आशुतोष शिर्के,रश्मी पटवर्धन
फेलोशिप म्हणजे आपल्या क्षमतेकडे नव्या नजरेने आणि आत्मविश्वासाने पाहण्याची संधी आहे. अनेकांच्या आयुष्याला यातून नवी दिशा मिळाली आहे. म्हणूनच, येत्या काळात केवळ “कोणत्या विद्यापीठात प्रवेश मिळाला?” एवढाच प्रश्न महत्त्वाचा राहणार नाही, तर “कोणती फेलोशिप आपल्या क्षमतांना योग्य दिशा देऊ शकते?” हा प्रश्न सुद्धा पुढच्या मार्गक्रमणासाठी तितकाच निर्णायक ठरणार आहे.
परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये ‘स्कॉलरशिप’ हा शब्द आता बराच परिचित झाला आहे. मात्र ‘फेलोशिप’ ही संकल्पना अजूनही अनेकांसाठी धूसर आहे.
सोप्या भाषेत सांगायचं तर, स्कॉलरशिप ही मुख्यतः शिक्षणासाठीची आर्थिक मदत असते. पण फेलोशिप ही केवळ आर्थिक मदत नसते. ती एखाद्या विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेवर, संशोधनवृत्तीवर, नेतृत्वगुणांवर आणि भविष्यातील योगदानावर ठेवलेला विश्वास असतो. स्कॉलरशिप म्हणजे, “तुला शिकण्यासाठी आम्ही मदत करतो.” असं म्हणणं आहे आणि फेलोशिप म्हणजे, “तुझ्यात काही वेगळं घडवण्याची क्षमता दिसते आहे आणि आम्ही त्या प्रवासात तुझ्यासोबत आहोत.” असं सांगणं आहे.
परदेशातील विद्यापीठे फेलोशिप्ससाठी आज केवळ गुण पाहून विद्यार्थ्यांची निवड करत नाहीत. त्यांना प्रश्न विचारणारे, जिज्ञासू, संवेदनशील आणि समाजाकडे व्यापक नजरेने पाहणारे विद्यार्थी हवे असतात. म्हणूनच अनेक फेलोशिपमध्ये शिक्षण शुल्कासोबत राहण्याचा खर्च, मासिक मानधन, संशोधनासाठी निधी, मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधी आणि जागतिक पातळीवरील नेटवर्कशी जोडून घेण्याची संधी या सार्याचा समावेश असतो.
समजा, पुण्यातील एखाद्या विद्यार्थिनीला जनुकशास्त्रात संशोधन करायचे आहे. ती जर्मनीतील संशोधन-आधारित फेलोशिपसाठी अर्ज करते. तिची निवड झाल्यानंतर केवळ तिच्या शिक्षणाचा खर्च भागत नाही, तर अत्याधुनिक प्रयोगशाळेत काम करण्याची संधी मिळते. विविध देशांतील संशोधकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळते. तिचा आत्मविश्वास, विचार करण्याची पद्धत आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो. हीच फेलोशिपची खरी ताकद आहे.
आज जगभरात अनेक प्रतिष्ठित फेलोशिप उपलब्ध आहेत. ‘फुलब्राइट’, ‘चेव्हनिंग’, ‘रोड्स’, ‘डीएएडी’, ‘इरास्मस मुंडस’ यांसारख्या संधी केवळ आर्थिक सहाय्य देत नाहीत, तर विद्यार्थ्यांना जागतिक बौद्धिक समुदायाचा भाग बनवतात. अनेकदा अशा फेलोशिपमधूनच पुढे संशोधन, सार्वजनिक धोरण, आंतरराष्ट्रीय संस्था किंवा जागतिक उद्योगक्षेत्रातील संधींची दारे उघडतात. आज चीन, जर्मनी, जपान, सिंगापूर आणि युरोपमधील अनेक देश जागतिक प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फेलोशिप आणि संशोधन निधी उपलब्ध करून देत आहेत. ही केवळ शिक्षणातील स्पर्धा नाही. भविष्यातील संशोधक, तंत्रज्ञ आणि विचारवंत घडवण्याची जागतिक शर्यत आहे.
