किरण सबनीस
‘डिझाइन रिसर्च’ ही केवळ  माहिती गोळा करण्याची प्रक्रिया नाही. डिझाइनच्या प्रत्येक टप्प्यावर ती आपल्याला आपल्या गृहीतकांकडे पुन्हा पाहायला, बदलत्या गरजा समजून घ्यायला आणि नव्या शक्यता शोधायला भाग पाडते.

‘‘लिफ्टमध्ये जाणं एवढं साधं आहे… मग प्रत्येक जण ते वेगळ्या पद्धतीने का करतो?’’

ओंकार एका इमारतीच्या लिफ्टसमोर उभा होता. लिफ्ट आली. दरवाजा उघडला आणि लोक आत गेले. पण ओंकारचं लक्ष त्यांच्या हालचालींकडे गेलं. कुणी आधी आरशात पाहिलं, कुणी पंखा चालू केला, कुणी पटकन मजला निवडला, कुणी दार बंद होण्याआधी दुसर्‍याची वाट पाहिली. कुणी लिफ्ट उशिरा आली म्हणून पुन्हा पुन्हा बटण दाबत होतं. सगळे लिफ्टच वापरत होते; पण प्रत्येकाची पद्धत वेगळी होती. ओंकारच्या मनात प्रश्न आला, ‘‘असं का?’’ याच प्रश्नापासून सुरू होतो डिझाइन रिसर्चचा प्रवास.

आपण एखादी वस्तू, ॲप किंवा सेवा डिझाइन करताना अनेकदा आपल्या मनात काही गृहीतके असतात. पण प्रत्यक्ष वापरकर्ते त्याचा वापर कसा करतात, त्यांना कुठे अडचण येते, ते काय करतात आणि त्यामागचं कारण काय आहे, हे समजून घेतल्याशिवाय उत्तम डिझाइन करता येत नाही.

‘डिझाइन रिसर्च’ म्हणजे काय?

वापरकर्त्यांची गरज काय आहे, ते काय करतात, का करतात, त्यांच्या सभोवतालचा संदर्भ काय आहे आणि त्यांच्या अडचणी काय आहेत, हे समजून घेण्यासाठी पद्धतशीरपणे शोध घेणे, निरीक्षण करणे, माहिती संकलित करणे, तिचं विश्लेषण करणे आणि त्यातून डिझाइनसाठी नवीन अंतर्दृष्टी शोधणे म्हणजे डिझाइन रिसर्च.

यात केवळ प्रश्न विचारणे पुरेसे नसते. कारण लोक जे सांगतात आणि प्रत्यक्षात जे करतात, यात अनेकदा फरक असतो. उदाहरणार्थ, रुग्णालयात डॉक्टरांची भेट मिळण्यासाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तासन्तास वाट पाहताना दिसतात. ‘‘डॉक्टर कधी येणार?’’ याची स्पष्ट माहिती नसते. इथे समस्या फक्त प्रतीक्षेची नाही. लोक किती वेळ थांबतात, त्या वेळेत काय करतात, कोणत्या क्षणी अस्वस्थ होतात, माहिती कुठून मिळवतात, याचं निरीक्षण केल्यावरच खरा प्रश्न समोर येऊ शकतो. म्हणून डिझाइन रिसर्चमध्ये निरीक्षण, संवाद, प्रत्यक्ष अनुभव, उपलब्ध माहिती आणि वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया अशा अनेक मार्गांनी माहिती गोळा केली जाते. त्यानंतर या माहितीतील समान धागे शोधले जातात. काही गोष्टी वारंवार का घडत आहेत, त्यामागे कोणती गरज आहे, कोणती अडचण आहे, याचा शोध घेतला जातो. या प्रक्रियेतून मिळालेली अंतर्दृष्टी पुढच्या डिझाइनला दिशा देते. कधी कधी अशा निरीक्षणातून अगदी अनपेक्षित गोष्टही समोर येते. उदाहरणार्थ अंध व्यक्तींसाठी मोबाईल ॲप तयार करताना असा अंदाज होता की व्हॉट्सॲपच्या समूहात कोणाचा संदेश आला किंवा कोणी उत्तर दिलं, हे समजण्यासाठी त्या व्यक्तीचं नाव ‘‘स्क्रीन रीडर’’ने ऐकवणं आवश्यक असेल. पण प्रत्यक्ष वापरात लक्षात आलं की काही वापरकर्त्यांसाठी केवळ कंपनांची (व्हायब्रेशन्स) जाणीवही पुरेशी आहे  म्हणजे डिझायनरचं गृहीतक आणि वापरकर्त्याची खरी गरज वेगळी होती. हीच डिझाइन रिसर्चची ताकद, ती आपल्याला आपल्या गृहीतकांपासून बाहेर काढते.

