डॉ श्रीराम गीत

मुंबईतलं कुर्ला हे स्टेशन प्रचंड गजबजलेलं. रात्रीचे तीन तास सोडले तर सतत रेल्वेच्या गाड्यांचे व इंजिनांच्या शिट्ट्यांचे आवाज कान भरून टाकतात आसपासच्या साऱ्या लोकांचे. स्टेशनला लागूनच असलेल्या चाळीत तिसऱ्या मजल्यावर माझे घर. माझा मुक्काम कामाच्या वेळी, जेवणाच्या वेळी घरात, पण उरलेला वेळ दारासमोरच्या बाल्कनीत ठेवलेल्या छोट्या बैठया स्टुलावरच असे. असंख्य लोकल आणि भरधाव जाणाऱ्या लांबलचक मेल, एक्स्प्रेस गाड्या पहात माझा अधून मधून अभ्यास चाले. मात्र सारे लक्ष लांबलचक रेल्वेच्या डब्यांकडे नसून इंजिन चालकाकडे माझी नजर खिळलेली असे. लोकलचा चालक उभा राहून समोर कसे डोळ्यात तेल घालून बघतो ते मी प्रत्येक लोकलमागे बघत असे. या उलट भरधाव जाणाऱ्या एक्स्प्रेस गाडीचा चालक खिडकीला रेलून इकडे तिकडे बघू कसा शकतो याचेही मला आश्चर्य वाटत राही. स्टेशनच्या शेजारी राहत असलो तरी रेल्वेने प्रवास करायचा योग किंवा लोकलमध्ये बसायची वेळ फार क्वचित येत असे. बाबा सोडले तर घरातील इतरांना कुर्ला सोडून कधी इकडे तिकडे जाण्याचा प्रसंग येत नसे. माझी प्राथमिक शाळा संपली आणि हायस्कूल मात्र रेल्वे स्टेशनच्या पलीकडे होते. त्यामुळे आता दिवसातून दोनदा ओव्हर ब्रिजवरून जाता येता रेंगाळून रेल्वेकडे बघणे शक्य झाले. स्टेशनमध्ये शिरताना लोकल कशी शिरते आणि सुटताना भोंगा कसा वाजतो हे पण आता कळू लागले होते. लाल सिग्नल असल्यामुळे थांबलेल्या एक्स्प्रेस गाडीचा इंजिन ड्रायव्हर केबिन मध्ये काय करत असतो किंवा त्याची केबिन कशी असते हे पण दिसत असे.

Job Opportunity Railway Recruitment Job vacancy
नोकरीची संधी: रेल्वेतील भरती
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
customer set an Ola showroom in Kalaburagi on fire
OLA Showroom Fire : दोन आठवड्यांपूर्वी घेतलेली ओला इलेक्ट्रिक स्कूटर बिघडली, संतप्त तरुणाने शोरूम पेटवलं; पाहा VIDEO
fresh violence erupts in manipur
मणिपूर पेटले; मोर्चाला हिंसक वळण, ४० विद्यार्थी जखमी; तीन जिल्ह्यांत संचारबंदी
badoda bnp paribas large and mid cap fund
‘ग्रोथ ॲट रिझनेबल प्राइस’ हेच गुंतवणूक सूत्र!
schedule four medical courses, Admission process,
चार वैद्यकीय अभ्यासाक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
Ayurveda and Unani course admissions started
मुंबई : आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू
Tata Curvv Ev Waiting Periods Extended From 14 Days To 56 Days After Launch Tata Curvv EV
Tata Curvv EV: ही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी तुटून पडले ग्राहक; लाँचिंगनंतर वेटिंग पीरियड पोहचला चक्क ५६ दिवसांवर

हेही वाचा >>> Success Story: गावात किराणा मालाच्या दुकानापासून ते कोट्यावधींची कंपनी उभारण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

