आज अभियांत्रिकीचे जग वेगाने बदलत आहे. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा केमिकल अशा पारंपरिक शाखांबरोबरच सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, फोटॉनिक्स, अवकाश तंत्रज्ञान आणि सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स यांसारखी क्षेत्रे वेगाने विकसित होत आहेत. या विविध क्षेत्रांच्या संगमातून हाय-टेक इंजिनीअरिंगची नवी दिशा तयार होत आहे.

सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की हाय-टेक इंजिनीअरिंग ही मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकलसारखी स्वतंत्र पारंपरिक अभियांत्रिकी शाखा नाही. विविध अभियांत्रिकी शाखा, विज्ञान आणि संगणक तंत्रज्ञान यांचा एकत्रित वापर करून अत्याधुनिक समस्या सोडवण्याचे हे क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्याला आपल्या मूळ शाखेचे ज्ञान असण्याबरोबरच इतर विषयांचीही समज विकसित करावी लागते. हाय-टेक इंजिनीअरिंगचा आवाका आज अनेक उद्योगांमध्ये वाढत आहे. सेमीकंडक्टर, एरोस्पेस आणि संरक्षण, इलेक्ट्रिक वाहने, रोबोटिक्स, दूरसंचार, वैद्यकीय उपकरणे, ऊर्जा आणि प्रगत उत्पादन अशा विविध क्षेत्रांमध्ये त्याचा वापर होत आहे.

पारंपरिक अभियांत्रिकीमध्ये एखाद्या विशिष्ट शाखेतील मूलभूत तत्त्वांचा सखोल अभ्यास करून त्यांचा उपयोग यंत्रणा, उत्पादने किंवा औद्योगिक प्रक्रिया विकसित करण्यासाठी केला जातो. हाय-टेक इंजिनीअरिंगमध्ये मात्र अनेक विषयांचे ज्ञान एकत्रितपणे वापरले जाते. उदाहरणार्थ, एखादे अत्याधुनिक उपकरण विकसित करण्यासाठी मेकॅनिकल अभियांत्रिकीसोबत इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र, प्रकाशशास्त्र आणि पदार्थविज्ञानाचे ज्ञान आवश्यक असू शकते. हे क्षेत्र कोणत्या विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे? केवळ अभ्यासात चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर गणित-विज्ञानाची आवड, तंत्रज्ञानाबद्दल कुतूहल, प्रयोग करण्याची तयारी आणि समस्या सोडवण्याची वृत्ती असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र विशेष योग्य ठरू शकते. वेगवेगळ्या विषयांमधील संबंध समजून घेण्याची आणि सतत नवीन गोष्टी शिकण्याची तयारीही महत्त्वाची आहे.

हाय-टेक क्षेत्रातील करिअर केवळ ‘अभियंता’ या भूमिकेपुरते मर्यादित नसते. संशोधन आणि विकास, उत्पादनाची रचना, चाचणी, प्रणाली अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व्यवस्थापन तसेच उत्पादन व्यवस्थापन अशा अनेक भूमिका उपलब्ध असतात. त्यामुळे तांत्रिक ज्ञानासोबत व्यवस्थापन आणि संवादकौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही या क्षेत्रात संधी आहेत. भारतातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी या बदलत्या जगासाठी तयारी करताना सर्वप्रथम आपल्या मूळ शाखेचा पाया मजबूत करावा. त्याचबरोबर इतर तंत्रज्ञानांची प्राथमिक ओळख करून घ्यावी. मेकॅनिकल विद्यार्थ्याने इलेक्ट्रॉनिक्स, संगणक आणि स्वयंचलित प्रणाली समजून घेण्याचा प्रयत्न करावा, तर इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्याने संगणकशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाकडे लक्ष द्यावे.

फक्त अभ्यासक्रम आणि परीक्षांपुरते शिक्षण मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनी प्रकल्प, प्रयोग, संशोधन, इंटर्नशिप आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणे महत्त्वाचे आहे. भविष्यातील अभियंता हा केवळ एका शाखेचा तज्ज्ञ असण्यापेक्षा विविध तंत्रज्ञानांना जोडून विचार करणारा, समस्या सोडवणारा आणि सतत शिकत राहणारा व्यावसायिक असणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. हाय-टेक इंजिनीअरिंग ही केवळ एक नवीन शाखा नसून, भविष्यातील अभियांत्रिकीकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आहे.

