माझे भावाला १० वी मध्ये ७४.८० व १२ वीला ७७.३३ होते. आताच त्याने कला शाखेत पदवी परीक्षा ८.९० सीजीपीए ने उत्तीर्ण केली. त्याने पदवी मराठी माध्यमातून पूर्ण केली. तर त्याने एमए करत असताना एमपीएससी कम्बाइनची तयारी करावी की पूर्ण वेळ एमपीएससी कम्बाइन परीक्षेवर लक्ष केंद्रित करू द्यावे. – अनिरुद्ध कांबळे.

आपण भावाचे बीएचे विषय दिलेले नाहीत. त्यामुळे त्याने एमए कशात करावे व त्याचा उपयोग काय याचे उत्तर मी कसे देणार? एमपीएससी कम्बाईन परीक्षा द्यायला हरकत नाही. त्यातून आपण कुठे आहोत याचा अंदाज येईल एवढेच उत्तर मी येथे देत आहे.

माझे बीए साठ टक्के गुणांनी झाले. इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी इंग्रजी असे विषय होते. मी एमपीएससीची तयारी करत आहे. तोवर मी काय करावे यात माझा गोंधळ झाला आहे. बीएड करू का एमए? इकॉनॉमिक्समध्ये करू का सायकोलॉजीत? आपण मला मार्गदर्शन करावे ही विनंती. – कैलास क्षीरसागर

हेही वाचा >>> यूपीएससी सूत्र : रेझिस्टन्स फ्रंट दहशतवादी संघटना अन् केंद्रीय मंत्र्याचे अधिकार-कर्तव्य, वाचा सविस्तर…

इंग्रजी हा मेथडचा विषय घेऊन बीएड केल्यास कदाचित तात्पुरती नोकरी लागू शकते. शिक्षकी पेशामध्ये सध्या कायम नोकरी हा शब्द नाही. शालेय शिक्षणात इकॉनॉमिक्स व सायकॉलॉजीचा संबंध येत नाही पण इंग्रजीचा उपयोग होऊ शकतो. मात्र बोली इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व असल्यास तो रस्ता घ्यावा. तू प्रश्न ज्या पद्धतीत इंग्रजीतून विचारला आहे त्यावरून ती शंका मी व्यक्त करत आहे. एमए इकॉनॉमिक्स करून नोकरीचे दृष्टीने फारसा फायदा होणार नाही. विविध संशोधनाच्या प्रोजेक्टमध्ये मदतनीस म्हणून नोकरी मिळू शकेल. सायकॉलॉजी विषय घेऊन एमए केल्यास त्यातील विषयाच्या निवडीनुसार काही कामे उपलब्ध होऊ शकतात. इंडस्ट्रियल, चाईल्ड, कौन्सिलिंग, स्कूल, क्लिनिकल अशा विषयातून स्पेशल करता येते. त्यातून कामे करणे शक्य असते. अशी कामे करता करता एमपीएससीचा प्रयत्न चालू ठेवण्यास हरकत नाही. मात्र फक्त एमपीएससी करण्यासाठी तुझी शैक्षणिक वाटचाल पुरेशी नाही हे इथेच नमूद करत आहे. नीट चौकशी करून माहिती घेऊन निर्णय घ्यावा.

माझ्या मुलीला इयत्ता दहावीला ८८ गुण मिळाले व बारावीला८४.८ गुण मिळाले. बोरीवली येथील गोखले कॉलेजमधून तिने कॉमर्स शाखेतून बॅफ (बॅचलर ऑफ कॉमर्स विथ अकाउंटिंग अॅन्ड फायनान्स) चे पदवी शिक्षण पूर्ण केले. तिला बॅफ मध्ये ८३.५ गुण मिळाले. तिने एमबीए फायनान्स यासाठी कॅटची परीक्षा दिली, त्यात तिला ९४.१७ पर्सेंटाइल मिळाले असून आयआयएम नागपूरचे ऑफर लेटर आलेले आहे. तिने यावर्षीची एमबीए सीईटी ची परीक्षासुद्धा दिली. त्यात तिला ९८.६५ पर्सेंटाइल मिळालेले आहेत. या गुणांवर तिचा जमनालाल बजाज येथील एमएससी फायनान्स कोर्सचा कटऑफ क्लियर होत आहे. तरी या दोन कॉलेजपैकी आम्ही कुठल्या कॉलेजची निवड करावी याबद्दल आम्हाला कृपया लोकसत्ताच्या करिअर मंत्र या सदरातून मार्गदर्शन करावे अशी आपणास कळकळीची विनंती आहे. आम्ही सध्या द्विधा मन:स्थितीत आहोत. तरी आपला सल्ला आम्हास खूपच मोलाचा आहे. – मुकुंद सोनपाटकी, बोरिवली.

आपला गोंधळ दूर करण्यासाठी मुख्यत: मी कारणे सांगत आहे. जमनालाल बजाजचा एमएस्सी इन फायनान्स हा कोर्स नवीन आहे. त्याची मागणी अजून कळायची आहे. या उलट नागपूर आयआयएमचे अनेक वर्षाचा अनुभव असलेला एमबीए कोर्स आहे. त्यांचे प्लेसमेंट रेकॉर्ड उपलब्ध आहे ते चांगले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हा स्वत:च एक ब्रँड आहे. जमनालाल बजाज उत्तम असले तरी तेथील एमबीए कोर्स मिळालेला नाही. ही कारणे लक्षात घेऊन आपण योग्य तो निर्णय घ्यावा.