सर, मी सध्या बीएससी प्रथम वर्षाला आहे. बारावीला ७० टक्के होते. मी एनसीसी देखील करत आहे. मला एमपीएससी द्यायची आहे, पण असे वाटते की एनसीसी घेऊन सीडीएस द्यावी. कृपया मार्गदर्शन करा. – ज्ञानेश्वरी वाघ

तीन वर्षे एनसीसी करत असताना सी सर्टिफिकेट मध्ये ए ग्रेड मिळवलीस तर सीडीएसचा रस्ता तुझ्यासाठी उघडू शकतो. मग एनसीसी स्पेशल कोट्यातून पदवीधरांना प्रवेश मिळतो, मात्र त्यासाठी एसएसबी मध्ये यश मिळवायला हवे. स्पर्धा परीक्षांचा रस्ता पूर्णपणे अनिश्चित आहे. त्याचा विचार सीडीएसचा आधी प्रयत्न केल्यानंतर मगच करावा. एक आठवण बीएससी ला किमान ७५ टक्के मार्क मिळवण्याचे ध्येय मनात पक्के ठेव. ते जमले तर दोन्हीमध्ये यशाची शक्यता वाढते.

मी एफ.वाय. बीएससी कॉम्प्युटर सायन्सला आहे. मी स्पर्धा परीक्षेची (डिफेन्ससाठी) तयारी करत आहे. पेपर आणि शारीरिक चाचणीत मी उत्तीर्ण झालो होतो, पण वजनात अपात्र ठरलो. कुटुंबीय आता बीएससी करण्यास सांगत आहेत. कारण सैन्याची सेवा केवळ चार वर्षांचीच आहे. मी काय करावे?

ओम निकम

अग्निवीर या प्रवेशासाठी तू प्रयत्न केलास पण वजनात अपात्र ठरलास असे तुझे सांगणे आहे. घरचे म्हणतात ते ऐकून बीएससी कॉम्प्युटर सायन्स फर्स्ट क्लास मिळवून पूर्ण करावे. त्यानंतर तुला पुन्हा पदवीधर कमिशन्ड ऑफिसर म्हणून प्रवेश करण्यासाठी तीन संधी मिळू शकतात. अन्यथा हाती असलेल्या पदवीतून नोकरीही मिळू शकेल. बारावी नंतर काय? पदवीनंतर काय? त्यानंतर आंतरशाखीय शिकायचे का? स्पर्धा परीक्षांचा रस्ता धरायचा? अशा छोट्या-छोट्या टप्प्यातून विचार केल्यास प्रत्येकाला रस्ता दिसू लागतो.

careerloksatta@gmail.com