परीक्षेचा आणि तयारीचा खूप ताण अजिबात घेऊ नका. मन स्थिर आणि शरीर तंदुरुस्त ठेवा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खूप लवकर तयारीला सुरुवात करू नका. तसे केल्यास तुमची ऊर्जा वेळेआधीच संपून जाते. तुमचा पदवी अभ्यासक्रम संपत असताना तुम्ही यूपीएससीसाठी तयारी करणे सुरू करा. ती योग्य वेळ आहे, असा सल्ला दिला आहे, आनंद रेड्डी, भारतीय वन सेवा उपसंचालक (कोअर), ताडोबाअंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांनी.

खरे तर मी इंजिनीअरिंगचा विद्यार्थी. प्रॉडक्ट डिझाईन इंजिनीअरिंगमध्ये बीटेक झाल्यावर मी आयआयटी मद्रासला एमटेकसाठी प्रवेश घेतला. मी ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग अभ्यासक्रम निवडला होता. तेव्हा यूपीएससीचा विचारसुद्धा मनात नव्हता. पण एक दिवस एका भाषणाने माझ्या जीवनाला कलाटणी दिली. एमटेक करीत असताना प्रख्यात लेखक आणि पत्रकार पी. साईनाथ यांचे भाषण आमच्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भारताचे चित्र आमच्यासमोर मांडले. इंडिया आणि भारत यात काय फरक आहे, ग्रामीण भागातील जनता कशी जगते आहे, हे त्यांनी इतक्या प्रभावीपणे मांडले की माझ्या विचारांना त्यांनी नवी दिशा दिली. बदल घडवून आणायचा असेल तर सिव्हिल सर्विसेसमध्येच जायला हवे, असे माझ्या मनाने घेतले.

हेही वाचा >>> upscची तयारी: भारताचे परराष्ट्र धोरण

यूपीएससीचा विचार मनात आला तरी मला इंजिनीअरिंग सोडून ते करायचे नव्हते. म्हणून मी तेव्हा इंजिनीअरिंगच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. २०१२ मध्ये माझे एमटेक पूर्ण झाले. कॅम्पस मुलाखतीतून मला एका जपानी कंपनीत नोकरी लागली. मी महिनाभर ती नोकरी केली. मग माझ्या लक्षात आले की कॉर्पोरेट संस्कृतीत मी फिट बसत नाही. मला सिव्हिल सर्विसेसमध्येच जायचे आहे. त्यामुळे मी नोकरीला रामराम केला आणि थेट दिल्ली गाठली. आयपीएस होण्याचे स्वप्न मी उराशी बाळगले होते.

दक्षिण भारतातून येऊन दिल्लीशी म्हणजे उत्तर भारताशी जुळवून घेणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान होते. तिथले हवामान मला त्रासदायक वाटत होते. तिथल्या खाद्यासंस्कृतीशी माझे जमत नव्हते. तरीही मनात निश्चय दृढ होता. मी क्लास लावला आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले.

विशिष्ट पॅटर्नमध्येअभ्यास केला नाही

माझा अभ्यासाचा विशिष्ट असा पॅटर्न नव्हता. पण मी खूप वाचायचो. मला सकाळी लवकर उठणे जमायचे नाही. त्यामुळे मी रात्री उशिरापर्यंत म्हणजे दोन-तीन वाजेपर्यंत अभ्यास करायचो. २०१३ मध्ये मी पूर्व उत्तीर्ण झालो, पण मेन्स पार करता आली नाही. आता दुसरा प्रयत्न करताना काहीतरी अर्थार्जन करणेही गरजेचे बनले होते. म्हणून मी सिव्हिल सर्विसेस कोचिंग क्लासेसच्या प्रश्नपत्रिका बनवून द्यायचे काम करू लागलो. त्याचा मला फायदाच झाला. कारण त्या निमित्ताने माझा अभ्यास आणखी पक्का झाला. २०१४ मध्ये मी दुसऱ्यांदा प्रयत्न केला. मात्र त्यातही अपयश पदरी आले. दिल्लीत असतानाच मला माझी जीवनसाथी श्वेता भेटली. नंतर आम्ही दोघे एकाच वर्षी आयएफएस झालो.

दुसरा प्रयत्न अयशस्वी झाला तरी माझे दोन फायदे झाले होते. एव्हाना वनसेवेत जायचे हे मी ठरवले होते. निसर्गाची आवड होतीच. त्यामुळे त्याच क्षेत्रात काम करावे असे मनाशी पक्के केले होते. तसेच यूपीएससीच्या अभ्यासासाठी दिल्लीतच राहण्याची गरज नाही, हेसुद्धा ध्यानात आले होते. दरम्यानच्या काळात मी स्टाफ सिलेक्शनची परीक्षा दिली होती. ती उत्तीर्ण होऊन मला विशाखापट्टणमला कस्टममध्ये नोकरी मिळाली होती. मी ती स्वीकारली आणि नोकरी करतानाच आयएफएससाठी प्रयत्न करण्याचे ठरवले.

ताण व्यवस्थापनासाठीव्यायाम गरजेचा

यूपीएससीसाठी तयारी करणे हे सोपे काम नाही. त्यासाठी मनाची आणि शरीराची तयारी करावी लागते. विशेषत: मानसिक ताणाचे व्यवस्थापन करावे लागते. दिल्लीत असताना मी नियमित चालण्याचा व्यायाम करायचो. विशाखापट्टणममध्ये मी टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती राखता आली. २०१६ ला विशाखापट्टणमला नोकरीत रुजू झालो. त्याच वर्षी मी तिसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. २०१७ ला निकाल लागला आणि मी आणि श्वेता दोघेही वनसेवेत रुजू झालो. आम्ही दोघेही निवडलेल्या करिअरबद्दल खूप समाधानी आहोत. इथे आम्हाला मनासारखे काम करायला मिळते.

ज्यांना वनसेवेत येण्याची इच्छा आहे त्यांना मी सांगू इच्छितो की हे अत्यंत सुरेख करिअर आहे. विशेषत: महिलांनी तर आवर्जून या क्षेत्रात यायला हवे. आपले जंगल, वन्यजीव आणि वनसंपदेचे रक्षण करण्याची खूप मोठी जबाबदारी तुम्हाला पार पाडता येते. इथे तुम्हाला कामाचे स्वातंत्र्य मिळते. तुमच्या कामामुळे खूप मोठा बदल घडून येतो आणि तो तुम्हाला स्वत: पाहता येतो. तो बदल पाहून जे समाधान मिळते त्याची तुलना कशीशीही करता येणार नाही.

मन स्थिर आणि शरीरतंदुरुस्त ठेवा

तसेच परीक्षेचा आणि तयारीचा खूप ताण अजिबात घेऊ नका. मन स्थिर आणि शरीर तंदुरुस्त ठेवा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खूप लवकर तयारीला सुरुवात करू नका. तसे केल्यास तुमची ऊर्जा वेळआधीच संपून जाते. तुमचा पदवी अभ्यासक्रम संपत असताना तुम्ही यूपीएससीसाठी तयारी करणे सुरू करा. ती योग्य वेळ आहे, असे मला वाटते. तयारीसाठी दिल्लीला जाण्याचीही आवश्यकता नाही. आता सर्व काही ऑनलाइन उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्या आणि स्वत:च्या शहरात राहून अभ्यास करा. लक्ष विचलित होऊ देऊ नका. यश तुमचेच आहे.

शब्दांकन : अनंत सोनवणे

आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail. com