‘कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेला पर्याय नाही; तर ती मानवी सर्जनशीलता आणि कल्पकता वाढवण्याचे एक साधन आहे.’
आज कृत्रिम बुद्धिमत्तेने सर्व क्षेत्रांना व्यापले आहे. यूपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर चॅटजीपीटी, जेमिनी व इतर एआय प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे रोबोट्स देखील विकसित होत आहेत, ज्यांचे चेहऱ्यावरील हावभाव सहानुभूती दर्शवू शकतात आणि तुमच्या मिरर न्यूरॉन्सना कंपित करू शकतात. असे असताना ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ हा ५ दिवसांचा एक भव्य जागतिक सोहळा १६ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे पार पडला. ‘लोक, पृथ्वी आणि प्रगतीसाठी एआय’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक एआय प्रशासन आणि नवकल्पनांमध्ये भारताची भूमिका या परिषदेत प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आली.
यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी संकल्पना सोप्या करण्यासाठी, सराव प्रश्न तयार करण्यासाठी, उत्तरलेखनाचा सराव करण्यासाठी आणि चालू घडामोडींचा सारांश काढण्यासाठी ‘एआय’चा वापर करतात. हे जलद उजळणी, मुद्देसूद नोट्स आणि निबंधांसाठी विचारमंथन करण्यास मदत करते. परंतु आपण खऱ्या अर्थाने ‘एआय’चा वापर करताना कशा पद्धतीने करायला हवा? कोणती काळजी घ्यायला हवी? हे या लेखात जाणून घेणार आहोत.
पूर्वपरीक्षेच्या तयारीत ‘एआय’ची भूमिका
संकल्पना समजून घेणे : कठीण विषय सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी ‘एआय’ आपली मदत करू शकतो. बहुतेकदा आपल्याला संदर्भ पुस्तकातील भाषा समजून घेताना अवघड जाते. किंवा काही संकल्पना क्लिष्ट असतात. तेव्हा आपण ‘एआय’ ची मदत घेवू शकतो. उदा. ‘वेब्लेण वस्तू’ व ‘जिफेन वस्तू’ मधील फरक समजून घेणे.
एमसीक्यू सराव : राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, पर्यावरण इ. विषयानुसार वा विशिष्ट घटकांवर ‘एआय’ बहुपर्यायी प्रश्न तयार करून देते. परंतु त्यासाठी आपण आधी गतवर्षीच्या प्रश्नांचा अभ्यास करायला हवा. जेणेकरून ‘एआय’द्वारा बनविलेले प्रश्न हे गुणवत्तापूर्वक व आपल्या पूर्वपरीक्षेला पूरक असे आहेत किंवा नाही हे आपल्याला कळायला हवे. ‘एआय’ या प्रश्नांचे स्पष्टीकरणही देऊ शकते. परंतु त्यातील तथ्ये तुम्ही विश्वसनीय स्रोतातून तपासायला हवीत.
चालू घडामोडी : ‘एआय’ चालू घडामोडींचे व वृत्तपत्रांतील संपादकीय लेखांचे संक्षिप्त नोट्समध्ये रूपांतर करून देते. जे आपला वेळ वाचवते. रिव्हीजन करण्यासाठी तुम्ही याची मदत घेऊ शकता.
मुख्य परीक्षेच्या तयारीत ‘एआय’ची भूमिका
उत्तर लेखनाचा सराव: ‘एआय’ आपल्याला मुख्य परीक्षेच्या दृष्टीने आपल्या आवश्यकतेनुसार १५० व २५० शब्दांत मॉडेल उत्तरे तयार करून देते. ‘एआय’ची उत्तरे व तुम्ही लिहिलेली उत्तरे तुलनात्मक पद्धतीने बघायला हवीत.
