साहेबराव धनवटे
चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या काळात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. यंत्रे, उपकरणे आणि प्रणाली परस्परांशी संवाद साधू लागल्या आहेत. या बदलत्या वास्तवाशी सुसंगत असे कौशल्याधारित शिक्षण देण्याच्या दिशेने औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) पुढे जात असून, त्याचाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आयओटी (Internet of Things, इंटरनेट ऑफ थिंग्स) हा नव्याने सुरू झालेला ट्रेड.
इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे सेन्सर, सॉफ्टवेअर आणि इंटरनेटच्या साहाय्याने विविध उपकरणे एकमेकांशी जोडणे व त्यातून माहितीचे संकलन, विश्लेषण आणि नियंत्रण करणे. आज स्मार्ट मोबाइल, स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीनपासून ते औद्योगिक यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, शेती, आरोग्य सेवा आणि स्मार्ट सिटीपर्यंत सर्वत्र आयओटीचा वापर वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.
आयटीआयमधील आयओटी ट्रेड हा पूर्णपणे प्रात्यक्षिकांवर आधारित असून विद्यार्थ्यांना सेन्सर, मायक्रोकंट्रोलर, नेटवर्किंग, डेटा कम्युनिकेशन, क्लाउड बेसिक्स, ऑटोमेशन आणि स्मार्ट डिव्हाइस कंट्रोल यांचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक प्रोग्रामिंग आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थी केवळ यंत्र हाताळणारे नसून, तंत्रज्ञान समजून घेणारे कुशल तंत्रज्ञ बनतात.
या ट्रेडचे महत्त्व केवळ उद्योगपुरते मर्यादित नाही. स्मार्ट शेतीतून पाण्याचे नियोजन, पीक संरक्षण, आरोग्य क्षेत्रात रिमोट मॉनिटरिंग, उद्योगांमध्ये ऑटोमेशन आणि ऊर्जा बचत, वाहतूक व्यवस्थेत स्मार्ट सोल्युशन्स अशा विविध क्षेत्रांत आयओटीचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे आयओटी ट्रेड पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना उद्योग, सेवा क्षेत्र, स्टार्टअप्स आणि स्वयंरोजगार अशा अनेक संधी उपलब्ध होतात.
आयओटी ट्रेड पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी, टेक्निशियन, फील्ड असिस्टंट, ऑटोमेशन ऑपरेटर, आयओटी सपोर्ट एक्झिक्युटिव्ह अशा पदांवर काम करण्याची संधी मिळते. तसेच पुढे पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी पदविका किंवा उच्च शिक्षणाच्या मार्गाने प्रगत तांत्रिक शिक्षणही घेता येते. डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी आणि इंडस्ट्री ४.० या संकल्पनांच्या यशासाठी आयओटी तंत्रज्ञान कणा ठरणार आहे. त्या दृष्टीने आयटीआयमधील आयओटी ट्रेड हा ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील रोजगारक्षम कौशल्यांचे दार उघडणारा ठरत आहे. योग्य प्रशिक्षण, सतत अपडेट राहण्याची तयारी आणि नावीन्यपूर्ण विचारसरणी असल्यास आयओटी हे करिअरचे मजबूत साधन ठरू शकते.