स्वप्न मनात ठसले

सातवीत असताना वर्ग शिक्षकांनी एकदा कुणाकुणाला काय काय व्हायला आवडेल असे विचारले. कसलाही विचार न करता मी रेल्वेचा इंजिन ड्रायव्हर होणार असे उत्तर दिल्याने अख्खा वर्ग एवढेच काय शिक्षक सुद्धा चकित झाले होते. चांगले का वाईट ते मला सांगता येणार नाही पण त्या दिवसापासून मला ‘ड्रायव्हर’, हे टोपण नाव पडले. घरी आलेल्या मित्रांनी हाक मारून हा उल्लेख केल्यावर घरातील सगळेजण अवाक झाले होते. बाबांनी मात्र आधी अभ्यास कर, चांगले मार्क मिळव यावर भर देऊन तो विषय संपवला होता. पण अभ्यासात लक्ष लागत नसेल आणि मार्क जेमतेम साठी ओलांडण्या इतपतच असतील तर काय होणार? माझी दहावी संपत आली त्यावेळेला मी माहिती काढली होती. डिप्लोमा इंजिनीअरिंग पूर्ण केले की परीक्षा देऊन इंजिन ड्रायव्हर बनता येते. त्याला रेल्वे मध्ये लोको पायलटची परीक्षा असे नाव आहे. त्यामुळे जास्त काही न बोलता मी डिप्लोमाला प्रवेश मिळवला. न आवडणारे रुक्ष विषय आणि मार्क न मिळणाऱ्या भाषा बाजूला पडल्यामुळे डिप्लोमाच्या सर्व परीक्षा चांगल्या मार्काने मी पास झालो. आता कुठे नोकरी शोधणार? असे आई-बाबा विचारत असताना त्या वेळेला मात्र मी सांगून टाकले मी लोको पायलट परीक्षेचा अर्ज भरला आहे. आईला यातील काहीच माहीत नसल्यामुळे तिने माझ्याशी बोलणेच सोडले. बाबांनी दोन-तीन वेळा समजावायचा प्रयत्न केला. शेवटी परीक्षेत नापास झाला म्हणजे येईल ताळ्यावर असे त्यांनी आईला सांगताना मी ऐकले आणि मनातल्या मनात सुस्कारा टाकला. बरोबरचे हुशार मित्र इंजिनीअरिंगला पोचले होते तर काहीजण कॉमर्सचा अभ्यास करत होते. या सगळ्या मंडळींचे शिक्षण पूर्ण होण्याच्या आतच लोको पायलट परीक्षेचा निकाल लागला आणि मी उमेदवारी करता रुजू झालो. सारे प्रशिक्षण खडतरच होते. पण वयाच्या १९ व्या वर्षी खिशात पैसे खुळखुळत असल्यामुळे आणि भारतभरातील, विविध राज्यातील मुलांबरोबर हॉस्टेलमध्ये दिवस जात असल्यामुळे तो काळ पाहता पाहता संपला. मालगाडीवर असिस्टंट लोको ड्रायव्हर म्हणून नेमणूक झाल्यावर पगार तर सुरू झालाच, पण रेल्वेतर्फे मिळणाऱ्या कुटुंबासाठीच्या मोफत प्रवासासाठी आई बाबांना मी उत्तर, दक्षिण फिरवून आणू शकलो, तेही एसी बोगीतून. पहिला प्रवास झाल्यावर आईची नाराजी संपली आणि पगाराचे आकडे ऐकून बाबाही मनातून खुश झाले होते. मित्रांच्या भेटीगाठी फारशा होत नसत. कारण माझ्या कामाच्या वेळा कायमच चमत्कारीक होत्या. मात्र, छान पास झालेला कॉमर्स पदवीधर किंवा इंजिनीअर मित्र यांचे बेकारी पेक्षा माझा महिना ३० हजारचा पगार हा भला मोठाच होता. मित्रांच्या सर्कल मध्ये मात्र ‘ड्रायव्हर’ नोकरीला लागला असा टिंगलीचा सूर असे. तो ऐकून काही वेळा वाईट वाटे.

लोको पायलट च्या आयुष्यात काटेकोर प्रशिक्षणातून प्रगती होत असते. प्रवासी गाड्यांवर नेमणूक व्हायला सहा सात पेक्षा जास्त वर्षे लागतात. हजारो प्रवाशांची सुरक्षितता संभाळण्याचे भान तोवर आलेले असते. मग हळूहळू वेगवान गाड्यांपर्यंत तुमची नेमणूक बदलत जाते. बदलत्या वेळा, सुट्ट्यांची खात्री नाही आणि बदल्या हा भाग सोडला तर आर्थिक दृष्ट्या माझी नोकरी उत्तम चालली होती.

पंचवीस वर्षानंतर

माझी नेमणूक वंदे भारत या अत्याधुनिक खास गाडीवर झाली. तेव्हा एक गंमत झाली. सीएसटीवर सोलापूरची वंदे भारत घेऊन जाण्यासाठी मी स्टेशनात शिरत होतो. मागून दोन मित्रांची जोरात हाक आली, ‘ड्रायव्हर’. मी एकदम शाळकरी वयात गेलो आणि आवाज ओळखला. सुटातला एक मित्र, आणि जीन्स टीशर्ट मधला दुसरा समोर आले. कामानिमित्त ते पुण्याला चालले होते. त्यातील एकाने विचारले तुझं रिझर्वेशन कुठल्या डब्यातलं?

मी जेव्हा त्यांना हसत उत्तर दिले की मी तुम्हाला दोघांना पुण्याला सुखरूप घेऊन जाणार आहे, तेव्हा त्यांचा वासलेला आ आता माझ्या कायम लक्षात राहील. सुदैवाने रेल्वे ऑफिसमध्येच नोकरी करणाऱ्या मुलीशी माझे लग्न झाले. माझ्या मुलाने बारावी सायन्स झाल्यानंतर जेव्हा सांगितले मला मर्चंट नेव्हीमध्ये जाऊन बोटीचा कॅप्टन बनायचे आहे तेव्हा मी आनंदाने त्याची पाठ थोपटली. मुलगा कॅप्टन झाला, एका परदेशी कंपनीत नोकरीला लागला आणि मी राजधानी एक्स्प्रेसचा इंजिन ड्रायव्हर म्हणून निवृत्त झालो. शेवटच्या प्रवासाच्या दिवशी स्टेशनवर माझा सत्कार करून तो पाहण्यासाठी किमान १०० प्रवासी व १०० सहकारी टाळ्या वाजवत होते. त्यावेळी ड्रायव्हर झाल्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्णत्वास गेले होते.