आशुतोष शिर्के, रश्मी पटवर्धन

संशोधक होण्याचा प्रवास गुणांपेक्षा कुतूहलापासून सुरू होतो. एखाद्या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्याची ओढ आणि सतत प्रश्न विचारण्याची वृत्ती ही त्याची सुरुवात असते. दहावी किंवा बारावीनंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना साधारणपणे दोनच पर्याय दिसतात. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षण. मात्र विज्ञानाचा प्रवास या दोन मार्गांपुरता मर्यादित नाही. ज्यांना केवळ उपलब्ध ज्ञान आत्मसात करायचे नसते, तर नवीन ज्ञान-निर्मितीत योगदान द्यायचे असते अशा तरुणांच्या शोधात आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आणि संशोधन संस्था असतात. संशोधक होण्याचा प्रवास गुणांपेक्षा कुतूहलापासून सुरू होतो. एखाद्या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्याची ओढ आणि सतत प्रश्न विचारण्याची वृत्ती ही त्याची सुरुवात असते.

जैवभौतिकी, जनुकशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, न्यूरोसायन्स, हवामान विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश संशोधन किंवा ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये आज जगभरात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे.या क्षेत्रात पुढे जायचे असल्यास विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन काळातच प्रयोगशाळांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करावा. संशोधन प्रकल्प, इंटर्नशिप, संशोधन लेखांचे वाचन आणि परिषदांमधील सहभाग यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. संशोधन क्षेत्रात केवळ परीक्षेतील गुण महत्त्वाचे नसतात; जिज्ञासा, चिकाटी, विश्लेषण-क्षमता आणि नवीन प्रश्न विचारण्याची क्षमता तितकीच महत्त्वाची असते.
जागतिक संशोधनाच्या संधी शोधण्यासाठीही विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा लागतो.

संशोधन क्षेत्रात संधी अनेकदा आपल्या दारात येत नाहीत. त्या शोधाव्या लागतात. आवडीच्या क्षेत्रातील संशोधक, प्रयोगशाळा आणि विद्यापीठांच्या कामाचा नियमित मागोवा घेणे आवश्यक असते. अनेक विद्यार्थ्यांना परदेशातील पीएच.डी. शिक्षण परवडणारे नाही असे वाटते. प्रत्यक्षात अनेक देशांमध्ये पीएच.डी. कार्यक्रम पूर्णपणे निधीसह असतात. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्टायपेंड आणि संशोधनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
उत्कृष्ट संशोधनासाठी केवळ बौद्धिक क्षमता पुरेशी नसते. प्रश्न विचारण्याची मोकळीक, साधनसामग्री आणि संशोधनासाठी आवश्यक पाठबळही तितकेच महत्त्वाचे असते. म्हणूनच विज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी केवळ चौकटीतल्या करिअरचा विचार न करता परदेशी विद्यापीठांमधील संशोधन आणि ज्ञाननिर्मितीमध्ये सामील कसे होता येईल हा विचार करायला हवा.

भारतामध्ये पीएचडीचा विचार बहुतांशी केवळ थीसिस पूर्ण करून डॉक्टर हे बिरुद लावण्यासाठीची धडपड इथपर्यंतच राहतो. आघाडीच्या परदेशी विद्यापीठांमध्ये मात्र संशोधनामध्ये महत्त्वाची भर टाकणे आणि त्यासाठी जे शक्य ते सारे प्रयत्न करणे हा दृष्टिकोन असतो. उद्याच्या जगाला आकार देणारे शोध कोणीतरी दुसरे लावणार नाहीत. ते आज विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडूनच लागतील. विज्ञानाची आवड, संशोधनाची जिज्ञासा शालेय वयापासून विज्ञान क्षेत्रात रुची असलेल्या तुषार रासकरने मुंबई विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्रात बी.एस्सी. आणि जैवभौतिकी विभागातून एम.एस्सी. बायोफिजिक्स पदवी संपादन केली. एचआयव्ही-१ प्रोटीएज या औषध प्रतिरोधक प्रथिनांवरील त्याचे संशोधन विशेष उल्लेखनीय ठरले.

