Indian Navy Agniveer Recruitment 2023: भारतीय नौदलामध्ये काम करायची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नौदलामध्ये अग्निवीर पदांसाठी मेगा भरतीचे आयोजन केले जाणार आहे. या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना agiveernavy.cdac.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला २९ मे रोजी सुरुवात होणार आहे. वरील वेबसाइटवर या भरतीसंबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
शासनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनापत्रकानुसार, नौदलातील १६३८ अग्निवीर पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. देशातील कोणत्याही मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेमधून गणित आणि भौतिकशास्त्र या दोन विषयांमध्ये बारावीची परीक्षा पास असलेली व्यक्ती या भरतीमध्ये सहभागी होऊ शकते. तसेच बारावीमध्ये त्यांच्या एकूण विषयांमध्ये रसायनशास्त्र / जीवशास्त्र/ संगणक विज्ञान यांपैकी एक विषय असणे आवश्यक आहे, अशी सूचनापत्रकात अट नमूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा जन्म १ नोव्हेंबर २००२ ते ३० एप्रिल २००६ यांमध्ये असायला हवा.




ऑनलाइन अर्ज करायची अंतिम तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे. त्यानंतर अर्ज केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा, पीएफटी आणि वैद्यकीय तपासणी यांना सामोरे जावे लागेल. तसेच त्यांना कॉम्युटर बेस्ड टेस्ट देखील द्यावी लागेल. यातून उत्तम गुण मिळालेल्या व्यक्तीला भारतीय नौदलात काम करायची संधी मिळेल. अर्ज करताना प्रत्येक उमेदवाराला ५०० रुपये प्रवेश शुल्क म्हणून भरावे लागतील. ही रक्कम भरल्याशिवाय अर्ज स्विकारला जाणार नाही. प्रवेश शुल्कामध्ये मिळणाऱ्या आरक्षणाबाबतची माहिती agiveernavy.cdac.in या वेबसाइटवरुन मिळवू शकता.