सुहास पाटील केंद्र सरकारमध्ये किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांना हिंदी/ इंग्रजीसोबत मराठी माध्यमातून परीक्षा देऊन नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी. स्टाफ सिलेक्शन कमिशन - ‘मल्टि टास्किंग नॉन-टेक्निकल स्टाफ ( MTS) आणि हवालदार ( CBIC & CBN) परीक्षा २०२४’ जाहीर. वेतन - पे-मॅट्रिक्स लेव्हल-१ अंदाजे दरमहा रु. ३३,८०० केंद्र सरकारच्या देशभरातील विविध खात्यांमध्ये/कार्यालयांमध्ये ‘मल्टि टास्किंग स्टाफ’ (mts) च्या एकूण ४,८८७ आणि CBIC व CBN मधील ‘हवालदार’च्या एकूण - ३,४३९ अशी एकूण ८,३२६ ग्रुप ‘सी’ पदांची भरती. रिक्त पदांचा नेमका तपशिल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (Candidates corner ; Tentative vacancy). काही पदे अपंगांसाठी राखीव आहेत. रिक्त पदांच्या १० टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव आहेत. (एकूण २८७) पात्रता : (दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी) १० वी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. वयोमर्यादा : दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी - MTS पदांसाठी १८ ते २५ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑगस्ट १९९९ ते १ ऑगस्ट २००६ दरम्यानचा असावा.) CBIC/ CBN मधील हवालदार आणि MTS च्या काही पदांसाठी १८ ते २७ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑगस्ट १९९७ ते १ ऑगस्ट २००६ दरम्यानचा असावा.) (उच्चतम वयोमर्यादेत सूट इमाव - ३ वर्षे; अजा/ अज - ५ वर्षे; अपंग - खुला - १० वर्षे/ इमाव - १३ वर्षे/ अजा/ अज - १५ वर्षे) (घटस्फोटीत/ परित्यक्ता/ विधवा/ पुनर्विवाह न केलेल्या महिला - ३५ वर्षेपर्यंत, अजा/ अजच्या परित्यक्ता/ विधवा महिला - ४० वर्षेपर्यंत) (केंद्र सरकारमधील नागरी कर्मचारी (किमान सेवा ३ वर्षांची) - ४० वर्षेपर्यंत, अजा/अजचे केंद्र सरकारमधील कर्मचारी - ४५ वर्षेपर्यंत.) हेही वाचा >>> नोकरीची संधी : स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे भरती इमाव उमेदवारांकडे दि. ३१ जुलै २०२४ रोजी नॉन-क्रिमी लियर दाखला धारण करणे आवश्यक. अर्जाचे शुल्क : १००/- (अजा/ अज/ महिला/ दिव्यांग/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.) ऑनलाइन पद्धतीने फी दि. १ ऑगस्ट २०२४ (२३.०० वाजे) पर्यंत भरता येईल. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली व दमण व दिव या राज्यांचा/ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, पणजी इ. (उमेदवारांनी अर्ज करताना तीन केंद्रांसाठी पसंती क्रम द्यावयाचा आहे.) निवड पद्धती : MTS पदांसाठी कॉम्प्युटर बेस्ड् एक्झामिनेशन ( CBE) सत्र-१ व सत्र-२; हवालदार पदांसाठी CBE आणि शारीरिक क्षमता चाचणी (PET)/ शारीरिक मापदंड चाचणी (PST) - कॉम्प्युटर बेस्ड् एक्झामिनेशन (CBE) ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. उइए परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये आयोजित केली जाईल. सत्र - १ - (I) न्यूमरिकल अँड मॅथेमॅटिकल अॅबिलिटी - २० प्रश्न, ६० गुण. (II) रिझनिंग अॅबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग - २० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे पूर्ण झाल्यावर सेशन-१ आपोआप बंद होईल. त्यानंतर सेशन-२ सुरू होईल. सत्र - २ - (I) जनरल अवेअरनेस - २५ प्रश्न, ७५ गुण. (II) इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन - २५ प्रश्न, ७५ गुण, वेळ ४५ मिनिटे. सेशन-१ (सत्र-१) मध्ये चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. सेशन-२ मधील प्रत्येक चुकीच्या उत्तराला १ गुण वजा केला जाईल. CBE नंतर योग्य वेळी आन्सर कीज् जाहीर केल्या जातील. प्रश्नपत्रिका हिंदी/इंग्रजी, आणि मराठी, कोंकणी, कन्नड, गुजराती, तामिळ, तेलगू, ऊर्दू इ. १३ स्थानीय भाषेत छापली जाईल. उमेदवारांनी भाषेचा पर्याय ऑनलाइन अर्जात नोंद करणे आवश्यक. कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन : CBE सत्र - १ व सत्र - २ मध्ये पात्रतेसाठी किमान गुण - खुला गट - ३० टक्के, इमाव/ ईडब्ल्यूएस - २५ टक्के व इतर कॅटेगरीजसाठी २० टक्के गुण आवश्यक. जे उमेदवार सत्र-१ मध्ये पात्र ठरतील त्यांचेच सत्र २ चे पेपर तपासले जातील. MTS पदांसाठी राज्यनिहाय CBE सत्र-२ मधील गुणवत्तेनुसार निवड केली जाईल. CBIC व CBN मधील हवालदार पदांसाठी CBE मध्ये उत्तीर्ण झाल्यावर शारीरिक क्षमता चाचणी (PET) व शारीरिक मापदंड चाचणी (PST) देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाईल, PET/ PST मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची सत्र-२ मधील गुणवत्तेनुसार उउअ निहाय/ कॅटेगरीनुसार निवड केली जाईल. शारीरिक क्षमता चाचणी : ( i) ( PET) - पुरुषांसाठी - १६०० मीटर अंतर १५ मिनिटांत चालणे. महिलांसाठी - १ कि.मी. अंतर २० मिनिटांत चालणे. शारीरिक मापदंड चाचणी : ( ii) (PST) - पुरुष - उंची - १५७.५ सें.मी. (अनुसूचित जमाती ( ST) साठी उंची १५२.५ सें.मी.) छाती - ७६ ते ८१ सें.मी. महिला - उंची - १५२ सें.मी. ( ST साठी उंची १४९.५ सें.मी.), वजन - ४८ कि.ग्रॅ. (अजसाठी ४६ कि.ग्रॅ.) अर्ज भरण्यासाठी सविस्तर सूचना संकेतस्थळावरील जाहिरातीत Annexure- III आणि Annexure- IV मध्ये दिलेल्या आहेत.) त्या सूचना वाचून नीट समजून घेवून मगच ऑनलाइन अर्ज करावा.