साहेबराव धनवटे
केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयांतर्गत डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग मार्फत चालवण्यात येणाऱ्या आयटीआय अभ्यासक्रमांमध्ये ‘ड्रेस मेकिंग’ हा एक वर्ष कालावधीचा (NSQF लेव्हल-२.५) महत्त्वाचा ट्रेड आहे. या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शिवणकलेचे तांत्रिक ज्ञान देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे.

या व्यवसायाला प्रवेश घेण्यासाठी दहावी पास किंवा नापास उमेदवार पात्र ठरतात. स्री पुरुष कोणीही प्रवेश घेऊ शकतात, शिवाय प्रवेशासाठी वयाची अट नाही. प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना सुरुवातीला मोजमाप घेणे, कपड्यांचे प्रकार ओळखणे, कापड कापण्याची पद्धत, सुईदोरा व मशीनचे मूलभूत ज्ञान दिले जाते. पुढे जाऊन विविध प्रकारचे कपडे, जसे की ब्लाउज, सलवार, कमीज, फ्रॉक, स्कर्ट, शर्ट, पँट यांची डिझाईनिंग, बुटिक मॅनेजमेंट आणि शिवणकाम शिकवले जाते. यामध्ये ‘पॅटर्न मेकिंग’ हा महत्त्वाचा भाग असून, ग्राहकांच्या मापानुसार अचूक नमुना तयार करण्याची कौशल्ये विकसित केली जातात.

८४० तास प्रात्यक्षिक, २४० तास थियरी आणि १५० तास ऑन जाब ट्रेनिंग या तांत्रिक प्रशिक्षणाबरोबरच अभ्यासक्रमात ‘सॉफ्ट स्किल्स’, ‘एम्प्लॉयबिलिटी स्किल्स’ यांचाही समावेश असतो. त्यामुळे विद्यार्थी केवळ कुशल कामगार म्हणून नव्हे तर आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून घडतात. आधुनिक काळात फॅशन इंडस्ट्री झपाट्याने वाढत असल्याने या क्षेत्रात रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.

ड्रेस मेकिंग ट्रेड पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रेडीमेड गारमेंट उद्योग, बुटीक, फॅशन डिझायनिंग स्टुडिओ, भरतकाम उद्योग तसेच चित्रपट व टीव्ही क्षेत्रातही काम करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर स्वतःचा शिवणकाम व्यवसाय सुरू करून ‘उद्योजक’ होण्याचा मार्गही या अभ्यासक्रमातून खुला होतो. कमी भांडवलात सुरू होणारा हा व्यवसाय ग्रामीण व शहरी दोन्ही भागांत यशस्वी ठरू शकतो.

महिलांसाठी विशेषतः हा ट्रेड सशक्तीकरणाचे प्रभावी साधन आहे. घरच्या घरी व्यवसाय करता येत असल्याने आर्थिक स्वावलंबनासोबतच कुटुंबाची जबाबदारीही सांभाळता येते. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्किल इंडिया’ सारख्या उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर अशा कौशल्याधारित अभ्यासक्रमांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.

तथापि, काही ठिकाणी अद्ययावत यंत्रसामग्रीचा अभाव, प्रशिक्षकांची कमतरता किंवा अभ्यासक्रमाची संथ अंमलबजावणी या समस्या जाणवतात. यावर मात करण्यासाठी प्रशिक्षण संस्था आणि शासन यांच्यात अधिक समन्वय आवश्यक आहे. उद्योग क्षेत्राशी जोडलेले प्रशिक्षण आणि ‘ऑन-द-जॉब ट्रेनिंग’ यावर भर दिल्यास विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक वाढू शकते.

सारांशात, ‘ड्रेस मेकिंग’ हा ट्रेड केवळ सुईदोऱ्यापुरता मर्यादित नसून, तो रोजगार, सर्जनशीलता आणि आत्मनिर्भरतेचा मजबूत धागा आहे. योग्य प्रशिक्षण, आधुनिक साधने आणि बाजारपेठेची समज यांचा संगम साधला, तर हा साधा दिसणारा व्यवसाय अनेकांच्या आयुष्याला नवा आकार देऊ शकतो.

साहेबराव धनवटे / शिल्प निदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोखाडा.