साहेबराव धनवटे
दहावीनंतर तंत्रज्ञान क्षेत्रात कौशल्याधारित शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनन्स (आयसीटीएसएम) हा महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.

आयसीटीएसएम हा माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित दोन वर्षांचा अभियांत्रिकी ट्रेड आहे. हा अभ्यासक्रम एनएसक्यूएफ लेव्हल ४ अंतर्गत येतो. या ट्रेडमध्ये संगणकाचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्किंग, तसेच विविध उपकरणांची देखभाल यांचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाते. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो.

हार्डवेअरसह सॉफ्टवेअरचेही ज्ञान

आयसीटीएसएममध्ये ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉलेशन, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन, कॉन्फिगरेशन आणि ट्रबलशूटिंग याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. नेटवर्किंग हे आयसीटीएसएम अभ्यासक्रमातील महत्त्वाचे कौशल्य ठरते. नेटवर्कची मूलभूत रचना, विविध उपकरणांची जोडणी, नेटवर्क कनेक्शनची तपासणी आणि नेटवर्कमधील सामान्य समस्या सोडवणे याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. पुढे नेटवर्किंग, सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेशन किंवा सायबर सिक्युरिटी यांसारख्या क्षेत्रांत प्रगत प्रशिक्षण घेण्यासाठी ही कौशल्ये उपयुक्त ठरतात.

ट्रबल शूटिंगवर भर

तंत्रज्ञासाठी केवळ बिघडलेला पार्ट बदलणे पुरेसे नसते; बिघाडाचे नेमके कारण शोधणे अधिक महत्त्वाचे असते. यालाच ट्रबल शूटिंग म्हणतात. या अभ्यासक्रमात समस्या ओळखणे, तिचे संभाव्य कारण शोधणे, विविध घटकांची तपासणी करण्याचा सराव विद्यार्थ्यांना दिला जातो.

स्वयंरोजगाराचीही संधी

आयसीटीएसएमचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर केवळ नोकरीचा पर्याय राहत नाही. कॉम्प्युटर हार्डवेअर टेक्निशियन, आयसीटी टेक्निशियन, हार्डवेअर सपोर्ट टेक्निशियन, कॉम्प्युटर सिस्टम मेंटेनन्स टेक्निशियन, नेटवर्क सपोर्ट टेक्निशियन अशा विविध भूमिकांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून स्वत:चा व्यवसायही सुरू करता येतो. कॉम्प्युटर रिपेअरिंग सेंटर, लॅपटॉप रिपेअरिंग, प्रिंटर-स्कॅनर स्व्हिहस, कॉम्प्युटर ॲक्सेसरीज आणि स्व्हिहस सेंटर, लॅन इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्स यांसारखे व्यवसाय करता येतात. स्थानिक पातळीवर ग्राहकांच्या कार्यालयात किंवा घरी जाऊन कॉम्प्युटर मेंटेनन्स स्व्हिहस देणे हाही स्वयंरोजगाराचा पर्याय ठरू शकतो. आयसीटीएसएमनंतर नेटवर्किंग, सायबर सिक्युरिटी, क्लाउड टेक्नॉलॉजी, सर्व्हर मॅनेजमेंट किंवा इतर संबंधित माहिती-तंत्रज्ञान कौशल्यांमध्ये प्रशिक्षण घेतल्यास करिअरच्या संधी अधिक विस्तारू शकतात.

दहावीनंतर पारंपरिक शिक्षणासोबत प्रत्यक्ष तांत्रिक कौशल्य मिळवून तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आयसीटीएसएम हा विचार करण्यासारखा पर्याय आहे.

saheb_1977@yahoo.co.in

(लेखक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोखाडा येथे शिल्प निदेशक आहेत.)