प्रभाकर वाईरकर

मन जे भरकटलेले असेल त्याला योग्य दिशा दाखवण्याचे दिशादर्शकाची भूमिका व्यंगचित्रकार आपल्या व्यंगचित्रातून साकारत असतो
उपहासात्मक हास्यरस निर्माण करणारी, अति अतिशयोक्ती पूर्ण, द्विमित चित्र म्हणजे व्यंगचित्र. सोळाव्या शतकात युरोपमध्ये व्यंगचित्राची उत्पत्ती झाली अठराव्या शतकाच्या मध्यावर ब्रिटिश व्यंगचित्रकार विल्यम होगार्थ याने जगामध्ये पहिले राजकीय व्यंगचित्र जन्मास घातले. त्यानंतर त्याचा प्रभाव जगामध्ये इतर प्रदेशात बांध फुटलेल्या पाण्यासारखा पसरत गेला.

व्यंगचित्र हे नेहमीच सत्यावर आधारित असते म्हणूनच त्याला समाजाचा आरसा संबोधले जाते संगीत शिकणाऱ्याला जसा संगीताचा कान लागतो त्याचप्रमाणे व्यंगचित्रकार होण्यासाठी विनोदाची जाण लागते. 64 कला मधील चित्रकलेची ज्याला आवड आहे तो व्यंगचित्रकार बनू शकतो. चित्रकला हा व्यंगचित्रकलेचा पाया आहे. ज्याला वास्तववादी चित्रकला साकारता येते तो सहज व्यंगचित्र साकारू शकतो. फक्त अतिशयोक्ती, विरूपीकरण, उपरोध, हास्य रस, उपहासात्मक चित्रण करण्याची थोडीशी आवड असली म्हणजे झालं. पुढे सराव करून त्यामध्ये प्राविण्य निर्माण करता येते. आपल्या भारतात व्यंगचित्र कला शिकवण्याची शिक्षण केंद्रे नाहीत. जे-जे प्राचीन काळी राजे महाराजे त्यांच्या सल्लागार मंडळामध्ये एका विदूषकाची नेमणूक करीत.

विदूषक आपल्या हलक्या फुलक्या गमतीदार, उपहासात्मक विनोदी भाषेचा वापर करून राजा ने केलेल्या चुकीवर त्याचे मन न दुखवता टीकाटिपणी करीत असे. जेणेकरून राजाची कारकीर्द रुपी नौका प्रजेच्या सुखासाठी पैलतीर गाठण्यासाठी नेहमीच सजग असे. आजच्या लोकशाही राजवटीत विदूषकाचे काम व्यंगचित्रकार करीत आहे. सरकार किंवा समाजव्यंगचित्रकार आज व्यंगचित्रेकलेवर आपलं जीवन साजरे करत आहेत त्यातील पाच टक्केही व्यंगचित्र कलेची शिक्षण घेतलेले सापडणार नाहीत. सर्वजण सभोवताली दिसणारी व्यंगचित्र व त्यांचा अभ्यास करून स्व विचारावर आधारित व्यंगचित्र साकारीत आहेत.. त्यासाठी सभोवतालच्या जगात दिसणारे आकार.

व्यक्ती – प्राणीमात्रांचे हावभाव, रचना, परस्पेक्टिव्ह प्रमाणबद्धता इत्यादीं सूक्ष्म नजरेने टीपून व्यंगचित्र साकारीत आहेत. विनोद किंवा व्यंगचित्रकला शिकवून येत नाही, ती एक वृत्ती आहे. दहावी किंवा बारावी पास झाल्यानंतर आपल्याकडे आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेता येतो. परंतु त्या ठिकाणी व्यंगचित्र कसं काढावं हे शिकविले जात नाही. प्रत्येक व्यंगचित्रकारागणिक त्यांची चित्रशैली, प्रमाणबद्धता भिन्न असते वास्तववादी चित्रकले सारखी प्रमाणबद्धता व्यंगचित्र कलेमध्ये नसते. या प्रमाणबद्धतेवरच प्रत्येक व्यंगचित्रकाराची चित्रशैली आधारित असते व्यंगचित्रकार होण्यासाठी निरीक्षण शक्ती सभोवतालच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सतत आपले कान आणि डोळे उघडे ठेवले पाहिजेत. विनोद बुद्धी, रेखाटन कौशल्य, अनेक भाषांवर हुकूमतीतूनच परिणामकारक आणि मार्मिक व्यंगचित्र जगासमोर ठेवता येते.

