आशुतोष शिर्के, रश्मी पटवर्धन
कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करताना पहिला प्रश्न विद्यापीठाबाबतचा नसावा. या क्षेत्रामध्ये कोणत्या दिशेने करिअरला आकार द्यायचा आहे याबाबतचा असायला हवा. भारतात कायद्याचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसमोर पदवीच्या शेवटच्या टप्प्यावर एक प्रश्न उभा राहतो. पुढचे शिक्षण परदेशात घ्यावे का? परदेशातील विद्यापीठाची पदवी विशेषत: एलएल.एम. आकर्षक वाटते. पण केवळ परदेशी पदवी मिळवणे म्हणजे आंतरराष्ट्रीय करिअरची दारे उघडणे नव्हे. कायद्याच्या क्षेत्रात तर हा फरक अधिक महत्त्वाचा आहे.
परदेशातील एलएल.एम. म्हणजे त्या देशात वकिली करण्याचा परवाना नव्हे. प्रत्येक देशाची आणि प्रत्येक न्यायव्यवस्थेची वकिलीच्या प्रवेशाबाबत स्वतंत्र व्यवस्था आहे. अमेरिकेत तर परदेशी कायद्याचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी बार परीक्षेची पात्रता राज्यानुसार बदलते. त्यामुळे पदवी कुठे घेतली यापेक्षा त्या पदवीचा पुढे उपयोग कुठे आणि कसा होणार हे पाहणे गरजेचे आहे.
म्हणूनच कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करताना पहिला प्रश्न विद्यापीठाबाबतचा नसावा. या क्षेत्रामध्ये कोणत्या दिशेने करिअरला आकार द्यायचा आहे याबाबतचा असायला हवा.
भारतातच न्यायालयीन वकिली करायची असेल किंवा न्यायव्यवस्थेमध्ये काम करण्याची तयारी करायची असेल तर परदेशातील एलएलएमपेक्षा भारतीय न्यायालयांमधील प्रत्यक्ष अनुभव आणि इथल्या कायद्याची सखोल जाण अधिक मोलाची ठरू शकते. उलट कॉर्पोरेट कायदा, आंतरराष्ट्रीय लवाद, बौद्धिक संपदा, तंत्रज्ञानविषयक कायदे, बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर मात्र परदेशातील विशेष अभ्यासक्रमाचा वेगळा फायदा होऊ शकतो.
आणखी एक पर्याय विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवा. पदवी झाल्यानंतर लगेच परदेशात जाण्याऐवजी एक दोन वर्षे प्रत्यक्ष काम करून पाहणे. एखाद्या लिटिगेशन चेंबरमध्ये, कॉर्पोरेट लॉ फर्ममध्ये किंवा कायदेविषयक तंत्रज्ञान क्षेत्रात काम केल्याने स्वत:ची आवड आणि स्पेशलायजेशन स्पष्ट होत जाते. मग त्यानंतर परदेशातील अभ्यासक्रमाची निवडही अधिक विचारपूर्वक करता येते. परदेशातून पदवी घेऊन परतल्यानंतर आता पुढे काय हा यक्ष-प्रश्न टाळता येतो.
दरम्यान कायद्याचे जगच आज बदलत आहे हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. त्यामागे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय हा मोठा घटक आहे.
कायदेविषयक संशोधन, करारांचे परीक्षण, कागदपत्रांचे विश्लेषण आणि मसुदे तयार करण्यासाठी एआय चा वापर वाढतो आहे. त्यामुळे भविष्यातील वकिलासमोरचा प्रश्न केवळ एआय माझी नोकरी काढून घेईल का असा नाही. एआय मुळे माझे क्षेत्र आणि माझ्या कामाचे स्वरूप कसे बदलेल असा आहे.
एआय ने दिलेली माहिती तपासणे, चुकीचे संदर्भ ओळखणे, ग्राहकाची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणे आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करणे ही कौशल्येही कायदेविषयक कामाचा महत्त्वाचा भाग बनत आहेत. याच बदलातून काही नवी क्षेत्रे पुढे येत आहेत. एआय गव्हर्नन्स, डाटा प्रायव्हसी, सायबर लॉ, लीगल टेक्नॉलॉजी, फिनटेक, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी इत्यादी क्षेत्रांचा त्यात समावेश होतो. कायदा समजणार्या आणि त्याच वेळी तंत्रज्ञानाची जाण असणार्या व्यावसायिकांची गरज येणार्या काळात वाढणार आहे. प्रत्येक वकिलाने प्रोग्रामर होण्याची गरज आहे असा याचा अर्थ नाही. पण तंत्रज्ञानामुळे कायद्याचे काम कसे बदलते आहे हे समजून घेणे मात्र आवश्यक होणार आहे.
