साहेबराव धनवटे
औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय ही भारतातील कौशल्याधारित शिक्षणव्यवस्थेची मजबूत पायाभूत रचना मानली जाते. केवळ पदवी किंवा प्रमाणपत्र मिळवणे म्हणजेच शिक्षण असा समज असलेल्या काळात, आयटीआयसारख्या संस्थांनी ‘हाताला काम आणि कामाला प्रतिष्ठा’ हा विचार प्रत्यक्षात उतरवला आहे.

आयटीआयमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण हे ८० टक्के प्रात्यक्षिकांवर आणि २० टक्के सैद्धांतिक ज्ञानावर आधारित असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न राहता प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. मशीन हाताळणी, उपकरणांची दुरुस्ती, उत्पादन प्रक्रिया, सुरक्षा नियम, कामातील शिस्त अशा अनेक बाबी विद्यार्थी प्रशिक्षण काळातच आत्मसात करतात. हेच कारण आहे की औद्याोगिक आणि सेवा क्षेत्रात आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाते.

इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, टर्नर, मेकॅनिक डिझेल, मोटार वाहन दुरुस्ती, संगणक ऑपरेटर, ड्राफ्ट्समन, प्लंबर, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग यांसारखे अनेक ट्रेड आयटीआयमध्ये शिकवले जातात. हे ट्रेड थेट उद्याोगांच्या गरजांशी संबंधित असल्यामुळे आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होतात. मोठ्या उद्याोगांपासून ते लघुउद्याोग, बांधकाम, सेवा क्षेत्र, सरकारी व निमसरकारी आस्थापना अशा विविध ठिकाणी आयटीआय प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांची मागणी असते.

आयटीआयचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वयंरोजगाराच्या संधी. आयटीआयमधून कौशल्य मिळवलेला युवक स्वत:चा छोटा व्यवसाय सुरू करू शकतो. इलेक्ट्रिकल कामे, वाहन दुरुस्ती, वेल्डिंग, प्लंबिंग, फॅब्रिकेशन, एसी-फ्रिज दुरुस्ती यांसारख्या क्षेत्रात स्वत:चा उद्योग उभारणे शक्य होते. त्यामुळे आयटीआय शिक्षण हे केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता उद्योजकतेकडेही वाटचाल घडवून आणते.

आज ‘स्किल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ यांसारख्या उपक्रमांमुळे कौशल्याधारित शिक्षणाला राष्ट्रीय पातळीवर प्रोत्साहन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर आयटीआय हे ग्रामीण आणि शहरी युवकांसाठी रोजगाराचे मजबूत प्रवेशद्वार ठरत आहे. कमी कालावधीत, कमी खर्चात आणि प्रत्यक्ष उपयोगी ठरणारे शिक्षण देणारी आयटीआय ही संस्था आजच्या काळात करिअर घडविण्याचा एक प्रभावी आणि विश्वासार्ह मार्ग ठरली आहे.

शालांत परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. प्रवेश ऑनलाईन पद्धतीने आणि गुणवत्तेवर होतात. दहावी उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण उमेदवारांना प्रवेश दिले जातात. दहावी अनुत्तीर्ण असलेल्या उमेदवाराने आयटीआयचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याला दोन भाषा विषय देऊन दहावी उत्तीर्ण होता येते, तर दहावी उत्तीर्ण उमेदवाराने आयटीआय पूर्ण केल्यानंतर दोन भाषा विषयाची परीक्षा देऊन बारावी उत्तीर्ण होता येते. आयटीआयनंतर डिप्लोमा आणि त्यानंतर पदवी असा अभियांत्रिकी उच्च शिक्षणाचा मार्गही गाठता येतो.

(शिल्प निदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोखाडा.)

saheb_1977@yahoo.co.in