या तत्त्वावर आधारित होते. आजच्या काळात “नवीन शिक्षण प्रणाली २०२०” द्वारे भारतात अनुभवजन्य शिक्षणाला अधिकृतपणे प्रोत्साहन दिले जात आहे. या प्रकारच्या शिक्षणाचे चार प्रमुख पैलू मांडले आहेत ते आपण उदाहरणांसाहित पाहूया.
१. प्रत्यक्ष कृतीतून अनुभव घेणे
यामध्ये विद्यार्थी एकत्र येऊन काही ठोस कृती स्वतः करतात आणि त्यातून प्रत्यक्ष अनुभव घेतात. या प्रक्रियेत मन, बुद्धी आणि शरीर यांचा सक्रिय सहभाग असतो. उदाहरणार्थ, वृद्ध लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी फक्त पुस्तके वाचणे पुरेसे नसते; त्यासाठी वृद्धांशी संवाद साधणे, वृद्धाश्रमांना भेट देणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे आवश्यक ठरते. त्यांच्या भावना समजून घेणे हा या टप्प्याचा महत्त्वाचा भाग आहे.
२. चिंतनात्मक आत्मनिरीक्षण
या टप्प्यात घेतलेल्या अनुभवावर सखोल चिंतन केले जाते. उदाहरणार्थ, वृद्धांच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे कशा समजल्या असत्या, त्यांच्या भावना व्यक्त होण्यासाठी आपण काय वेगळे करू शकलो असतो, किंवा त्यांच्या कुटुंबीयांची अनुपस्थिती का असावी – अशा प्रश्नांचा विचार केला जातो. यात आत्मनिरीक्षण आणि अनुभवातून नेमके काय शिकले यावर लक्ष केंद्रित केले जाते.
३. वैविध्यपूर्ण संकल्पनांची मांडणी
या टप्प्यात अनुभव आणि निरीक्षणांच्या आधारे निष्कर्ष काढले जातात आणि विविध अंगांनी विश्लेषण केले जाते. उदाहरणार्थ, वृद्धांना भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या, त्यामागची सामाजिक, मानसिक किंवा शारीरिक कारणे काय असू शकतात, याचा अभ्यास केला जातो. तसेच इतर ठिकाणी यावर कोणते उपाय केले आहेत आणि आपण कोणत्या नवीन संकल्पना मांडू शकतो, याचा विचार केला जातो.
४. सक्रिय प्रयोग
या अंतिम टप्प्यात मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग केला जातो. विद्यार्थी उपाय तयार करतात, त्यांची चाचणी करतात आणि त्यामध्ये सुधारणा करतात. उदाहरणार्थ, वृद्धांसाठी सोपे आभासी संवाद साधन तयार करणे, त्यांच्या अनुभवाचा समाजासाठी उपयोग करणारी प्रणाली विकसित करणे किंवा त्यांच्या हालचाली सुलभ करणारी नाविन्यपूर्ण साधने डिझाइन करणे. हा टप्पा सतत सुधारणा (iterative approach) आणि विविध परिस्थितींमध्ये उपायांची उपयुक्तता तपासण्यावर भर देतो
या चार पैलूंचा सुयोग्य मेळ हा डिझाइन मधील “अनुभवजन्य शिक्षणाचा” गाभा आहे. जगभरातील अनेक डिझाइन शिक्षण संस्थामध्ये अशा पद्धतीचा थोड्याफार फरकाने अवलंब केला जातो. डिझाइन शिक्षणात ठराविक पाठ्यपुस्तके व साचेबद्ध अभ्यासक्रम नसतो, परंतु डिझाइनचे शिक्षण हे रोजच्या जीवनातील अनुभव, सभोवतालची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिति व त्यातील होणारे बदल यांचा सजग व समग्र विचार यावर आधारित असते. यामध्ये विद्यार्थ्याना अनेक उपक्रम करायला प्रोत्साहन दिले जाते व त्यातूनच डिझाइनचे जीवनभिमुख शिक्षण घडते
डिझाइन शिक्षण घेताना विद्यार्थ्याना बऱ्याचदा त्यांचे छंद, कल, उपलब्ध कालावधि व वापरकर्त्यांची गरज यांचा मेळ साधून स्वत: प्रोजेक्ट निवडायचे स्वातंत्र्य असते. त्यांच्या शिक्षण अभ्यासक्रमात खालील गोष्टी समाविष्ट होवू शकतात. उदा.
- अ. नवनवीन तांत्रिक व औद्योगिक क्षेत्रातील प्रकल्प हाती घेणे आणि त्यावर एकत्र सांघिक विचार मंथन करून क्रिएटीव्ह पर्याय व उपाय सादर करणे
- ब. वैविध्यपूर्ण विचारांच्या, विविध शैक्षणिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गट चर्चा, अभ्यास सहली करणे
- क. जगाला भेडसावणारे व जीवनाभिमुख प्रश्न सोडवण्याचे संशोधन प्रकल्प हाती घेणे
- ड. विस्तृत, बहुआयामी व बहुअंगी विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी प्रत्यक्ष सामाजिक प्रकल्पात सहभाग घेणे
- इ. सुट्टीच्या काळात सामाजिक किंवा औद्योगिक संस्थांबरोबर उमेदवारी करणे
- फ. वेगवेगळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय डिझाइन स्पर्धांमध्ये सहभाग घेणे
या अनुभवजन्य शिक्षण पद्धतीचा फायदा डिझाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, समग्र विचारप्रक्रिया़ जोपासण्यासाठी, चौकस बुद्धी वाढवण्यासाठी व परस्परसंवादी दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी होतो. हाच तर खरा डिझाइनर बनण्याचा पाया आहे.
kiran.sabnis123@gmail.com
