सलील चिंचोरे
बाजारपेठेत अग्रस्थानी जाण्याची चढाओढ कंपन्यांमध्ये चालू असते. तसेच वित्तीय निकषांवर कंपनीची कामगिरी अधिकाधिक सरस व्हावी यासाठीही कंपन्या झटत असतात. त्या उद्देशाने कंपनी दरवर्षी विक्री, नफा, कार्यक्षमता, भांडवल, ग्राहक केंद्रीतता अशा संबंधित टार्गेट्स निश्चित करते. कर्मचार्यांनी टारगेट पूर्ण न केल्यास त्यांना ‘परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लान’ अंतर्गत कामगिरी सुधारण्यासाठी ठरावीक वेळ आखून दिला जातो. मात्र या कालावधीत कर्मचार्यांनी नक्की काय केल्यास कामगिरी सुधारणा होईल याची स्पष्टता नसते.
कर्मचार्यांच्या कामगिरीवर अनेक घटक परिणाम करत असतात. यावर सखोल संशोधन झाले आहे. या संशोधनातील घटकांना आपण एका समीकरणाच्या स्वरूपात मांडू शकतो. त्याला ढअटडऊ समीकरण म्हणतात. हे समीकरण थोडक्यात असे आहे:
Performance (कामगिरी) = Ability क्षमता x Motivation (प्रेरणा) x Opportunity (संधी) x Direction (मार्गदर्शन)
या समीकरणानुसार, कर्मचार्यांची कामगिरी ही प्रामुख्याने चार घटकांवर अवलंबून असते. यापैकी एकाही घटकाचा अभाव असल्यास कर्मचार्यांची कामगिरी शून्यावर येऊ शकते. या चार घटकांची आपण थोडक्यात माहिती करून घेऊया.
’ क्षमता – म्हणजे कर्मचार्यांचे कामासंबंधी असलेले ज्ञान व काम यशस्वी करण्यासाठी लागणारी महत्त्वाची कौशल्य. नवीन, अननुभवी कर्मचार्यांमध्ये क्षमतेची कमतरता असते. एखाद्या चांगल्या कर्मचार्यालाही नवीन प्रोजेक्ट किंवा काम दिल्यास त्यासाठी लागणारी क्षमता आत्मसात करावी लागते. कर्मचार्यांची क्षमता कमी आढळल्यास ट्रेनिंग, वेगवेगळे कोर्सेस, अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन याद्वारे उणीव भरून काढावी लागते. तसे न केल्यास त्या कर्मचार्यांचा आत्मविश्वास कमी होत कामगिरी खालावत जाते.
’ प्रेरणा – प्रत्येक मनुष्य प्रामुख्याने आपल्या अंत:प्रेरणेनुसार काम करत असतो. ही प्रेरणा वर्तन व कामगिरी खुलवत नेण्यासाठी एका इंधनाचे काम करते. कर्मचार्यांच्या स्वत:च्या विचाराने किंवा कंपनीने त्याला दिलेल्या वर्तणुकीने प्रेरणेत नकारात्मक बदल होतो. उदाहरणार्थ, कर्मचार्याला अपेक्षेनुसार प्रोजेक्ट, वेतनवाढ, प्रमोशन, बदलीचे ठिकाण, वरिष्ठांची शाबासकी, सहकर्मचार्यांकडून आदर, कामातील अडथळ्यांची कंपनीकडून दखल – अशा गोष्टी न घडल्यास त्याला नैराश्य येते. याचा परिणाम तात्कालिक किंवा दीर्घकालीन असू शकतो. त्याच्या प्रेरणेला कोणत्या घटकांनी धक्का बसला आहे ते जाणून घेऊन पुढील योजना आखावी.
’ संधी – कर्मचारी अनुभवी व कर्तबगार असला तरीही त्याला कामगिरी सिद्ध करण्यासाठी योग्य संधीची गरज असते. बर्याचदा कर्मचार्यांना त्यांच्या वकुबानुसार काम मिळत नाही व त्याचा कामगिरीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, एखाद्या सेल्समनचा महिन्याचा अहवाल खराब असेल तर त्या मार्केटमध्ये संप, सुट्ट्या किंवा उत्पादनविक्रीला विपरीत अशा काय गोष्टी घडल्या आहेत हे जाणून घ्यावे लागते. कर्मचार्यांना त्यांच्या क्षमतेनुसार कामाच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे ही कंपनीकडून महत्त्वाची अपेक्षा असते.
’ मार्गदर्शन – प्रत्येक कर्मचार्याला काम पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन, वेळोवेळी मिळणारे निर्णय फार महत्त्वाचे असतात. काही टीमलीडर्स किंवा मॅनेजर्सला आपली टीम नीट हाताळता येत नाही. स्वत:चे दोष ते टीमवर ढकलून मोकळे होतात. तर काही टीमलीडर्स आपल्या कर्मचार्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून चांगले काम खुबीने करून घेतात. कर्मचार्यांची कामगिरी तपासताना त्यांना चांगले टीम लीडर्स आहेत का हे काळजीपूर्वक बघावे लागते. विशेषत: नवीन व अननुभवी कर्मचारी योग्य मार्गदर्शनाविना चाचपडताना आढळतात.
हे चार घटक कर्मचार्यांच्या कामगिरीला वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. खराब कामगिरीसाठी कर्मचारी फालतू सबबी देत आहे असे न मानता या चार घटकांनुसार विश्लेषण करून कामगिरी सुधारण्यासाठी ठळक कार्यक्रम आखावा. त्याचा सकारात्मक परिणाम कर्मचार्यांची व कंपनीची कामगिरी वाढवण्यात नक्कीच होईल.
chinchoresalil@gmail.com
(लेखक मनुष्यबळ क्षेत्रातील तज्ज्ञ असून या क्षेत्रात २५ वर्षे कार्यरत आहेत.)