म्हणून परदेशातील कायद्याचे शिक्षण निवडताना चार गोष्टी स्पष्ट असाव्यात. करिअरची दिशा, काम जिथे करायचे आहे तो देश किंवा न्याय-क्षेत्र, आवश्यक व्यावसायिक पात्रता आणि बदलत्या तंत्रज्ञानाची जाण.
परदेशातील पदवी करिअरच्या एका मोठ्या प्रवासातील एक टप्पा आहे. आजच्या कायदेविश्वात पुढे जाण्यासाठी केवळ कायदा जाणून भागणार नाही. कायदा, तंत्रज्ञान आणि व्यवसाय यांच्यातील संबंधांची जाण असणारे व्यावसायिक ह्या उद्याच्या कायदे-विश्वात आत्मविश्वासाने पुढे जाणार आहेत.
भारतातून आंतरराष्ट्रीय कायदेविश्वात झेप
मुंबईच्या कामिनी जयश्री सुहास यांनी अमेरिकेत एलएल.एम. करण्याचा निर्णय घेतला. ‘मला वर्गाबाहेरचा कायदा आणि तो समाजात कसा कार्य करतो, हे समजून घ्यायचे होते,’ असे कामिनी सांगतात.
कामिनी यांनी पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजमधून इंटिग्रेटेड बॅचलर्स इन सोशल लीगल एल.एल.बी.चे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालायातील वरिष्ठ वकिलांच्या चेंबरमध्ये आणि पुढे डेंटन्स लिंक लीगल येथे काम केले. पुढे त्यांनी अमेरिकेतील चार विद्यापीठांमधे अर्ज केले. एलएल.एम.साठी त्यांनी वॉशिंग्टन, डी.सी. येथील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी लॉ स्कूलची निवड केली.
युनिव्हर्सिटीकडून मिळालेली स्कॉलरशिप हा निर्णयातील महत्त्वाचा आर्थिक घटक होता. त्याचबरोबर वॉशिंग्टन, डी.सी.चे स्थानही आकर्षक होते. वर्ल्ड बँक, आयएमएफ आणि इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या जवळ राहून पॉलिसी-मेकिंग आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी समजून घेण्याची संधी मिळणार होती. इंटरनॅशनल अँड कम्पॅरेटिव्ह लॉमध्ये एलएल.एम. चे शिक्षण घेताना इंटरनॅशनल ट्रेड लॉ, इंटरनॅशनल आर्बिट्रेशन, इंटरनॅशनल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आणि प्रोजेक्ट फायनान्स यांसारख्या विषयांचा त्यांनी अभ्यास केला.
अमेरिकेतील शिक्षणपद्धतीतील एक महत्त्वाचा फरक कामिनीला जाणवला की परीक्षा ही माहिती किती पाठ आहे याची चाचणी नसून, शिकलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष परिस्थितीत वापर करता येतो का, हे तपासणारी होती. कामिनी यांच्या मते या शिक्षणातील सर्वांत मोठा अनुभव वर्गाबाहेरचा होता. जगभरातून आलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यातून प्रत्येक व्यक्तीला तिच्या मूळ रूपात स्वीकारण्याचा दृष्टिकोन विकसित झाला.
वॉशिंग्टन, डी.सी मधील नेटवर्किंग इव्हेंट्समध्ये विविध देशांच्या डिप्लोमॅट्ससोबत झालेल्या संवादातून कायदा, धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांचा प्रत्यक्ष जगातील संबंध जाणवला. आज मुंबईमध्ये मॅरिको लिमिटेड या कंपनीत इंटरनॅशनल लीगल कौन्सेल म्हणून काम करताना त्या क्रॉस-बॉर्डर कॉन्ट्रॅक्ट्स, इंटरनॅशनल ट्रेड, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि एम.अँड.ए. व्यवहारांवर काम करतात. आंतरराष्ट्रीय कायद्याचे ज्ञान आणि भारतीय कंपन्यांच्या व्यावसायिक संदर्भाची समज यांचा संगम साधत, भारतीय कंपन्यांना जागतिक विस्तारासाठी कायदेशीर मार्गदर्शन करणारी आंतरराष्ट्रीय वकील बनण्याचे कामिनीचे ध्येय आहे.
mentorashutosh@gmail.com
(लेखक करिअर समुपदेशक आहेत.)