आजच्या युगात व्यंगचित्रकारासाठी प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये अनेक संधी हात जोडून उभे आहेत. वर्तमानपत्रे नियतकालिके व तत्सम माध्यमे. टीव्ही, इंटरनेट, सोशल मीडिया या मध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. राजकीय व्यंगचित्र, सामाजिक व्यंगचित्रे कॉमिक ट्रिप्स, अॅनिमेशन फिल्म आणि हास्यचित्रे असे अनेक प्रकार व्यंगचित्रकारासाठी उपलब्ध आहेत. आपल्याला कोणत्या विषयात रुची आहे त्याप्रमाणे आपण त्या विषयाला धरून प्रयत्न करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ राजकीय व्यंगचित्र तयार करायचे असल्यास राजकीय परिस्थितीचे भान, राजकीय नेत्यांचे अचूक अर्कचित्र, त्याची वैशिष्ट्ये आणि संदेश यावर आपला कटाक्ष असणे आवश्यक आहे. राजकीय व्यंगचित्र साकारताना त्या व्यक्तीचे अचुक अर्कचित्र हा महत्त्वाचा घटक आहे.

तर कॉमिक स्टिप साकारताना एकच व्यक्तीचे हाव-भाव, अनेक चौकटीमध्ये त्या माणसाचं साधर्म्य न चुकता चीतारता येणे फार महत्त्वाचे आहे. तोच प्रकार अॅनिमेशन करताना अंमलात आणावा लागतो. पॉकेट कार्टून जे दररोज प्रसिद्ध होणारे असून त्यामध्ये राजकारण वा समाजामध्ये जे बदल घडत असतात त्याचा तो आरसा आहे .व्यंगचित्राची निर्मिती करताना कोणाच्या वैयक्तिक अवगुणांवर भाष्य टाळावे. धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण होणार नाही यावर काळजी घेणे महत्त्वाचे. अनेक विषयांचे वाचन आपल्या विचारांना चार चांद लावू शकते. आर्ट स्कूल मध्ये प्रवेश घेताना (बी एफ ए) फाईन आर्ट की अप्लाइड आर्ट याचा पक्का विचार करून पुढे पाऊल टाकने गरजेचे आहे. दोन्ही विभागात व्यंगचित्र कलेचा पाया घालता येतो. व्यंगचित्र कलेसाठी म्हणून इलेस्ट्रेशन हा विषय इलेक्टिव म्हणून निवडणे महत्त्वाचे आहे.

ऑनलाइन व्यंगचित्राचे शिक्षण व आर्ट स्कूल मधील शिक्षण यामध्ये खूप फरक पडतो. अगदीच जर शिक्षकाची सोय नसेल तर ऑनलाइन शिकणे अव्यवहार्य नाही. पण त्यासाठी सराव हा मंत्र जपणे आवश्यक. व्यंगचित्र साकारताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फार महत्त्वाचे चित्रकारासाठी व समाजासाठीही. त्याची गळचेपी होऊ न देणे आपले कर्तव्य आहे. पारंपारिक पद्धतीने व्यंगचित्र रेखाटतना पेपरवर ब्रशने रेघोट्या मारताना जे समाधान मिळते त्याची तुलना फक्त बाळ आणि माता यांच्या स्पर्शाशी करता येईल. डिजिटली काम करताना त्या सुखास आपण पारखे होतो. परंतु आजच्या वाऱ्यासारख्या पळणाऱ्या जगात जलद आणि परिणामकारक आर्टवर्क करायचे असेल तर डिजिटलला पर्याय नाही.

आज बाजारात वेगवेगळ्या प्रकारची चित्रकलेसाठी सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ( ए आय ) याने सर्व क्षेत्रात धुमाकूळ घातला आहे. परंतु आपल्याला इप्सित परिणाम साधायचा असेल तर ‘ए आय’ चा वापर फक्त बेसिक काम करण्यासाठी करता येतो परंतु आपणास चित्रकला येत नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. कारण त्यावर अनेक आवश्यक त्या सुधारणा कराव्या लागतात. शिकाऊ असताना ‘ए आय’चा वा डिजिटल चा वापर करू नये हे उत्तम ‘पॅकेज’चा जमाना असल्याने सुरवातीला पॅकेज कडे लक्ष देऊ नका. कारण प्रत्येक व्यंगचित्रकलेच्या विभागामध्ये त्या त्या गुणवंतांना त्याच्या कुवतीप्रमाणे “पॅकेज’ दिलं जातं.

आपल्या कलेमध्ये कशी सुधारणा होते हेच ध्येय ठेवलं तर पॅकेजचा प्रश्न आपोआप मार्गी लागतो. आपल्या महाराष्ट्रात व्यंगचित्रकलेची सशक्त परंपरा आहे. त्यामध्ये आर के लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, मारिओ मिरांडा, शि द फडणीस, वसंत सरवटे इत्यादींनी देशात आणि परदेशात आपल्या व्यंगचित्रांचा ठसा उमटवला आहे नाविन्याचा ध्यास, कौशल्य आणि सातत्य यांची कास धरली तर वरील विभुतींसारखं व्यंगचित्र कलेमध्ये करून जगावर स्वतःच्या कलेचे गारुड सहज घालू शकता.