एआय एजंटच्या विश्वात या एमसीपीनं मोठी खळबळ माजवली. एजंटचा वापर करून कुणाशीही संपर्क साधण्याचं काम एकदम सोपं झालं. सगळ्या कंपन्यांनी आपल्या सुविधा एमसीपीला अनुसरूनच उपलब्ध करून देण्याचं प्रमाण वाढलं.

जेव्हा इंटरनेटची पायाभरणी झाली तेव्हा अगदी मूलभूत आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कुठलेही दोन संगणक एकमेकाशी विनाअडथळा कसे संवाद साधू शकतील, हे ठरवण्याचा होता. वरकरणी हे काम खूप सोपं वाटत असलं तरी तांत्रिकदृष्टया त्यात असंख्य अडचणी असतात. सध्या आपला विषय काहीसा असाच आहे. जेव्हा एआयचा वापर करून आपल्याला कुठल्याही एजंट सॉफ्टवेअरला निरनिराळ्या सोयी उपलब्ध करून द्यायच्या असतात तेव्हा हा एजंट आणि या सोयी यांच्यामधला संवाद नेमका कसा साधायचा; हा क्लिष्ट प्रश्न ठरायला लागला. याचं एक सोपं उदाहरण घेऊ. समजा आपल्याला पर्यटकांना सहल आखून देण्यासाठी एआय एजंट लिहायचा आहे. अशा वेळी त्यात नेमक्या काय अडचणी येऊ शकतील?

सुरुवातीला आपल्याला पर्यटकाच्या सहलीचे तपशील एआय एजंटला पुरवावे लागतील. उदाहरणार्थ ‘आई-वडील आणि त्यांची दोन मुलं यांना एका आठवड्यासाठी युरोपचा दौरा करायचा असून त्यांची अमुक अमुक इतकी रक्कम खर्च करायची तयारी आहे आणि त्यांना फ्रान्स आणि स्पेन हे दोन देश प्रत्येकी ४ दिवस फिरायचे आहेत …’ वगैरे. अशा सहलीचा आराखडा आखून देण्यासाठी आपल्याला संबंधित एआय एजंटला राहण्याची सोय, प्रवासाची सोय, विदेशी चलन मिळवून देण्याची सोय अशा असंख्य प्रकारच्या सोयी इंटरनेटद्वारे पुरवत असलेल्या कंपन्यांचे तपशील पुरवावे लागतील. कारण एआय एजंटकडे स्वत:कडे ही माहिती नसते. अशी विखुरलेली माहिती एकत्र जोडून त्यातून आपल्याला हवं असलेलं काम करून देणं, हे त्याचं काम असतं. आता यामधली अडचण म्हणजे अशा प्रत्येक कंपनीशी आपला एआय एजंट संवाद कसा साधणार? यासाठी तत्सम कंपनीनं ज्या प्रकारे आपलं सॉफ्टवेअर लिहिलेलं असेल त्यानुसारच आपल्या एआय एजंटला त्याच्याशी संपर्क साधावा लागेल. यात एकसुत्रीपणा असेलच; असं आपण खात्रीनं सांगू शकत नाही. कारण संबंधित कंपनीनं आपल्या सोयीनुसार आपापलं सॉफ्टवेअर लिहिलेलं असेल आणि त्यानुसारच आपल्या एजंटला त्या सॉफ्टवेअरशी संभाषण करावं लागेल.

अशा प्रकारे एआय एजंटना निरनिराळ्या सोयी उपलब्ध करून देत असलेल्या सॉफ्टवेअरशी विविध प्रकारे संपर्क साधण्यामध्ये अडचणी यायला लागल्या. आपल्या उदाहरणात विमानाची तिकिटं आरक्षित करून देणारी कंपनी, राहण्याची सोय करून देणारी कंपनी, वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देणं तसंच फिरणं या संबंधीच्या सोयी पुरवणारी कंपनी, विदेशी चलन मिळवून देणारी कंपनी अशा सगळ्या कंपन्यांच्या सॉफ्टवेअरशी संपर्क साधायचा तर आपल्याला आपल्या एजंटमध्ये दर वेळी संबंधित कंपनीला आपण नेमके कशा प्रकारे त्यासाठीचे तपशील पुरवले पाहिजेत आणि ही कंपनी आपल्याला नेमकं कुठल्या स्वरूपाचं उत्तर देईल यामधल्या अनेक खाचाखोची समजून घेऊन त्यानुसार तशा सोयी करण्याची पाळी यायला लागली. म्हणजेच साधारण गरज एकसारखीच असली तरी प्रत्येकाशी संपर्क साधण्यासाठीचा मार्ग वेगळा; अशी ही परिस्थिती नव्हती. यामुळे एआय एजंट लिहिणं काहीसं जिकिरीचं ठरायला लागलं. यात नेमकी कशी एकवाक्यता आणायची याविषयी विचारविनिमय सुरू होता.

अखेर ॲन्थ्रॉपिक या एआयच्या क्षेत्रातल्या अत्यंत वेगानं पुढे येत असलेल्या कंपनीनं ‘मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल (एमसीपी)’ नावाचं तंत्रज्ञान यासाठी तयार केलं. यामुळे एआय एजंटनं वर उल्लेख केलेल्या निरनिराळ्या सुविधांशी इंटरनेटद्वारे संपर्क साधण्याच्या कामात सुसूत्रता आली. निरनिराळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअरना आपली गरज सांगणं आणि त्याला अनुसरून त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळवणं या कामासाठी आता तुलनेनं खूप कमी कष्ट घेण्याची गरज भासायला लागली. जणू तीन वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्यासाठी भिन्न तीन भाषांमध्ये प्रश्न विचारून त्यांची उत्तरंही त्याच भाषांमध्ये मिळावीत; अशा परिस्थितीत बदल होऊन आता त्यामधले फरक नष्ट झाले. साहजिकच एआय एजंटच्या विश्वात या एमसीपीनं मोठी खळबळ माजवली. एजंटचा वापर करून कुणाशीही संपर्क साधण्याचं काम एकदम सोपं झालं. सगळ्या कंपन्यांनी आपल्या सुविधा एमसीपीला अनुसरूनच उपलब्ध करून देण्याचं प्रमाण वाढलं. उदाहरणार्थ अलीकडे झोमॅटो कंपनीनं आपला एमसीपी सर्व्हर उपलब्ध करून दिल्याची बातमी तंत्रज्ञान विश्वात चर्चेची ठरली.

akahate@gmail.com