किरण सबनीस
आजच्या स्पर्धात्मक जगात डिझाइन क्षेत्रात यशस्वी करिअर घडवायचे असेल, तर एक उत्तम दर्जाचा पोर्टफोलिओ असणे अत्यावश्यक आहे. पोर्टफोलिओ म्हणजे केवळ कामांचे संकलन नाही, तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे, कौशल्याचे, सृजनशीलतेचे आणि व्यावसायिक क्षमतेचे जिवंत प्रतिबिंब आहे.
‘पोर्टफोलिओ’ हा शब्द इटालियन भाषेतून आला असून त्याचा मूळ अर्थ आहे – कागदपत्रे वाहून नेण्याची बॅग. १८ व्या शतकात कलाकार आणि राजनैतिक क्षेत्रात हा शब्द रूढ झाला. आज तो साध्या फोल्डरपासून ते बहुआयामी डिजिटल प्रेझेंटेशनपर्यंत विस्तारला आहे. डिझाइन पोर्टफोलिओ म्हणजे तुमचे अनुभव, प्रयोग, प्रकल्प, स्केचेस, डिझाइन्स आणि मॉडेल्स यांचे सुसंघटित संकलन. यातून तुमची कौशल्ये, शैली आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रवास दिसतो.
पोर्टफोलिओ का महत्त्वाचा?
एक सशक्त पोर्टफोलिओ अनेक भूमिका बजावतो. शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यापासून ते नोकरी, इंटर्नशिप आणि फ्रीलान्स संधींपर्यंत तो उपयोगी पडतो. स्पर्धात्मक बाजारपेठेत स्वतःला वेगळे सिद्ध करण्यासाठी, तुमची विशिष्ट शैली आणि विचारप्रक्रिया दाखवण्यासाठी पोर्टफोलिओ हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. नेटवर्किंग आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठीही तो महत्त्वाचा ठरतो.
डिझाइनरचा पोर्टफोलिओ कसा असावा?
पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट —पोर्टफोलिओ किती मोठा आहे यापेक्षा त्यातील काम किती दर्जेदार आहे हे महत्त्वाचे आहे.
पोर्टफोलिओ म्हणजे फक्त चित्रांचा, रंगकामांचा संच नाही. त्यामध्ये तुमचे विज्ञान प्रकल्प, छंद, सामाजिक कार्य, नवनवीन प्रयोग, स्वत: बनवलेल्या वस्तू आणि कलाकृति यांचा जरूर समावेश करावा.
पोर्टफोलिओमध्ये केवळ स्वतःनी केलेल्या कामांचा समावेश असणे अत्यावश्यक आहे. सोशल मीडियाच्या युगात नक्कल करणे सहज शक्य आहे, पण त्यापासून कटाक्षाने दूर राहा.
अंतिम उत्पादनाबरोबरच तुमची विचारप्रक्रिया आणि कार्यपद्धतीही दाखवा.
वेगवेगळ्या तंत्रांचे आणि प्रकारांचे प्रकल्प समाविष्ट करा.
पोर्टफोलिओची मांडणी स्वच्छ, सुबक आणि सहज वाचता येण्यासारखी करा. त्यामधूनही तुमच्या डिझाइन आणि कला विषयक निष्ठेची आणि आवडीची जाणीव करून द्या.
एखाद्याला जर आंनिमेशन मध्ये विशेष रस असेल तर त्याचा पोर्टफोलिओ त्यानुसार बनवला पाहिजे.
डिजिटल युगाशी जुळवत एक ऑनलाइन पोर्टफोलिओ किंवा वेबसाइट तयार करा.
पोर्टफोलिओ बनवायला कधी सुरवात करावी?
लवकरात लवकर! हो, अगदी माध्यमिक शाळेपासून!! पोर्टफोलिओ म्हणजे काहीतरी मोठ्ठे व सहज न जमणारे असे काहीसे मनात न ठेवता, आपण जे काही शाळेमध्ये किंवा छंद वर्गात प्रयोग करत असतो त्याचे संकलन सुरू करावे. असेही समजायची आवश्यकता नाही की पोर्टफोलिओ मध्ये फक्त चित्रकला, हस्तकला यांचाच समावेश हवा. डिझाइन क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यानी रोबोटिक मॉडेल्स, तांत्रिक उपकरणे, सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स, विविध स्वरचित कथा, कविता आशा अनेक गोष्टींचा समावेश करून त्यात वेळोवेळी सुधारणा करत रहावे.
पोर्टफोलिओ कुठे उपयोगात येतो ?
पोर्टफोलिओचा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये व करिअरच्या विविध टप्प्यांवर केला जातो.
उच्च शिक्षणासाठी अर्ज करताना, परदेशातील कॉलेजेस पोर्टफोलिओद्वारे विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे मूल्यांकन करतात.
व्यावसायिक जगात, इंटर्नशिप आणि नोकरीच्या मुलाखतींमध्ये पोर्टफोलिओ उमेदवाराच्या कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रदर्शन करते.
फ्रीलान्स काम मिळवण्यासाठी पोर्टफोलिओ एक प्रभावी साधन ठरते, कारण ते संभाव्य कंपनीच्या वरिष्ठ लोकाना/ ग्राहकांना आपल्या कामाची गुणवत्ता दाखवते.
तसेच, डिझाइन स्पर्धांमध्ये सहभागी होताना, पोर्टफोलिओ स्पर्धकाच्या सृजनशीलतेचे आणि तांत्रिक कौशल्यांचे प्रदर्शन करते.
एआय युगातील पोर्टफोलिओ — नवी साधने, नवी संधी
आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात केवळ पारंपरिक कौशल्ये पुरेशी नाहीत. मिडजर्नी, अॅडोब फायरफ्लाय, फिग्मा एआय, कॅनव्हा मॅजिक स्टुडिओ आणि रनवे एमएल – या सारखी एआय साधने प्रत्येक डिझाइन विद्यार्थ्याने आत्मसात करायला हवीत. ही साधने वापरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा – एआय तुमची सृजनशीलता बदलू शकत नाही, तो फक्त तिला गती देतो. तुमचा पोर्टफोलिओ हे दर्शवायला हवा की तुम्ही एआय सोबत काम करण्यात सक्षम आहात
जरूर लक्षात ठेवा
लक्षात ठेवा की पोर्टफोलिओ हा तुमच्या सर्वांगीण विकासासोबत वाढत आणि बदलत राहतो. ही एक पुनरावृत्ति प्रक्रिया (आयटरेटीव्ह प्रोसेस) आहे. एक मजबूत पोर्टफोलिओ तयार करणे हे केवळ तुमच्या कौशल्याचे प्रदर्शन करत नाही, तर तो तुमच्या व्यावसायिक वाटचालीचा एक महत्त्वाचा भाग बनतो. म्हणूनच, आजपासूनच तुमच्या पोर्टफोलिओवर काम करण्यास सुरुवात करा आणि डिझाइन क्षेत्रातील यशस्वी करिअरची पायाभरणी करा.
kiran.sabnis123@gmail.com