फेलोशिपसाठी अर्ज करताना विद्यार्थ्याचा विचार किती स्पष्ट आहे, त्याला कोणते प्रश्न अस्वस्थ करतात, भविष्यात ती कोणत्या दिशेने काम करू इच्छिते, समाजाशी तिचे नाते कसे आहे, हेही पाहिले जाते. त्यामुळे स्वयंसेवी काम, लेखन, प्रकल्प, इंटर्नशिप, नेतृत्व अनुभव यांना विशेष महत्त्व असते.
अनेक भारतीय विद्यार्थ्यांना अजूनही वाटते की अशा संधी फक्त तथाकथित ‘हुशार’ ठरलेल्या किंवा मोठ्या शहरांतील उच्च-मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असतात. प्रत्यक्षात मात्र प्रामाणिक जिज्ञासा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि व्यापक दृष्टिकोन असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या संधी खुल्या आहेत. आज असे अनेक विद्यार्थिनी- विद्यार्थी ह्या संधी मिळवत आहेत.
फेलोशिप म्हणजे आपल्या क्षमतेकडे नव्या नजरेने आणि आत्मविश्वासाने पाहण्याची संधी आहे. अनेकांच्या आयुष्याला यातून नवी दिशा मिळाली आहे. म्हणूनच, येत्या काळात केवळ “कोणत्या विद्यापीठात प्रवेश मिळाला?” एवढाच प्रश्न महत्त्वाचा राहणार नाही, तर “कोणती फेलोशिप आपल्या क्षमतांना योग्य दिशा देऊ शकते?” हा प्रश्न सुद्धा पुढच्या मार्गक्रमणासाठी तितकाच निर्णायक ठरणार आहे.
समजुतींना छेद देणारा प्रवास
नववीत नापास झाल्यानंतर रांजणगाव सांडसमधल्या राजेश पाटोळेने ‘फॉर्म १७’ भरून दहावीची परीक्षा दिली. प्राध्यापकांच्या प्रभावामुळे राज्यशास्त्रामध्ये रस निर्माण झाला. बारावीत चांगले गुण मिळवले आणि पुण्यातल्या एस. पी. महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली. राजेशला किक-बॉक्सिंगचीही आवड होती. खेळ आणि पुढील शिक्षण या दोन्ही संधींसाठी त्यांनी मुंबई गाठली.
मुंबई विद्यापीठामधून एम. ए. करत असताना त्यांची संशोधन क्षेत्राशी ओळख झाली. पुढे प्रा. डॉ. मृदुल निळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘तिबेटन युवांमधील राजकीय दृष्टि’ या विषयावर संशोधन केले. याच काळात आंतरराष्ट्रीय संबंध, भू-राजकारण, भारत-चीन संबंध, इंडो-पॅसिफिक रणनीती आणि तैवान या विषयांमध्ये राजेशला सखोल रुची निर्माण झाली. निळे सरांच्या मार्गदर्शनाखाली मग याच विषयामध्ये पीएच. डी. करण्याचे ठरले. चीनच्या ‘सिल्क रूट’ ते भारत-तैवान संबंध, इंडो-पॅसिफिक रणनीती आणि सीमाविषयक प्रश्नांपर्यंत विविध विषयांवर त्यांनी शोधनिबंध लिहिले.
या सर्व प्रयत्नांमधून तैवान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिष्ठित ‘तैवान फेलोशिप’ राजेशना मिळाली. ही फेलोशिप आंतरराष्ट्रीय संशोधकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या फेलोशिपअंतर्गत त्यांनी २०२३ मध्ये तैवानमधील ‘मिंग चुआन युनिव्हर्सिटी’ आणि ‘टॅमकांग युनिव्हर्सिटी’ या दोन विद्यापीठात ‘व्हिजिटिंग स्कॉलर’ म्हणून संशोधन केले.
तैपेईमध्ये वास्तव्यास असताना त्यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील बदलते सामरिक समीकरण, तैवानचे भू-राजकीय महत्त्व आणि चीन-तैवान तणावाचा आशियाई सुरक्षेवर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला. या काळात धोरणकर्ते, मुत्सद्दी, संशोधक आणि विविध देशांतील अभ्यासकांशी थेट संवाद साधला. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि मॅल्कम टर्नबुल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्याची तसेच मुलाखती घेण्याची संधी मिळाली.
राजेश पाटोळे यांच्या अनेक संशोधन लेखांची शैक्षणिक वर्तुळात विशेष दखल घेतली गेली आहे. लवकरच ते मुंबई विद्यापीठामध्ये आपला पीएच. डी. चा प्रबंध सादर करणार आहेत.
