साहेबराव धनवटे
औद्योगिक क्षेत्राचा विचार केला तर फिटर हा शब्द अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या कारखान्यातील यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी ज्या कुशल हातांची आवश्यकता असते, त्या हातांना घडविण्याचे काम आयटीआयमधील फिटर ट्रेड करतो. आजही रोजगाराच्या दृष्टीने या ट्रेडला सर्वाधिक मागणी आहे.
फिटर हा प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग गटातील ट्रेड आहे. त्यात विविध यंत्रांचे भाग बनविणे, जोडणी करणे, मोजमाप घेणे, कटिंग, ड्रिलिंग, ग्राइंडिंग, फायलिंग यांसारखी अचूक कामे करणारा तंत्रज्ञ. उत्पादन उद्योग, कारखाने, ऊर्जा प्रकल्प, रेल्वे, जहाजबांधणी, वाहन उद्योग ते अगदी लघुउद्योगांपर्यंत सर्वत्र फिटरची गरज भासते.
अभ्यासक्रमाची रचना
आयटीआयमधील फिटर ट्रेड हा साधारणत: दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. गणित आणि विज्ञान विषय घेऊन दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. अभ्यासक्रमात सैद्धांतिक
( Theory) आणि प्रात्यक्षिक
( Practicalया दोन्ही घटकांवर भर दिला जातो.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी रेखाचित्र वाचन, मोजमाप साधनांचा वापर,
हँड टूल्स व पॉवर टूल्स हाताळणी, ड्रिलिंग, टॅपिंग, कटिंग, वेल्डिंगची प्राथमिक माहिती, मशीनची देखभाल व दुरुस्ती, सुरक्षा नियम व औद्योगिक शिस्त, फिटिंग जॉब तयार करणे, आजच्या आधुनिक उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन हायड्रॉलिक्स, न्युमॅटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्राथमिक ओळखही करून दिली जाते.
रोजगाराच्या मोठ्या संधी
फिटर ट्रेड पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. रेल्वे, बीएचईएल, ओएनजीसी, संरक्षण विभाग, महावितरण, टाटा, महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, बजाज, अशोक लेलँड यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये फिटर ट्रेडधारकांना रोजगाराच्या संधी मिळतात. अनेक कंपन्या अप्रेंटिसशिपद्वारे विद्यार्थ्यांना थेट उद्योगात काम करण्याची संधी देतात. परदेशात या ट्रेडला मोठी मागणी आहे.
स्वयंरोजगाराचीही संधी
फिटर ट्रेड केवळ नोकरीपुरता मर्यादित नाही. स्वयंरोजगार उभारण्याचीही मोठी संधी या क्षेत्रात आहे. स्वत:चे : वेल्डिंग व फॅब्रिकेशन वर्कशॉप, मशिन दुरुस्ती केंद्र, पंप व मोटर रिपेअरिंग व्यवसाय, स्टील फर्निचर निर्मिती, औद्योगिक देखभाल सेवा अशा प्रकारचे उद्योग सुरू करू शकतात.
कौशल्याला वाढती मागणी
पदवीपेक्षा कौशल्य महत्त्वाचे असे आजचे औद्योगिक वास्तव आहे. उद्योगांना प्रत्यक्ष काम करणारे कुशल तंत्रज्ञ हवे आहेत आणि ही गरज पूर्ण करण्याचे काम फिटर ट्रेड करीत आहे. हाताला कौशल्य, उद्योगात मानाचे स्थान आणि रोजगाराची हमी देणारा अभ्यासक्रम म्हणून आयटीआयमधील फिटर ट्रेडकडे पाहिले जाते. विशेेष म्हणजे दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मेकॅनिकल इंजीनियरिंग डिप्लोमाला थेट दुसर्या वर्षाला प्रवेशही घेता येतो.
saheb_1977@yahoo.co.in
(लेखक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोखाडा येथे शिल्प निदेशक आहेत.)
