आशुतोष शिर्के, रश्मी पटवर्धन
एखादी गुंतागुंतीची व्यवस्था, अधिक कार्यक्षम, परिणामकारक आणि अधिक ‘मानवी’ कशी बनवता येईल? याच प्रश्नाभोवती इंड्ट्रिरयल इंजिनीअरिंग ही शाखा विकसित झाली आहे.
विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा का लागतात? रुग्णालयात डॉक्टर आणि बेड उपलब्ध असूनही रुग्णाला उपचारासाठी प्रतीक्षा का करावी लागते? एखाद्या कारखान्यात सर्व यंत्रसामग्री उपलब्ध असतानाही उत्पादनाचा वेग अपेक्षेप्रमाणे का वाढत नाही? आणि ई-कॉमर्स कंपनीला लाखो वस्तू योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि कमीत कमी खर्चात कशा पोहोचवता येतात?
प्रथमदर्शनी हे प्रश्न वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित दिसतात. परंतु नीट पाहिल्यास हे प्रश्न वेगवेगळे नाहीत हे लक्षात येतं. एखादी गुंतागुंतीची व्यवस्था, अधिक कार्यक्षम, परिणामकारक आणि अधिक ‘मानवी’ कशी बनवता येईल? याच प्रश्नाभोवती इंड्ट्रिरयल इंजिनीअरिंग ही शाखा विकसित झाली आहे.
‘इंड्ट्रिरयल इंजिनीअरिंग’ म्हटले की अनेकांच्या डोळ्यांसमोर कारखाना, उत्पादन प्रक्रिया आणि यंत्रे येतात. प्रत्यक्षात मात्र ही शाखा त्यापेक्षा खूप व्यापक आहे. माणसे, यंत्रे, माहिती, वेळ, पैसा आणि प्रक्रिया यांचा एकत्रित विचार करून संपूर्ण प्रणाली अधिक चांगली कशी चालवता येईल, याचा अभ्यास इंड्ट्रिरयल इंजिनीअरिंगमध्ये केला जातो. म्हणूनच आज ही शाखा उत्पादन क्षेत्राबरोबरच आरोग्यसेवा, विमान वाहतूक, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स, बँकिंग आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट अशा अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाची ठरते.
परदेशातील विद्यापीठांमध्ये या शाखेचे स्वरूप पाहिले तर त्यामध्ये आजच्या काळात तयार झालेले वैविध्य लक्षात येते. अमेरिकेतील जॉर्जिया इ्स्टिटट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इंड्ट्रिरयल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात ऑपरेशन्स रिसर्च, सिम्युलेशन, ऑप्टिमायझेशन आणि सप्लाय चेन यांसारख्या विषयांचा समावेश आहे. परड्यु विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मॅन्युफॅक्चरिंग सिस्टिम्सबरोबर ह्युमन फॅक्टर्स, ऑपरेशन्स रिसर्च आणि व्यवस्थापनाचाही विचार केला जातो. एमआयटीमध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट वर भर आहे, तर स्टॅनफर्डमध्ये मॅनेजमेंट सायन्स अँड इंजिनीअरिंगसारखे अभ्यासक्रम या व्यापक क्षेत्राशी जोडलेले आहेत.
जर्मनीतील सुप्रसिद्ध आरडब्ल्यूटीएच आखन विद्यापीठाचा ‘मॅनेजमेंट अँड इंजिनीअरिंग इन प्रोडक्शन सिस्टम्स’ हा अभ्यासक्रम अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन यांची सांगड घालतो. टीयू म्युनिक, सिंगापूरचे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न यांसारख्या विद्यापीठांमध्येही या क्षेत्राशी संबंधित विविध पर्याय उपलब्ध आहेत.
यातून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. परदेशात ‘इंड्ट्रिरयल इंजिनीअरिंग’ या नावाखाली मिळणारा प्रत्येक अभ्यासक्रम एकसारखा नसतो. काही विद्यापीठे ऑपरेशन्स रिसर्च आणि ऑप्टिमायझेशनवर अधिक भर देतात, काही सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक्सवर, तर काही मॅन्युफॅक्चरिंग सिस्टिम्स, ह्युमन फॅक्टर्स किंवा सिस्टम्स इंजिनीअरिंगवर. त्यामुळे विद्याथ्र्याला ‘इंड्ट्रिरयल इंजिनीअरिंग’ शोधताना इंड्ट्रिरयल अँड सिस्टिम्स इंजिनीअरिंग, ऑपरेशन्स रिसर्च, सप्लाय चेन मॅनेजमेंट, मॅनेजमेंट सायन्स किंवा इंजिनीअरिंग मॅनेजमेंट यांसारखी संबंधित अभ्यासक्रमांची नावेही तपासावी लागतात.
