किरण सबनीस
अनेक विद्यार्थ्यांना वाटते की डिझाइन शिकायचे म्हणजे चित्रकला, सॉफ्टवेअर किंवा त्रिमितिय मॉडेलिंग किंवा रील्स करायला शिकणे. प्रत्यक्षात ही साधने नंतर येतात. एक चांगला डिझाइनर आधी लोकांना समजून घेतो, समस्या शोधतो, योग्य प्रश्न विचारतो आणि मग उपाय विकसित करतो… ‘उद्या सकाळी आठ ते दहा… फक्त बसथांब्यावर बसून लोकांचं निरीक्षण करायचं!’
नाशिकमध्ये राहणारा १६ वर्षांचा आदित्य नुकताच अकरावीत गेला होता. डिझाइनमध्ये करिअर करायचं ठरवल्यापासून त्याला वाटत होतं की आता स्केचबुक, रंग, चित्रकला आणि संगणक यांच्याशीच त्याचं आयुष्य जोडले जाणार. पण पहिल्याच आठवड्यात आमच्या संस्थेतल्या एका मार्गदर्शकानी एक वेगळीच असाइनमेंट दिली. ‘कोणाशी बोलायचं नाही, काही काढायचं नाही… बसस्टॉप वरील एका कोपर्यात बसून सखोल निरीक्षण करायचं.’
दोन तासांनी आदित्य परत आला तेव्हा त्याच्या वहीत चित्रं नव्हती; पण पन्नास निरीक्षणं आणि मोबाइलमध्ये घेतलेले काही व्हिडिओ, छायाचित्रे होती. बसची वाट पाहणारे ज्येष्ठ नागरिक, मोबाइलमध्ये गुंतलेले विद्यार्थी, चुकीच्या ठिकाणी उभे राहून बस चुकवणारे प्रवासी, बसमध्ये चढायची घाई करणारे कंडक्टर, अस्पष्ट फलक, पावसापासून संरक्षण नसलेला थांबा… त्या दिवशी त्याला एक महत्त्वाचा धडा मिळाला – डिझाइनरची खरी प्रयोगशाळा म्हणजे आपल्या सभोवताली असलेला समाज.
आज शिक्षण क्षेत्रातही मोठा बदल होत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनइपी २०२० ) अनुभवाधारित शिक्षण, प्रकल्पाधारित अध्ययन, चिकित्सक विचार, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांवर भर देते. म्हणजेच फक्त पुस्तकातील उत्तरे पाठ करणे पुरेसे नाही; तर प्रत्यक्ष जग समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे. हीच तर डिझाइन शिक्षणाची मूलभूत भूमिका आहे.
अनेक विद्यार्थ्यांना वाटते की डिझाइन शिकायचे म्हणजे चित्रकला, सॉफ्टवेअर किंवा त्रिमितिय मॉडेलिंग किंवा रील्स करायला शिकणे. प्रत्यक्षात ही साधने नंतर येतात. एक चांगला डिझाइनर आधी लोकांना समजून घेतो, समस्या शोधतो, योग्य प्रश्न विचारतो आणि मग उपाय विकसित करतो. ही क्षमता पुस्तकातून नव्हे, तर छोट्या-छोट्या प्रयोगांतून विकसित होते.
तुम्हालाही डिझाइनमध्ये करिअर करायचे असेल, तर पुढील प्रकारचे प्रयोग करून पाहा.
सखोल निरीक्षण करायला शिका
बसस्टॉप, रेल्वे स्थानक, मॉल किंवा बाजारपेठेत २०-३० मिनिटे शांतपणे निरीक्षण करा.(मोबाइल बाजूला ठेवा)
शाळेतील सूचना फलक किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वापरताना लोकांना काय अडचणी येतात ते नोंदवा.
घरात सर्वाधिक वापरली जाणारी वस्तू कोणती आणि का, हे शोधा.
लोकांना समानुभूतिपूर्वक समजून घ्या
आजी-आजोबांना स्मार्टफोन वापरताना कोणत्या अडचणी येतात व का येतात हे समजावून घ्या.
