नवीन नोकरीची सुरुवात ही फक्त दिलेले काम करणे आणि जबाबदाऱ्या पार पडणे यापूर्वीच मर्यादित नसते तर अनेक महत्त्वाचे घटक आत्मसात करून आपल्याला ते कार्यस्थळी अमलात आणावे लागतात. कार्यस्थळी प्रामाणिकपणा, सहकाऱ्यांविषयी आदरभाव, जबाबदारी ची पूर्ण जाणीव, यासारखी अनेक नैतिक मूल्य जाणीवपूर्वक आत्मसात करावी लागतात.
कार्यस्थळी नैतिकता (Work Ethics) हा नवीन नोकरी मिळाल्यानंतर आत्मसात करण्याचा अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. नवीन कामाच्या ठिकाणी व्यावसायिकता, सचोटी, सकारात्मक दृष्टिकोन, वक्तशीरपणा, आदर भावना, जबाबदारीची जाणीव अशा अनेक गुणांनी नैतिकता प्रदर्शित केली जाते. प्रमुख नैतिक वर्तनामध्ये कंपनीच्या नियमांचे पालन करणे, कामाविषयी पारदर्शकता ठेवणे, सर्व सहकाऱ्यांविषयी निष्पक्ष राहता येणे, संवादामध्ये प्रामाणिकता आणणे त्याचबरोबर कंपनीच्या खाजगी माहिती विषयी गोपनीयता बाळगणे, त्याचबरोबर आपल्या कामाची व आपण केलेल्या चुकांची जबाबदारी घेणे असे अनेक सद्गुण नैतिक वर्तनामध्ये समाविष्ट असतात. काम करताना सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे त्याचबरोबर कंपनीने घालून दिलेली मूल्य अंगीकारणे व त्याची जोपासना करणे या गोष्टी देखील नैतिक वर्तनामध्ये समाविष्ट होतात. याचबरोबर कार्यस्थळी समर्पण दाखवणे तसेच कामाच्या ठिकाणी संस्कृतीत सकारात्मक योगदान देत राहणे हे देखील खूपच महत्त्वाचे ठरते.
कार्यस्थळी नैतिकता कशी जोपासावी?
1. संस्थेची मूल्ये जाणून घ्या. आपण काम करत असलेली संस्था किंवा कंपनी कोणत्या मार्गदर्शक तत्वांखाली काम करते याची माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याने नक्कीच घेतली पाहिजे. प्रत्येक कंपनीची ध्येय व उद्दिष्टे निश्चित असतात. ध्येय व उद्दिष्टे जाणून घेऊन आपल्या संस्थेची नक्की कार्यप्रणाली कशी आहे हे नवीन नोकरी मिळाल्यानंतर प्रथम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे संस्थेची आचारसंहिता व मार्गदर्शक तत्वे जाणून घेण्यास नक्कीच मदत होईल व त्यामुळे आपल्यावर नक्की कोणती जबाबदारी आहे व कंपनीमध्ये माझी भूमिका कुठली आहे व मी ती कशी निभावायची याविषयी अधिक माहिती होण्यास नक्कीच मदत होईल.
2. सर्वांप्रती आदर बाळगा. तुमचे शिक्षण कितीही झाले असेल, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कुठलीही असेल तुमचे पद व कंपनीतील तुमची भूमिका कुठलीही असेल या सर्व गोष्टींचा गर्व न बाळगता कंपनीतील तुमच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर आधार युक्त वर्तन करणे तुमची कार्यस्थळी असलेली नैतिकता दर्शवते.
3. माणुसकी, आस्था व सहिष्णुता जोपासा. कंपनीमध्ये काम करताना वेगवेगळ्या स्वभावाचे व अनेक व्यक्तिमत्व प्रकाराचे लोक एकत्र काम करत असतात कामात प्रत्येकाच्या हातून काही ना काही चुका होतात त्रुटी राहतात अशावेळी सर्वांविषयी समभाव ठेवणे महत्त्वाचे असते. माणूस चुका करतच शहाणा होत असतो व शिकत असतो अशावेळी आपल्या सहकाऱ्यांशी माणुसकीच्या नात्याने व आस्था पूर्वक वर्तणूक प्रस्थापित करणे महत्त्वाचे ठरते अशामुळे परस्परांविषयी नातेसंबंध दृढ होतात व त्याने टीम वर्क सुधारायला मदत होते. हे सर्व जमण्यासाठी अंगी धीरता व सहनशीलता जोपासणे खूप महत्त्वाचे आहे.
4. गोपनीयता पाळा. कंपनीमध्ये काम करताना काही माहिती अत्यंत खाजगी व संवेदनशील असते अशावेळी त्या माहिती विषयी गोपनीयता पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते गोपनीयता पाळली गेल्यामुळे परस्परांविषयी विश्वासहार्यता निर्माण होण्यास खूपच मदत होते व कंपनीच्या ध्येय व उद्दिष्टांबरोबर तडजोड न केल्याचे आपल्याला समाधान मिळते.
कार्यस्थळी नैतिक वर्तनाची सुरुवात स्वतःपासून व नोकरीच्या पहिल्या दिवशीपासून अंगीकारली तर त्याचा अत्यंत सकारात्मक परिणाम आपल्या करियर वर नक्कीच होईल व त्यातून आपण एक आदर्श व्यावसायिक व्यक्ती बनण्यास मदत होईल याची मला खात्री वाटते.