म्हणूनच या शाखेत पदव्युत्तर शिक्षणाचा विचार करणार्या विद्याथ्र्याने केवळ विद्यापीठाची जागतिक क्रमवारी किंवा नाव पाहून निर्णय घेऊ नये. अभ्यासक्रमात नेमके कोणते विषय आहेत, कोणती साधने वापरली जातात, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समस्या सोडवण्याची किती संधी मिळते, उद्योग आणि संशोधन संस्थांशी विद्यापीठाचे संबंध कसे आहेत, हे तपासणे आवश्यक आहे.
अमेरिकेतील शिक्षणातून उद्योजकतेपर्यंतचा प्रवास
मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर जय पाटील यांनी पुढे त्याच क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याऐवजी इंड्ट्रिरयल इंजिनीअरिंगची निवड केली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेत असताना जय यांना उत्पादन क्षेत्राची ओळख झाली. नाशिकमधील महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑटोमोबाइल असेंब्ली युनिटमधील इंटर्नशिप हा त्यातील महत्त्वाचा टप्पा होता.
प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया पाहताना मात्र त्यांचे लक्ष यंत्रांपेक्षा त्यामागच्या नियोजनाकडे, पुरवठा साखळीकडे आणि व्यवस्थापनाकडे अधिक वेधले गेले. त्यामुळे पारंपरिक मेकॅनिकल इंजिनीअरिंगपेक्षा वेगळ्या दिशेने पुढे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मित्रांसोबत जीआरईची तयारी करून त्यांनी अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केले आणि युनिव्हर्सिटी ॲट बफेलो येथे इंड्ट्रिरयल इंजिनीअरिंगमध्ये मास्टर्स करण्यासाठी ते अमेरिकेत गेले.
नवा देश, नवे विद्यापीठ आणि सुरुवातीला अगदी रोजच्या जगण्याचीही नवी शिस्त. न्यूयॉर्कमधील प्रचंड बर्फवृष्टीचा अनुभव त्यात भर घालणारा होता. मात्र तेथील भारतीय विद्यार्थी आणि इंडियन असोसिएशनच्या मदतीने या नव्या वातावरणाशी जुळवून घेणे सोपे झाले. इंड्ट्रिरयल इंजिनीअरिंगचा अभ्यास करत असताना त्यांनी स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील, विशेषत: सप्लाय चेनशी संबंधित अनेक इलेक्टिव्ह विषय निवडले.
पुढे त्यांना या विषयांचा खूप उपयोग झाला. मास्टर्सनंतर एसएपी कन्सल्टिंगपासून सुरू झालेल्या त्यांच्या कारकिर्दीत कॅटरपिलर, जॉन्सन अँड जॉन्सन, जेन्जाइम, जीई आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले. लेडेसियामध्ये रिसोर्स मॅनेजर आणि डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स म्हणून काम करताना प्रोजेक्ट मॅनेजमेंट, बिझनेस प्रोसेसेस आणि ऑपरेशन्सचे प्रत्यक्ष अनुभव त्यांना मिळत गेले.
भारतात, विशेषत: नाशिकमध्ये स्वत:चा व्यवसाय उभारण्याची इच्छा त्यांच्या मनात होती. अमेरिकेत आयटी कन्सल्टिंगच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवास करताना तेथील मायक्रोब्रुअरीजच्या संकल्पानेशी त्यांचा परिचय झाला. बिअर हे आवडीचे पेय असल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या बिअरबद्दलचे कुतूहल वाढत गेले. त्यातून त्यांनी होमब्रूइंगचा प्रयोग सुरू केला.
छंदातून सुरू झालेली ही गोष्ट हळूहळू बिअरनिर्मितीच्या शास्त्राचा अभ्यास करण्याच्या दिशेने गेली. भारतात परतून हेच काम व्यावसायिक पातळीवर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकन ब्रूअर्स गिल्डच्या इंटेन्सिव्ह ब्रुइंग सायन्स अँड इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. मायक्रोब्रुअरीमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. २०१७ मध्ये नाशिकमध्ये ‘टॉपची ब्रुइंग’ची सह-स्थापना केली. ‘‘आज, टॉपची ब्रुइंग हे माझ्या सर्व अनुभवांचे आणि शिक्षणाचे फलित आहे,’’ असे जय सांगतात.
mentorashutosh@gmail.com
(लेखक करिअर समुपदेशक आहेत.)