पाच वर्षांच्या मुलाला शाळेची बॅग भरताना पाहा, डबा कसा उघडतात व खातात ते पहा.
एखाद्या दुकानदाराशी ग्राहकांच्या अडचणींबद्दल संवाद साधा व त्यांच्याकडे कोणते उपाय आहेत हे पहा.
निर्भयपणे प्रश्न विचारायला सुरुवात करा
एका पाण्याच्या बाटलीबद्दल -२० ‘‘का?’’ आणि ‘‘का नाही?’’ प्रश्न लिहा.
‘एखादी वस्तू अशीच का बरं बनवली आहे?’ हा प्रश्न स्वत:ला व इतरांना विचारा.
एखाद्या दैनंदिन समस्येची पाच वेगवेगळी कारणे शोधा. तीच समस्या इतर लोक कशी सोडवतात हे विचारा.
संकल्पना मांडणी आणि कृतिशील प्रयोग करायला सुरू करा.
घरातील एखादी वस्तू अधिक उपयोगी कशी होईल, याचे स्केच काढा व पालकांशी चर्चा करा.
शाळेच्या ग्रंथालयाची किंवा कॅन्टीनची नवी रचना सुचवा त्याचे कार्डबोर्ड मॉडेल बनवा.
नजीकच्या अंधशाळा किंवा वृद्धाश्रम यातील स्टाफसाठी ग्रीटिंग्स कार्ड बनवून द्या.
प्रतिक्रिया घ्या, सुधारणा करा आणि याचीच पुनरावृत्ती करा.
तुमची कल्पना वापरकर्ता, मित्र, शिक्षक किंवा कुटुंबीयांना कागदावर रेखाटून किंवा मॉडेल बनवून दाखवा.
त्यांचा चिकित्सक अभिप्राय घ्या. त्यानुसार पुन्हा सुधारणा करा.
बदलानंतर खरोखर फरक पडला का आणि तो कसं मोजता येईल याची नोंद करा.
हे प्रयोग केवळ डिझाइन प्रवेश परीक्षेसाठी नाहीत. निरीक्षणशक्ती, समानुभूती, संवादकौशल्य, चिकित्सक विचार, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता – ही २१व्या शतकातील मूलभूत कौशल्ये आहेत. प्रभावी पोर्टफोलिओही अशाच अनुभवांतून तयार होतो. अनेक नामांकित डिझाइन संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या अंतिम उत्तरांपेक्षा त्यांची विचार करण्याची प्रक्रिया अधिक महत्त्वाची मानली जाते. लक्षात ठेवा, डिझाइन शिकण्याची सुरुवात महागड्या लॅपटॉपपासून, कॅमेरा किंवा सॉफ्टवेअरपासून होत नाही. ती सुरू होते एका प्रश्नापासून, एका निरीक्षणापासून आणि छोटासा प्रयोग करण्याच्या धाडसापासून.
कदाचित काही वर्षांनी शाळांमधील गृहपाठही बदलतील. ‘हा धडा पाठ करा’ ऐवजी ‘आज तुमच्या परिसरातील तीन समस्या शोधा’, ‘एका वृद्ध व्यक्तीचा अनुभव समजून घ्या’ किंवा ‘एखाद्या वस्तूची अधिक चांगली रचना सुचवा’ अशी आव्हाने विद्यार्थ्यांना दिली जातील. कारण भविष्य केवळ माहिती लक्षात ठेवणार्यांचे नाही; तर जगाकडे नव्या नजरेने पाहणार्यांचे आहे. आजच स्वत:ला एक आव्हान द्या – पुढील २१ दिवस, मी दररोज एक छोटा डिझाइन प्रयोग करेन. कदाचित त्यातून लगेचच एखादा नवा शोध लागणार नाही; पण नक्कीच तुमच्यातील निरीक्षक, विचारवंत आणि डिझाइनर निश्चित जागा होईल.
kiran.sabnis123@gmail.com
(लेखक आयआयटी, मुंबईमधून डिझाइनमध्ये पदव्युत्तर पदवीधर असून त्यांना कॉर्पोरेट, शिक्षण क्षेत्रातील अनुभव आहे.)