हाय-टेक क्षेत्रातील काही अग्रगण्य विद्यापीठे

  1. एमआयटी, अमेरिका — सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध.
  2. स्टॅनफर्ड विद्यापीठ, अमेरिका — इलेक्ट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि नवतंत्रज्ञानासाठी संशोधन.
  3. ईटीएच झ्युरिक, स्वित्झर्लंड — प्रगत अभियांत्रिकी, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि बहुविषयक संशोधनासाठी प्रसिद्ध.
  4. टीयू डेल्फ्ट, नेदरलँड्स — एरोस्पेस, मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स आणि हाय-टेक अभियांत्रिकीसाठी विशेष ओळख.
  5. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (NUS), सिंगापूर — इलेक्ट्रॉनिक्स, संगणक तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि नव्या तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी उत्तम पर्याय.

आदित्य वानखडे

इस्रोच्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली आणि आदित्य वानखडेची करिअरची दिशा बदलली. मुंबईच्या आदित्यने २०१८ मध्ये पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यादरम्यान लार्सन अँड टुब्रोच्या एरोस्पेस आणि संरक्षण विभागात अभियंता म्हणून काम करताना त्यांना मानवरहित विमान प्रणाली तसेच इस्रोच्या प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाली. इस्रोच्या प्रकल्पांवर काम करण्याचा अनुभव त्याच्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा ठरला आणि तिथूनच हाय-टेक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.

आदित्यने एरोस्पेसशी संबंधित आणि विविध तांत्रिक शाखांचा समन्वय असलेल्या अभ्यासक्रमांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यातून त्याने युरोपातील तीन विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज केले. त्यापैकी तंत्रज्ञान शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या नेदरलँड्समधील डेल्फ्ट विद्यापीठाची निवड केली. एरोस्पेसमधील आपली आवड कायम ठेवत हाय-टेक अभियांत्रिकीच्या क्षेत्रात प्रवेश करता यावा, यासाठी आदित्यने एरोस्पेसशी संबंधित ऑप्टोमेकॅट्रॉनिक्स आणि हाय-टेक अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम निवडला. हा अभ्यासक्रम अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक होता. आदित्यच्या मते, युरोपमधील तंत्रज्ञान विद्यापीठातील शिक्षण विद्यार्थ्याला सतत आव्हान देत राहते. हा अनुभव सुरुवातीला खडतर असला तरी तो विद्यार्थ्याला अधिक सक्षम आणि कणखर बनवतो. या अभ्यासक्रमादरम्यान सादर केलेल्या प्रबंधामध्ये अतिशय सूक्ष्म पातळीवरील ताण मोजण्यासाठी प्रकाशाच्या साहाय्याने काम करणाऱ्या नव्या संवेदक तंत्राचा अभ्यास त्याने केला.

पदव्युत्तर शिक्षणानंतर आदित्यने नेदरलँड्समधील फोटॉनफर्स्ट या कंपनीत उत्पादन व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम केले. एरोस्पेस, संरक्षण आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रकाशाधारित संवेदक प्रणालींच्या विकासात त्यांनी काम केले. ग्राहकांच्या गरजा समजून घेणे, नवीन उत्पादनांची दिशा ठरवणे आणि संशोधन व अभियांत्रिकी टीम्ससोबत समन्वय साधणे हे त्याच्या कामाचे स्वरूप होते. २०२३ पासून आदित्य एएसएमएलमध्ये (ASML) उत्पादन व्यवस्थापनाच्या भूमिकेत कार्यरत असून, जगभरातील विविध उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्सच्या निर्मितीसाठी आवश्यक अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याच्या कामत तो व्यस्त आहे.

हाय टेक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्राविण्याबरोबरच आदित्य एक सर्जनशील कलाकारही आहे. तो स्वतः चित्रकार आणि शिल्पकार असून, नेदरलँड्समध्ये मुलांसाठी चित्रकलेच्या कार्यशाळाही घेतो. सध्या हाय-टेक क्षेत्रात काम करत असला तरी पुढील काही वर्षांनंतर कलेला अधिक वेळ देऊन कलेच्या क्षेत्रातही काम करण्याची त्याची इच्छा आहे.