‘डिझाइन रिसर्चर’ होण्यासाठी कोणत्या क्षमता आवश्यक असतात?

डिझाइन रिसर्चर बनण्यासाठी बारकाईने निरीक्षण करण्याची सवय, कुतूहल, समानुभूती आणि संवादकौशल्य तर आवश्यक आहेच; पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णयरहित आणि तटस्थ वृत्ती. ‘‘लोक असं चुकीचं का करतात?’’ असा प्रश्न न विचारता, ‘‘लोक असं का करतात?’’ हा प्रश्न विचारण्याची सवय लागते. हीच वृत्ती डिझाइनच्या इतर क्षेत्रांतही महत्त्वाची ठरते. एखाद्या ॲपचा वापर कमी झाला म्हणून लगेच नवीन सुविधा तयार करण्यापेक्षा, प्रथम लोक त्या ॲपचा वापर कसा करत आहेत हे पाहणं अधिक महत्त्वाचं असू शकतं. ते कुठे थांबतात? कुठे गोंधळतात? कोणत्या टप्प्यावर ॲप सोडून देतात? आणि त्यांना काय अपेक्षित होतं? या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यावरच योग्य बदल सुचू शकतात.

ही कौशल्ये विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी एक साधा प्रयोग करून पाहावा. एखाद्या लिफ्टजवळ तीस मिनिटे उभे राहा. लोक लिफ्टची वाट कशी पाहतात? कोण आधी आत जातं? बटण किती वेळा दाबलं जातं? लिफ्टमध्ये गेल्यावर लोक कुठे पाहतात? दार बंद होताना काय करतात? लिफ्ट उशिरा आली तर त्यांची प्रतिक्रिया काय असते? फक्त निरीक्षण करा. लगेच निष्कर्ष काढू नका. शक्य असेल तर नोंदी करा. नंतर स्वत:ला विचारा, ‘‘मी जे पाहिलं, त्यामागे कोणती गरज, भावना किंवा अडचण असू शकते?’’ कदाचित तुम्हाला एखादी अशी गोष्ट दिसेल जी इतरांच्या लक्षातच आली नसेल. आणि तिथूनच नवीन डिझाइनची कल्पना जन्माला येऊ शकते.

याच कौशल्यातून पुढे डिझाइन रिसर्चर, यूजर रिसर्चर, प्रॉडक्ट डिझायनर, सेवा डिझायनर अशा अनेक करिअरच्या दिशा खुल्या होतात. या क्षेत्रात केवळ चित्र काढण्याची किंवा सुंदर वस्तू तयार करण्याची कौशल्ये पुरेशी नसतात. लोकांना समजून घेण्याची, प्रश्न विचारण्याची, माहितीचा अर्थ लावण्याची आणि त्यातून नवीन शक्यता शोधण्याची क्षमता अधिक महत्त्वाची ठरते.

डिझाइन रिसर्च ही केवळ प्रकल्पाच्या सुरुवातीला माहिती गोळा करण्याची प्रक्रिया नाही. डिझाइनच्या प्रत्येक टप्प्यावर ती आपल्याला आपल्या गृहीतकांकडे पुन्हा पाहायला, बदलत्या गरजा समजून घ्यायला आणि नव्या शक्यता शोधायला भाग पाडते. कारण माणसांचं वर्तन नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे असेलच असं नाही. म्हणूनच डिझाइन रिसर्च आपल्याला एक महत्त्वाची सवय लावते गृहीतकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा बारकाईने निरीक्षण करा, लगेच निष्कर्ष काढण्यापेक्षा प्रश्न विचारा आणि उत्तरापेक्षा समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा. कदाचित तिथेच एखाद्या नव्या डिझाइनची, नव्या कल्पनेची आणि नव्या करिअरची सुरुवात दडलेली असेल.

kiran.sabnis123@gmail.com (लेखक आयआयटी, मुंबईमधून डिझाइनमध्ये पदव्युत्तर पदवीधर असून त्यांना कॉर्पोरेट, शिक्षण क्षेत्रातील अनुभव आहे.)