GK Questions on Union Budget of India with Answers: दरवर्षी भारतात केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जातो. अर्थसंकल्प ही भारताची वार्षिक योजना असून त्याच्याकडे एक धोरणात्मक साधन म्हणून पाहिले जाते. हा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री मांडत असतात. त्यामध्ये निधीच्या वाटपाची मांडणी केलेली असते. त्यानुसार वर्षभरात विविध विभागांवर आणि विकासकामांवर पैसै खर्च केले जातात. यंदाचा ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७’ देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला.

आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वाधिकवेळा अर्थसंकल्प कोणत्या अर्थमंत्र्याने सादर केला याची माहिती आज आपण घेऊयात. निर्मला सीतारमण यांनी कितीवेळा अर्थसंकल्प सादर केला, तसेच स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाची माहिती जाणून घेऊयात…

कोणत्या अर्थमंत्र्यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प सादर केले?

भारताच्या इतिहासात सर्वाधिकवेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी तब्बल दहावेळा देशाचा अर्थसंकल्प मांडला होता. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या मंत्रीमंडळात असताना ते अर्थमंत्री होते. त्यावेळी त्यांनी तब्बल दहावेळा अर्थसंकल्प मांडले होते.

निर्मला सीतारमण यांनी कितीवेळा अर्थसंकल्प मांडला?

सध्याच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यंदा (२०२६-२७) सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. १ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांना केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडला होता. देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ९ वेळा अर्थसंकल्प मांडला होता. पण चिदंबरम यांनी तीन पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात (एच. डी. देवगौडा, आय. के. गुजराल आणि मनमोहन सिंग) असताना हे अर्थसंकल्प मांडले होते.

प्रणव मुखर्जी यांनी कितीवेळा अर्थसंकल्प मांडला?

सीतारमण यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करून यापूर्वी काही अर्थमंत्र्यांचे विक्रम मोडले आहेत. त्यामध्ये प्रणव मुखर्जी, ज्यांनी आठ वेळा अर्थसंकल्प मांडला होता. मोरारजी देसाई यांनी त्यांच्या अर्थमंत्रिपदाच्या काळात १९५९-१९६४ दरम्यान सहा आणि १९६७-१९६९ दरम्यान ४ अर्थसंकल्प मांडले होते. मोरारजी देसाई यांनी विविध कालावधीत आणि वर्षांमध्ये त्यांचे अर्थसंकल्प सादर केले होते पण सीतारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सलग नऊ अर्थसंकल्प सादर केले आहेत.

सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण कोणत्या अर्थमंत्र्यांनी केले होते?

आतापर्यंतचे सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले आहे. १ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांनी दोन तास ४० मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण केले होते.