प्रस्तावना, मुख्य भाग व निष्कर्ष हे स्वरूप अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्याला याची मदत होईल. उत्तरे अधिक प्रभावी करण्यासाठी आकृत्या, फ्लोचार्ट, उदाहरणे, केस स्टडीज, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल इत्यादी बाबी आपण ‘एआय’ मदतीने आपल्या नोट्स मध्ये समाविष्ट करायला हवेत जेणेकरून वेळोवेळी आपल्या उत्तरात आपल्याला वापरता येतील. आपण ‘एआय’चा वापर करून वेगवेगळ्या विषयांची सांगाड घालू शकतो. उदा, ‘जीएस२ च्या उत्तरासाठी ‘हवामान बदल’ आणि ‘संघराज्य व्यवस्था’ यांची सांगड कशी घालता येईल?’ यामुळे तुमची विश्लेषणात्मक क्षमता सुधारते.
निबंध लेखन : निबंधाच्या विविध आयामांवर आपण ‘एआय’च्या मदतीने विचारमंथन करू शकतो. विषयांचे सामाजिक, आर्थिक, नैतिक आणि जागतिक पैलू तपासू शकतो. विषयाशी संबंधित प्रसिद्ध विचारवंतांची अवतरणे आणि वास्तविक जीवनातील उदाहरणे यांचे विश्लेषण करू शकतो. निबंध लिहिण्यापूर्वी त्याचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी आपण ‘एआय’चा वापर करू शकतो.
नीतिशास्त्र केस स्टडीजचा सराव : विविध विषयांवर आधारित केस स्टडी आपण ‘एआय’च्या सहाय्याने बनवू शकतो. त्यांचा लेखन सराव करू शकतो. समस्यांवर व्यावहारिक आणि नैतिकदृष्ट्या संतुलित उपाय सुचविण्यासाठी आपण ‘एआय’ कडून पर्याय समजून घेऊ शकतो परंतु आपण आपल्या सद्सद् विवेक बुद्धीचा वापर करूनच आपण उत्तरात याचा समावेश करायला हवा.
‘एआय’च्या सहाय्याने नोट्स : पूर्व व मुख्य परीक्षेसाठी संक्षिप्त नोट्स ‘एआय’च्या सहाय्याने बनवून आपण आपला अभ्यास अधिक प्रभावी करू शकतो. नोट्स बनविताना केवळ ‘एआय’चा डेटा न वापरता तुम्ही स्वतः जर डेटा दिला तर तो विश्वासार्ह असेल.
‘एआय’चा वापर करण्यासाठीचा ‘सुवर्ण नियम’
‘यूपीएससी’सारख्या परीक्षेत तांत्रिक मदत (एआय) आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा योग्य समन्वय असणे गरजेचे आहे.
‘एआय’चा वापर खालील बाबींसाठी करा –
· वेग : माहिती शोधण्यासाठी आणि नोट्स काढण्यासाठी लागणारा वेळ वाचवा.
· रचना : उत्तराचा किंवा निबंधाचा उत्तम आराखडा तयार करण्यासाठी मदत घ्या.
· रिव्हीजन : कठीण विषयांचे सोपे तक्ते किंवा फ्लोचार्ट्स बनवा.
स्वतःच्या बुद्धीचा वापर खालील बाबींसाठी करा –
· विश्लेषण : माहितीचा सखोल अर्थ लावणे आणि त्यातील बारकावे समजून घेणे.
· मौलिकता : उत्तरात स्वतःचे स्वतंत्र विचार आणि नाविन्यपूर्ण उदाहरणे मांडणे.
· निर्णयक्षमता : नैतिक पेचप्रसंग किंवा केस स्टडीजमध्ये योग्य आणि संतुलित निर्णय घेणे.
‘एआय’तुम्हाला रस्ता दाखवेल आणि सांगाडा तयार करून देईल, पण त्यामध्ये प्राण फुंकण्याचे आणि परीक्षेच्या गरजांनुसार बदल करण्याचे काम तुमचे आहे. विद्यार्थ्यांनी ‘एआय’चा वापर एक पूरक साधन म्हणून करणे अपेक्षित आहे, प्रमाणभूत स्रोतांकडून तथ्यांची पडताळणी करून उत्तरांमधील आपली मौलिकता टिकवून ठेवायला हवी.
- sushilbari10@gmail.com
