साहेबराव धनवटे
पूर्वी इलेक्ट्रॉनिक्स म्हटले की रेडिओ, दूरदर्शन, टेपरेकॉर्डर किंवा साधी इलेक्ट्रॉनिक उपकरणे डोळ्यांसमोर यायची. आज चित्र पूर्णपणे बदलले आहे. मोबाइल, स्मार्ट टीव्ही, आयओटी, रोबोटिक्स, सौरऊर्जा, युपीएस, इन्व्हर्टर, फायबर ऑप्टिक्स आणि पीसीबी यांसारख्या तंत्रज्ञानाने दैनंदिन जीवन व्यापले आहे. या बदलाची दखल आता औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमानेही घेतली आहे. आयटीआयमधील ‘इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक’ हा पारंपरिक ट्रेड केवळ उपकरणांची दुरुस्ती शिकवणारा अभ्यासक्रम राहिलेला नसून आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सच्या अनेक शाखांशी जोडला गेला आहे.

प्रशिक्षण महानिदेशालयाने (डीजीटी) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेडचा अभ्यासक्रम सुधारित केला आहे. हा दोन वर्षांचा, एनएसक्यूएफ लेव्हल ४ अभ्यासक्रम असून, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर क्षेत्रात त्याचा समावेश आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या ट्रेडमध्ये प्रवेश घेता येतो. दहावीला गणित आणि विज्ञान आवश्यक. एका तुकडीत २४ प्रशिक्षणार्थी अशी प्रवेश क्षमता आहे.

हातातील साधनांपासून डिजिटल तंत्रज्ञानापर्यंत

अभ्यासक्रमाची सुरुवात इलेक्ट्रॉनिक्सच्या मूलभूत ज्ञानापासून होते. पहिल्या वर्षात फिटिंग, ड्रिलिंग, सुरक्षितता, मोजमापाची साधने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची हाताळणी याबरोबरच मल्टीमीटर आणि डिजिटल स्टोरेज ओसीलोस्कोपच्या साहाय्याने इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक मोजमाप शिकवले जाते. पीसीबी तयार करणे, सोल्डरिंग-डीसोल्डरिंग, इलेक्ट्रॉनिक घटकांची तपासणी, पॉवर सप्लाय, अॅनालॉग सर्किट आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाते.

ट्रान्झिस्टर, एमओएसएफईटी, आयजीबीटी आणि एससीआर यांसारख्या घटकांपासून डिजिटल सर्किट आणि आयसीवर आधारित सर्किटपर्यंत प्रशिक्षणाचा विस्तार होतो. म्हणजेच विद्यार्थ्याच्या हाताला केवळ साधनांची ओळख नाही, तर इलेक्ट्रॉनिक प्रणाली समजून घेण्याची सवय लावण्याचा प्रयत्न आहे.

दुसऱ्या वर्षात उद्योगाशी थेट जोडणी

दुसऱ्या वर्षात प्रशिक्षण अधिक उद्योगाभिमुख होते. इलेक्ट्रॉनिक केबल्स, क्रिम्पिंग, टेस्टिंग, संगणक प्रणाली बसवणे व कॉन्फिगर करणे, एसएमडी घटकांचे सोल्डरिंग-डीसोल्डरिंग यांसारखी कौशल्ये शिकवली जातात. एएम/एफएम रिसीव्हर, एलसीडी, एलईडी आणि डीपीएम पॅनेल यांच्याशी संबंधित प्रत्यक्ष कामाचा समावेश आहे. हाच ट्रेड पुढे आयओटी, सेन्सर, ट्रान्सड्यूसर आणि रोबोटिक्सपर्यंत पोहोचतो. त्यामुळे पारंपरिक इलेक्ट्रॉनिक्सपासून ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाकडे अभ्यासक्रमाने वळण घेतले आहे.

फायबरपासून सौरऊर्जेपर्यंत

डिजिटल अर्थव्यवस्थेत डेटा प्रसारणाला वाढते महत्त्व असल्याने फायबर ऑप्टिक सेटअप आणि डेटा ट्रान्समिशन-रिसेप्शनचे प्रशिक्षण दिले जाते. एसएमपीएस, युपीएस आणि इन्व्हर्टरमधील दोष शोधणे व दुरुस्तीबरोबरच फोटोव्होल्टानिक सेल्स, मॉड्युल्स, बॅटरी आणि चार्ज कंट्रोलर्सची तपासणी, सौर पॅनेलची स्थापना आणि कार्यक्षमतेचे परीक्षणही शिकवले जाते.

मोबाइल फोन, एलसीडी, एलईडी आणि स्मार्ट टीव्हीमधील घटकांची ओळख, दोष शोधणे, प्राथमिक दुरुस्ती आणि मॉड्यूल बदलण्याचे प्रशिक्षणही अभ्यासक्रमात आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकची भूमिका सर्व्हिस सेंटरपुरती मर्यादित राहत नाही.

२४०० तासांचे प्रशिक्षण

दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात प्रत्येक वर्षी १२०० तासांचे प्रशिक्षण आहे. व्यावसायिक प्रात्यक्षिक, व्यावसायिक ज्ञान आणि रोजगारक्षम कौशल्यांवर भर देण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक वर्षी १५० तासांचे अनिवार्य ऑन-द-जॉब ट्रेनिंग (ओजेटी) किंवा पर्यवेक्षणाखाली प्रकल्पाची (प्रोजेक्ट) तरतूद आहे. वर्गातील ज्ञान आणि उद्योगातील प्रत्यक्ष काम यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी ही बाब महत्त्वाची आहे.

रोजगाराच्या नव्या वाटा

या अभ्यासक्रमानंतर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स फिटर, रेडिओ टेक्निशियन, टेलिव्हिजन सर्व्हिस अँड रिपेअरमन, सोलर पॅनेल इन्स्टॉलेशन टेक्निशियन, ऑप्टिकल फायबर टेक्निशियन आणि युपीएस-इन्व्हर्टर फील्ड टेक्निशियन अशा विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध आहेत. अप्रेंटिसशिप, स्वयंरोजगार आणि पुढील तांत्रिक शिक्षणाचे मार्ग म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स मधील पदवी आणि पदविका शिक्षणही खुले आहे.

महाराष्ट्रासारख्या औद्योगिक राज्यात या कौशल्यांची मागणी उत्पादन (प्रोडक्शन), इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा, दूरसंचार आणि सेवा क्षेत्रात आहे. त्यामुळे ‘इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक’ची नवी ओळख केवळ दुरुस्ती करणारा तंत्रज्ञ अशी न राहता इलेक्ट्रॉनिक प्रणाली समजून घेणारा, दोष शोधणारा आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारा कुशल मनुष्यबळ अशी होणे, हीच या अभ्यासक्रमातील बदलाची खरी दिशा आहे.

शिल्प निदेशक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोखाडा.