अभियांत्रिकी, आर्किटेक्चर या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तसेच अनेक सार्वजनिक उद्योगांमध्ये नोकरीसाठी द्यावी लागणारी परीक्षा म्हणजेच गेट परीक्षेसंदर्भात देशातील सहा आय आय टी मधून अभियांत्रिकी मधील पदव्युत्तर शिक्षणासाठी १९८३ मध्ये पहिल्यांदा प्रवेश परीक्षा घेतली गेली. काळाच्या ओघात या परीक्षेचे स्वरूप व्यापक झाले असून आज रोजी देशातील सर्व आय आय टी सह अनेक शासकीय तसेच खाजगी महाविद्यालये , संस्था व विद्यापीठे यांत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व आर्किटेक्चर पदवीधरांना गेट नावाची राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

याशिवाय ओएनजीसी, गेल , भेल,सेल, एनटीपीसी , एचपीसीएल, बीपीसीएल सह अनेक सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमधील नोकरीसाठी गेट चा स्कोअर लागतो. सिंगापूर मधील एन टी यू आणि एन यू एस सारख्या ख्यातनाम विद्यापीठात तसेच जर्मनी मधील काही विद्यापीठात गेट च्या गुणांवर मास्टर्स साठी प्रवेश मिळतो. याशिवाय अभियांत्रिकी, आर्किटेक्चर पासून सायन्स आणि ह्यूमॅनिटीज पर्यंत अनेक क्षेत्रात डाॅक्टरल प्रोग्राम्स साठी ही परीक्षा द्यावी लागते.

अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, सायन्स, काॅमर्स, ह्युमॅनिटीज या शाखांमधून पदवी प्राप्त केलेल्या किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. परीक्षा फेब्रुवारी २०२७ मध्ये ६,७ तसेच १३,१४ आणि २०,२१ या तारखांना महाराष्ट्रातील अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बारामती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक , नवी मुंबई, पुणे , रत्नागिरी, सोलापूर, पंढरपूर, सांगली, सातारा, वर्धा , वसई इत्यादी ठिकाणी होईल. या मध्ये तीस विषयांची परीक्षा होईल मात्र विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दोन विषयांची परीक्षा देता येईल. यामध्ये फिजिक्स,केमिस्ट्री, बायो टेक्नॉलॉजी, डाटा सायन्स व ए आय पासून विविध अभियांत्रिकी शाखा , रोबोटिक्स, लाईफ सायन्सेस , इकाॅलाॅजी, जिऑलाॅजी पर्यंतच्या विषयांची परीक्षा घेतली जाते.

दरवर्षी एक कोणती तरी आय आय टी ही परीक्षा घेते , यंदा आय आय टी मद्रास ही परीक्षा घेणार आहे. या परीक्षेची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरता येतील. https://gate2027.iitm.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येतील. परीक्षा काॅम्प्युटरवर घेतली जाईल , प्रत्येक पेपरला तीन तास वेळ मिळेल. प्रत्येक पेपरमध्ये मल्टीपल चाॅईस , मल्टीपल सिलेक्ट व न्युमरीकल टाईप प्रश्न असतील. निगेटिव्ह मार्किंग असेल. वर उल्लेखलेल्या संकेतस्थळावरील माहिती पत्रकात प्रत्येक विषयाचे सिलॅबस , फाॅर्म कसा भरावा अशी विस्तृत माहिती आहे. याशिवाय २००७ पासूनच्या प्रश्नपत्रिकाही आहेत .

या परीक्षेचा निकाल १९ मार्च २०२७ रोजी जाहीर होणं अपेक्षित आहे. या परीक्षेचा स्कोअर पुढील तीन वर्षांसाठी ग्राह्य धरण्यात येईल. गेट मधील गुणांवर आधारित सरकारी संस्थांमध्ये प्रवेश मिळाला तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता खूपच असते.