नोकरीच्या ठिकाणी काम करताना व इतर सहकाऱ्यांशी जुळवून घेताना बऱ्याच जणांना भावनिक असुरक्षिततेला सामोरे जावे लागते याविषयी आपण मागील लेखात जाणून घेतले. भावनिक असुरक्षिततेचे शरीरावर मनावर तसेच आपल्या कार्यक्षमतेवरही अनेक परिणाम होताना दिसून येतात. त्यामुळे आपण आपल्या वैयक्तिक भावनिक गरजा व कामाच्या ठिकाणी अनेक भूमिका निभावत असताना वापराव्या लागणाऱ्या क्षमता या सर्व गोष्टींचे नियोजन करता येणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या भावनांचेनियोजन व व्यवस्थापन करणे ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. या प्रक्रियेतून जाताना आपले पद, त्याबद्दलच्या व्यवस्थापनाच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा, ती भूमिका निभावताना त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या, त्यासाठी इतर सहकाऱ्यांचे मिळणारे सहकार्य याविषयी वैचारिक स्पष्टता असणे अत्यंत आवश्यक आहे असे मला वाटते. माझ्या व्यक्तिमत्त्वातील क्षमता, कमतरता, कामासाठी लागणारी आवश्यक कौशल्य याची पुरेपूर जाणीव असणे आवश्यक आहे. आपल्या प्रत्येकाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर काही मर्यादा असतात याची जाणीव देखील असणे मला अत्यंत आवश्यक वाटते. नवीन नोकरी मिळाल्यानंतर बरेच जण अतिरिक्त कामाचा बोजा आपल्यावर ओढवून घेताना दिसतात आपण स्वीकारलेले काम त्याला लागणारा वेळ त्या प्रक्रियेतून जाताना सामोरे जावे लागणारे अडथळे या सगळ्याविषयी आधी माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या कामाची चौकट आखून घेणे महत्त्वाचे आहे, त्याचबरोबर काम पूर्ण करताना काही सीमारेषा आखून घेणेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. या आखून घेतलेल्या सीमारेषा किंवा मर्यादाच आपल्या मानसिक व भावनिक आरोग्याचे रक्षण करताना दिसतात.

काही वेळा आपल्या कळत नकळत आपल्याकडूनच या मर्यादांचे उल्लंघन होताना दिसते, ज्याचा परिणाम म्हणून आपल्याला विविध ताणतणावांना सामोरे जावे लागते. भावनांचे व्यवस्थापन करताना आपण तणावाला सामोरे जात आहोत हे वेळीच लक्षात येणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी आपण आपले विचार त्यातून निर्माण होणाऱ्या भावना व आपले होणारे वर्तन या तिन्ही स्तरांवर सजग राहणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी त्रास होत असतो परंतु नक्की कशाचा त्रास होतो? त्या त्रासामागे कुठले विचार आहेत? त्रास होत असताना आपल्या नक्की भावना कुठल्या आहेत? त्या सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. बऱ्याच लोकांना आपल्या स्वत:ची भावना ओळखता येत नाही त्यामुळे त्यांच्या स्वत:कडूनच अनेकदा अनपेक्षित असे वर्तन घडते. परंतु या वर्तनामागे नेमके काय कारण आहे? कुठला विचार आहे? कुठली भावना आहे? हे समजत नाही त्यामुळे भावनांचे नियोजन व व्यवस्थापन करता येत नाही.

आपण जेव्हा ताण-तणावातून जात असतो अशावेळी नक्की कोणाची आणि कशी मदत घ्यावी याविषयी देखील खूप वैचारिक गोंधळ दिसून येतो. पुष्कळ जणांना आपण नोकरीच्या ठिकाणी नवीन आहोत त्यामुळे थोडा त्रास तर होणारच हळूहळू सर्व ठीक होईल असे वाटत राहते परंतु सर्व ठीक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. स्वत:ला नीट ओळखावे लागते जाणून घ्यावे लागते आणि स्वत:ला गुणदोषांसकट स्वीकारावे ही लागते. आपण जसे आहोत तसेच स्वत:ला स्वीकारल्याशिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वातील कुठल्याही घटकांवर काम करणे अजिबात शक्य होत नाही. त्यामुळे स्व जाणीव, स्व ओळख, स्व स्वीकार, आणि स्व विकास या टप्प्यांमधूनच आपल्याला सजग राहून जाणीवपूर्वक प्रवास करावा लागतो. ज्यायोगे आपल्याला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वावर काम करणे नक्कीच शक्य होईल असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.

बरेच जण विचार भावनांकडे दुर्लक्ष करून फक्त वर्तनावर काम करताना दिसतात याचा एखाद्या प्रसंगात नक्कीच उपयोग होऊ शकेल परंतु आपल्या स्वत:कडून पुन्हा पुन्हा त्यात चुका होण्याची शक्यता देखील वाढेल. पुढील भागात आपण या विषयी अधिक जाणून घेणार आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drmakarandthombare@gmail. com