आशुतोष शिर्के, रश्मी पटवर्धन
परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांसाठी गुण, प्रवेश परीक्षा, भाषा-चाचण्या किंवा विद्यापीठांची नावे या सार्याला अनन्य-साधारण महत्त्व असते. पण जगातील अनेक प्रतिष्ठित विद्यापीठे आणि शिष्यवृत्ती ज्या गोष्टीला महत्त्व देतात, ती गोष्ट आपल्या शिक्षण-व्यवस्थेत अनेकदा दुर्लक्षितच राहते. ती गोष्ट म्हणजे नेतृत्व!
आपल्या समाजात नेतृत्व या संकल्पनेकडे अनेकदा ‘नेता-गिरी’ या नकारात्मक अर्थाने पाहिले जाते. त्यामुळे नेतृत्व म्हणजे पद, प्रसिद्धी किंवा लोकांवर अधिकार गाजवणे अशी मर्यादित समजूत आम्ही तयार केली आहे. प्रत्यक्षात नेतृत्व म्हणजे एखाद्या प्रश्नाची जबाबदारी स्वीकारणे, लोकांना सोबत घेणे आणि सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करणे.
समाजातील अशा विचित्र समजामुळे आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात योग्य नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी फारशा संधी उपलब्ध नाहीत. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन प्रामुख्याने परीक्षेतील कामगिरीवर होते. त्यामुळे इंटर्नशिप, प्रकल्प किंवा स्वयंसेवी कामांकडे अनेक विद्यार्थी केवळ औपचारिकता म्हणून पाहतात. हेच पुढे परदेशी शिक्षणासाठी अर्ज करताना त्यांच्यासमोर मोठे आव्हान ठरते असा आमचा आजवरचा अनुभव आहे.
परदेशातील विद्यापीठे आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेपेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हाच पैलू शोधत असतात. कारण त्यांना केवळ यशस्वी व्यावसायिक घडवायचे नसतात. त्यांना समाजात अर्थपूर्ण बदल घडवू शकणारे नागरिक घडवायचे असतात. आणि म्हणूनच परदेशी शिक्षणाचे स्वप्न पाहणार्या प्रत्येक विद्याथ्र्याने गुणां-इतक्याच गांभीर्याने नेतृत्व-विकासाच्या प्रवासालाही सुरुवात करायला हवी.
उदाहरणादाखल ब्रिटन सरकारची चेव्हनिंग शिष्यवृत्ती घेऊ. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम भविष्यातील नेते आणि परिवर्तन-कर्ते शोधणारा म्हणूनच ओळखला जातो. त्याच दृष्टीने विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येतो. फुलब्राइट-नेहरू ही आणखी एक विख्यात शिष्यवृत्ती! यासाठी शैक्षणिक गुणवत्तेबरोबर नेतृत्व, सामाजिक जाणीव आणि सार्वजनिक योगदान यांना प्रचंड महत्त्व दिले जाते. निवड प्रक्रियेत उमेदवाराने कोणत्या समस्यांवर काम केले, कोणत्या लोकांसोबत काम केले, त्याने कोणता बदल घडवण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यात समाजासाठी त्याची दृष्टी काय आहे, यावर भर दिला जातो. ही तुरळक उदाहरणे नाहीत जगातील सर्व उत्तम विद्यापीठे नेतृत्व-गुणाला सर्वात अधिक महत्त्व देतात.
म्हणूनच परदेशी शिक्षणाची तयारी ही केवळ गुण वाढवण्याची प्रक्रिया नसते. विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक निवडलेल्या प्रकल्पांमध्ये, संशोधनात, सामाजिक उपक्रमांमध्ये किंवा स्वयंसेवी कामांमध्ये सहभागी होणे आवश्यक असते. मात्र हे काम केवळ प्रमाणपत्रासाठी नसावे. ते आपल्या मूल्यांशी, कुतूहलाशी आणि सामाजिक जाणिवेशी जोडलेले असावे. अर्थात अशी कामे निवडली पाहिजेत जी आपली दृष्टी व्यापक करतात, संकुचित नव्हे.
नेतृत्वाची सुरुवात लोकांना मार्गदर्शन करण्यापासून होत नाही. ती स्वत:ला प्रश्न विचारण्यापासून सुरू होते. कोणत्या प्रश्नांनी मला अस्वस्थ केले आहे? कोणत्या बदलासाठी मी काम करू इच्छिते? कोणत्या मूल्यांसाठी मी उभा राहू शकतो? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रक्रियेत नेतृत्व विकसित होते.
प्रवीणची सामाजिक बांधिलकी
इंजिनीअरिंगच्या पहिल्याच वर्षी नापास झाल्यानंतर प्रवीण निकम याने स्वत:साठी नवा मार्ग निवडला. आयएएस होण्याचे स्वप्न घेऊन त्यांनी पुण्यातील एस. पी. महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयात पदवी शिक्षण घेतले. या काळात नेहरू युवा केंद्रासोबत काम करताना त्याचा युवकांच्या प्रश्नांशी जवळचा संबंध आला. त्याच्या कार्याची दखल घेत २०१४ मध्ये त्यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुमन करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. पुढे ‘लॅम्प फेलोशिप’ आणि ‘नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली’च्या ‘प्रोजेक्ट ३९ए – ॲक्सेस टू जस्टिस’ या उपक्रमांतर्गत काम करताना त्यांची सामाजिक न्याय आणि सार्वजनिक धोरणांविषयीची समज अधिक व्यापक झाली. युवक नेतृत्व आणि सामाजिक कार्यातील योगदानासाठी त्यांना ‘कॉमनवेल्थ यूथ वर्कर अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
या सार्या अनुभवांतून त्यांच्या मनात ‘समावेश’ या संस्थेची कल्पना आकाराला आली. वंचित समुदायांसाठी संस्थात्मक पातळीवर काम उभे करण्यासाठी जागतिक दृष्टी आणि कौशल्यांची गरज असल्याची जाणीव झाल्याने त्यांनी परदेशात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
सुप्रसिद्ध ‘चेव्हनिंग’ शिष्यवृत्तीसाठीच्या निवड प्रक्रियेत त्यांच्या शैक्षणिक गुणांपेक्षा नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि समाजात बदल घडवण्याच्या दृष्टिकोनाला अधिक महत्त्व देण्यात आले. त्यानंतर त्यांनी जगविख्यात ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’ येथे ‘ह्युमन राइट्स अँड पॉलिटिक्स’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
२०२१ मध्ये स्थापना झालेली ‘समावेश’ ही संस्था आज शिक्षण, सामाजिक सुरक्षा, नेतृत्व विकास आणि वंचित समुदायांसाठी संधी निर्माण करण्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम करत आहे. प्रवीण निकम यांचा आजवरचा प्रवास पाहून काय वाटते? नेतृत्व, संवेदनशीलता आणि समाजासाठी काहीतरी उभे करण्याची जिद्द हीच त्यांची खरी ताकद होती आणि असणार आहे.
mentorashutosh@gmail.com (लेखक करिअर समुपदेशक आहेत.)
