नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२७ च्या परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता राज्य सरकारमार्फत देण्यात येणाऱ्या पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण वर्गाच्या प्रवेशासाठी सामायिक ऑनलाइन प्रवेश परीक्षा १९ जुलै २०२६ रोजी होणार आहे.

आयएएस / आयएफएस /आयपीएस /आयआयएस अधिकारी व्हायचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील होतकरू व गुणवान उमेदवारांना राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), हजारीमल सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर, मुंबई – ४०० ००१) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा पूर्वपरीक्षा २०२७ च्या परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण वर्गात प्रवेशासाठी सामायिक ऑनलाइन प्रवेश परीक्षा (CET – २०२६-२७) १९ जुलै २०२६ रोजी (सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत) घेण्यात येईल. या सामायिक प्रवेश परीक्षे (Common Entrance Test) मधून महाराष्ट्र राज्यातील पुढील संस्थांमध्ये प्रवेश दिले जातील. एकूण प्रवेश – ५६०.

(१) राज्य प्रशासकीय व्यवसाय संस्था (SIAC) मुंबई – एकूण प्रवेश – ११०

(२) भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नागपूर – ११ (३) भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती – ६

(४) भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, छ. संभाजी नगर – ७

(५) भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक – ६० (६) भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर – ७०

(७) डॉ.आंबेडकर कॉम्पटिटिव्ह एक्झानिमेशन गायडन्स (ACEC) यशदा पुणे – ३०

(८) सावित्रीबाई फुले अॅकेडमी, पिंपरी चिचंवड म्युनिसिपल कार्पोरेशन PCMC – ५०

या ८ केंद्रांतील विनामूल्य प्रशिक्षणाकरिता प्रवेश दिले जातील. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, यशदा पुणे या केंद्रांवरील प्रत्येकी १० जागा अल्पसंख्यांक अनुदानित असतील. (महिला ३३ टक्के, अपंग ४ टक्के , विमाप्र २ टक्के व अनाथ १टक्का जागा उमेदवारांसाठी राखीव).

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. पदवी परीक्षा उत्तीर्ण नसलेले उमेदवार CET परीक्षेस बसण्यास पात्र आहेत, प्रत्यक्ष प्रवेशावेळी पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा.

महाराष्ट्र कर्नाटक वादग्रस्त सीमा भागात राहणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, त्यांना पुढील पात्रतेची पूर्तता करावी लागेल. (ए) पात्रता परीक्षा (पदवी) महाराष्ट्र – कर्नाटक वादग्रस्त सीमा भागातील संस्थेमधून उत्तीर्ण केलेली असावी. (बी) संस्थेच्या प्राचार्यांचे सर्टिफिकेट ज्यात उमेदवाराची मातृभाषा मराठी आहे व त्याने १०वी ला मराठी विषय घेतला होता. (सी) संबंधित जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांचे पत्र ज्यात उमेदवाराचे पालक महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील रहिवासी आहेत असे नमूद केलेले असावे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचालित सावित्रीबाई फुले अकादमी, पुणे येथे प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवाराने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा स्थानिक रहिवासी दाखला सादर करणे आवश्यक आहे.

शंकासमाधासाठी ई-मेल आयडी onlinesiac@gmail.com मोबाईल नं. ९७६९०१५९६४ / ९७६९१९९४२१ / ७७३८७८१७४३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

वयोमर्यादा – (दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी) २१-३२ वर्षे (खुला/ईडब्ल्यूएस प्रवर्ग); २१-३५ वर्षे (इमाव/विमाप्र/विजा/भज/ सा.शै.मा वर्ग); २१-३७ वर्षे (अजा/अज); २१ ते ४५ वर्षे (दिव्यांग).

प्रवेश परीक्षा पद्धत – लेखी परीक्षा २०० गुण व मुलाखत ५० गुण अशाप्रकारे सामायिक प्रवेश परीक्षा एकूण २५० गुणांची राहील. लेखी परीक्षा UPSC मार्फत घेतल्या जाणाऱया नागरी सेवा (पूर्व) परीक्षेच्या धरतीवर घेण्यात येईल. वेळ – २ तास, ऑब्जेक्टिव्ह टाईप (MCQ). सेक्शन-१ – सामान्य अध्ययन – ५० प्रश्न, १०० गुण; सेक्शन-२ – सामान्य अध्ययन – (सी सॅट), ४० प्रश्न, १०० गुण. प्रत्येक चुकीच्या उत्तरास प्रश्नाला असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील. सामान्य अध्ययन – कलमापन चाचणी (CSAT) ही फक्त पात्रता स्वरूपाची असल्याने यात किमान ३३ गुण मिळविणे अनिवार्य आहे.

प्रवेश परीक्षा केंद्र – मुंबई, नाशिक, छ. संभाजी नगर, अमरावती, नागपूर, पुणे, कोल्हापूर.

गुणवत्ता यादी सेक्शन-१ सामान्य अध्ययन या भागातील गुण व मुलाखतीमध्ये प्राप्त गुण एकत्रित करून बनविली जाईल. परीक्षेचे माध्यम हिंदी/इंग्रजी असेल. गुणवत्ता यादीप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्यात येईल. मुलाखतीचा कार्यक्रम परीक्षेनंतर कळविण्यात येईल. मुलाखत मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून देता येईल. प्रवेश परीक्षा २ ऑगस्ट २०२६ रोजी.

सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल दि. २४ जुलै २०२६ सायंकाळी ५.०० वाजता जाहीर होईल.

परीक्षा शुल्क भरणा ऑनलाइन पद्धतीने भरण्याची अंतिम मुदत २ जुलै २०२६ (रात्री १२.०० वाजेपर्यंत )

परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती/सूचना इ. संस्थेच्या www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ऑनलाइन अर्ज – www.siac.org.in; या संकेतस्थळावर ३० जून २०२६ पर्यंत सादर करावेत. प्रवेशित विद्यार्थ्यांना यूपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२७ देणे बंधनकारक आहे.