या दरम्यान त्याने भाभा अणुसंशोधन केंद्र वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद तसेच कर्करोग संशोधन संस्थांसह विविध संस्थांमध्ये संशोधन सहाय्यक म्हणून काम केले. प्रथिनांची रचना, त्यांचे वर्तन आणि जैविक प्रक्रियांमधील भूमिका यांचा अभ्यास करताना त्याला संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच तुषारने त्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था, प्रयोगशाळा आणि पीएच.डी. कार्यक्रमांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.

संशोधन क्षेत्रातील विविध नेटवर्क्स आणि बुलेटिन बोर्ड्सचा नियमित अभ्यास करत असताना त्याला संरचनात्मक जीवशास्त्र क्षेत्रातील संशोधन संधींची माहिती देणाऱ्या CCP4 Bulletin Board या व्यासपीठावर जर्मनीतील हॅम्बुर्ग विद्यापीठ आणि फ्रान्समधील इन्स्टिट्यूट लोवे-लाँगेव्हिन यांच्या संयुक्त पीएच.डी. कार्यक्रमाची माहिती मिळाली. गुणवत्तेच्या आधारे त्याची या कार्यक्रमासाठी निवड झाली. ही पीएच.डी. पूर्णपणे निधीसह होती. संशोधनासाठी आवश्यक खर्च, राहण्याचा खर्च तसेच शिष्यवृत्तीच्या स्वरूपातील आर्थिक सहाय्य या कार्यक्रमातून उपलब्ध करून देण्यात आले.

या शिष्यवृत्तीअंतर्गत तुषारने जर्मनीतील हॅम्बुर्ग आणि फ्रान्समधील ग्रेनोबल येथे राहून न्यूट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी, क्रिस्टलोग्राफी आणि संरचनात्मक जीवशास्त्रातील अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून प्रथिने आणि एन्झाइम्सच्या सूक्ष्म रचना व कार्यपद्धतींचा अभ्यास केला. या काळात त्याला विविध देशांतील वैज्ञानिकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. उत्कृष्ट पायाभूत सुविधा, अत्याधुनिक उपकरणे, प्रश्न विचारण्याची मोकळीक आणि परस्पर आदरावर आधारित शैक्षणिक वातावरण यांचा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जडणघडणीवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला. पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर तुषारने अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को येथे पोस्टडॉक्टरल संशोधक म्हणून काम केले.

सध्या त्यांची युरोपमधील सेंट्रल युरोपियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. येथे तुषार रासकर क्रायो-इलेक्ट्रॉन टोमोग्राफी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अल्झायमर आणि पार्किन्सन्ससारख्या आजारांनी प्रभावित झालेल्या मज्जापेशींच्या सूक्ष्म संरचनांचा अभ्यास करणार आहेत. तुषारच्या नावावर अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध प्रकाशित झाले असून विविध प्रतिष्ठित परिषदांमध्ये त्यांनी संशोधन सादर केले आहे. मुंबई विद्यापीठातील शिक्षणापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज युरोपमधील आघाडीच्या संशोधन संस्थेपर्यंत पोहोचला आहे. विज्ञानाची आवड, संशोधनाची जिज्ञासा आणि जागतिक संधींचा सातत्याने शोध घेत राहिल्यास भारतीय विद्यार्थ्यांसाठीही अशा वाटा खुल्या होऊ शकतात, हे त्यांच्या प्रवासातून दिसून येते.

संशोधनाच्या संधी शोधण्यासाठी उपयुक्त व्यासपीठे

FindAPhD – जगभरातील पीएच.डी. कार्यक्रम आणि संशोधन प्रकल्पांची माहिती.
Nature Careers – संशोधन, पीएच.डी., पोस्टडॉक आणि विज्ञान क्षेत्रातील करिअरविषयक संधी.
EURAXESS – युरोपमधील संशोधन संधी आणि फेलोशिपविषयक माहिती.
DAAD – जर्मनीतील उच्च शिक्षण, संशोधन आणि शिष्यवृत्ती कार्यक्रमांची माहिती.
ResearchGate – संशोधकांचे जागतिक नेटवर्क. संशोधन लेख आणि संशोधकांशी संपर्क साधण्यासाठी उपयुक्त.

याशिवाय अनेक संशोधन संस्था, विद्यापीठे आणि विषय-विशिष्ट नेटवर्क्स त्यांच्या संकेतस्थळांवर संशोधनाच्या संधी जाहीर करतात.