How To Teach Good Habits To Kids : मुलांना केवळ चांगले शिक्षणच नाही, तर चांगले संस्कारही महत्त्वाचे आहेत, कारण- हीच मुलं उद्याचं भविष्य असतात. त्यामुळे पालकांनी मुलांना लहान वयातच चांगल्या-वाईट गोष्टींची शिकवण दिली पाहिजे. त्यांचे चांगले संगोपन केले पाहिजे. कारण- जेव्हा ही मुलं मोठी होतात तेव्हा त्यांचं वागणं, बोलणं व संस्कार यावरून समाज त्यांना ओळखतो. त्यामुळे मुलं लहान वयात ज्या चुका करतात, त्याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. कारण- त्यांची ही चुकीची सवय भविष्यात त्यांचं आुयुष्य बिघडवण्यास जबाबदार ठरू शकते. त्यामुळे तीन वर्षांनंतर पालकांनी आपल्या मुलांना कोणत्या चांगल्या आणि महत्त्वाच्या गोष्टी शिकवणं गरजेचं आहे ते जाणून घेऊ…

मुलांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी

C

१) मुलांना लहानपणापासूनचं हे तीन शब्द म्हणायला शिकवा

प्रत्येक व्यक्तीसाठी प्लीज, थँक्यू व सॉरी हे खूप चांगले आणि महत्त्वाचे शब्द आहेत. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच ‘प्लीज’, ‘सॉरी’ व ‘थँक्यू’ या शब्दांचे महत्त्व पटवून सांगा. मुलांना प्रेमानं समजावून सांगा की, जेव्हा तुम्ही कोणाला काही विचारता किंवा विचारण्यासाठी विनंती करता तेव्हा त्या वेळी प्लीज म्हणा. जेव्हा तुम्ही एखाद्याची मदत घेता किंवा कोणती वस्तू वापरण्यासाठी घेता तेव्हा थँक्यू म्हणा. तुमची चूक झाली असेल, तर ती मान्य करा आणि समोरच्या व्यक्तीला सॉरी म्हणा. पालकांनी स्वतःदेखील मुलांशी असंच वागलं पाहिजे.

२) कोणाच्याही वस्तूंना न विचारता हात लावू नका

कोणाच्याही वस्तूंना न विचारता हात न लावण्याची सवय मुलांना लहानपणापासूनच लागणं खूप गरजेची आहे. वस्तू वापरण्यापूर्वी ती वस्तू ज्यांची आहे, त्यांना नेहमी विचारा. इतर लोकांच्या वस्तू न विचारता आणि परवानगी न घेता वापरणं ही चांगली गोष्ट नाही.

३) विचारूनच एखाद्याच्या घरात जाण्याची सवय

लहान वयातच मुलांना गोपनीयतेचं महत्त्व शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. विशेषत: दुसऱ्यांच्या घरात जाण्यापूर्वी किंवा कोणाच्याही खोलीत शिरण्यापूर्वी दार ठोठावणं किंवा परवानगी घेणं गरजेचं आहे. एवढेच नाही, तर मुलाचीही घरात वेगळी रूम असेल, तर पालकांनी दार ठोठावूनच त्यांच्या रूममध्ये प्रवेश करावा.

४) नीट बोलण्याची सवय लावणे

घरात मुलांसमोर ओरडू नये, रागावू नये. एवढेच नाही, तर त्याला शिकवा की, तो एखाद्या गोष्टीबद्दल कितीही नाराज किंवा रागावला असला तरी त्यानं आपलं मत शांतपणे व्यक्त केलं पाहिजे. कोणाचाही अपमान होणार नाही या पद्धतीनं आपल्या गोष्टी पटवून दिल्या पाहिजेत.

५) स्वच्छता

तुमच्या मुलाला खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल घेण्याची सवय लावा. नेहमी त्याच्या खिशात रुमाल ठेवा किंवा कपड्यांवर पिन करा. त्याशिवाय काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी हात धुण्याची सवय लावा.

६) कोणी बोलताना मधे बोलू नये

तुमच्या मुलाला एक चांगला श्रोता बनवा आणि त्याला या चांगल्या सवयीचे फायदे सांगा. त्याला शिकवा की, जेव्हा समोरची व्यक्ती बोलत असेल तेव्हा त्याला त्याचा मुद्दा पूर्ण करू द्या, त्याचं बोलणं पूर्ण होईपर्यंत थांबा आणि मगच तुमचा मुद्दा मांडा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७) कोणाचीही चेष्टा-मस्करी करू नका

जरी तुमच्या लहान मुलाला ही सवय लागली असेल तरी ती त्वरित बदलण्याचा प्रयत्न करा. मुलं प्रथम त्यांच्या कुटुंबातील मोठ्यांकडून चांगल्या-वाईट सर्व काही गोष्टी शिकतात. अशा वेळी त्यांच्यासमोर इतरांची चेष्टा-मस्करी करू नका.