आपण मुख्य परीक्षेतील सर्व पेपर त्यांच्या अभ्यासक्रमातील घटक व स्वरूपासह जाणून घेतले असून, या लेखात आपण मुख्य परीक्षेत उत्तर कसे लिहिले पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

२०१३ पासूनचे मुख्य परीक्षेतील प्रश्न लक्षात घेतले तर २०२५ पर्यंत त्याचे स्वरूप कमालीचे बदलले आहे. जीएस मध्ये अपेक्षित गुण मिळत नसल्याची तक्रार बहुतेकदा विद्यार्थी करताना दिसतात. त्यासाठी आपण त्या प्रश्नांची उत्तरे आयोगाच्या अपेक्षेनुसार लिहिणे अपेक्षित आहे. मुख्य परीक्षेत प्रमुख आव्हान असते ते म्हणजे प्रश्न वाचून, समजून दिलेल्या वेळेत सटिकपणे लिहून पूर्ण करणे. उदा. १० गुणांच्या उत्तरासाठी केवळ सात मिनिटे असतात. या सात मिनिटांत प्रश्न वाचून, समजून त्याचे उत्तर लिहावयाचे असते.

तांत्रिक बाबी

सर्वप्रथम प्रश्नपत्रिकेवरील सूचना वाचणे आवश्यक असते : प्रश्नपत्रिकेत नेमके किती प्रश्न विचारलेले आहेत? त्यासाठी गुणांचे वर्गीकरण कसे केले आहे ते आपण समजून घ्यायला हवे. उदा. २०१७ मुख्य परीक्षेत १० प्रश्न हे १० गुणांसाठी व १५ प्रश्न हे १५ गुणांसाठी विचारले होते; तर त्याआधी सर्व २० प्रश्न १२.५ गुणांसाठी होते.

शब्दमर्यादा पालन : आयोगाने जी शब्दमर्यादा दिलेली असेल त्याचे पालन करणे आवश्यक असते. एखाद्या प्रश्नाबद्दल खूप माहिती असेल, तर विद्यार्थी उत्तर लिहिण्याच्या ओघात शब्दमर्यादेचे पालन करत नाहीत व याचा परिणाम आपल्या गुणांवर होतो. नेमके काय विचारले आहे ते समजून आयोगाने निर्धारित केलेल्या शब्दमर्यादेत लिहावे. यासाठी तुम्हाला नियमित सराव करणे अपेक्षित आहे. एकच प्रश्न आपल्याला १०, १२.५, १५, २० इ. गुणांसाठी लिहिता यायला हवा.

वेळेचे नियोजन : विचारलेल्या प्रश्नाचे गुण व त्या प्रश्नासाठी किती वेळ द्यावा हे ठरलेले आहे. उदा : ‘१ गुणाकरिता ०.७ मिनिटे’ विद्यार्थ्याकडे असतात. हे समीकरण २५० गुणांच्या ३ तासांसाठी असणाऱ्या पेपरनुसार आहे. विद्यार्थ्यांनी सोबत नीट आकडे दिसतील असे घड्याळ ठेवावे. उत्तरे लिहिताना घड्याळावर नजर असावी. आपण जेव्हा म्हणतो की १० गुणांसाठी ७ मिनिटे तेव्हा हे खूप तांत्रिक होत. आपली तयारी चांगली असेल तर सहज सोपे प्रश्न ४ ते ५ मिनिटांत लिहून होतात. कठीण प्रश्नांसाठी आपण उरलेला वेळ वापरू शकतो.

पेपर पूर्ण सोडविणे : वेळेचे नियोजन व योग्य अभ्यास यांचा मेळ साधल्यास पूर्ण पेपर सोडविणे शक्य होते. सर्व प्रश्न सोडविल्यास नक्कीच गुणांवर त्याचा परिणाम दिसून येतो. सर्व प्रश्नांना सरासरी गुण मिळाले, तरी फक्त काही प्रश्न खूप चांगले लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा ते अधिक ठरतात असे दिसून येते.

मुख्य परीक्षेत उत्तर लिहीत असताना खालील शब्दांचा अर्थ नेमका माहीत असणे आवश्यक असते. प्रश्न विचारताना या शब्दांनुसार उत्तरांची नेमकी दिशा ठरत असते. उदा. कमेंट, एक्सामिन, अनालाईज, इव्यलूएट, डिसकस. याचबरोबर ‘क्रिटीकली कमेंट’, ‘क्रिटीकली एक्सामिन’ या पद्धतीने क्रिटीकली हा शब्द येऊनही प्रश्न विचारला जातो. या शब्दांचा नेमका अर्थ जाणून घेऊ या.

एक्सामिन (तपासणे) : यात जो प्रश्न विचारलेला असतो, त्यात खोलवर जाऊन त्यासंबंधीची पूर्ण माहिती, त्यासाठीची कारणे, त्याचा पडणारा प्रभाव याबद्दल संतुलित लिखाण करणे अपेक्षित असते.

अनालाईज (विश्लेषण करा): आपण वर ‘एक्सामिन’ हा शब्द समजून घेतला. ‘अनालाईज’ हे ‘एक्सामिन’ चे विस्तारित रूप आपण म्हणू शकतो. यात प्रश्नातील मूलभूत संकल्पनांना सूक्ष्मातिसूक्ष्म प्रतलावर ठेवून आपल्याला मांडणे आवश्यक असते.

कमेंट (टिप्पणी द्या) : प्रामुख्याने एखाद्या नामांकित व्यक्तीचे विधान वा पुस्तकातील विधानाला जोडून त्यावर आपले मत विचारलेले असते. त्या विधानासंबंधी महत्त्वाच्या मुद्द्यांना आधारभूत ठेवून स्वतःचे मत द्यायचे असते. यात तथ्य, पुरावे, उदाहरणे यांचा वापर अपेक्षित असतो. विद्याथ्यांचे मत विधानाच्या बाजूने वा विरोधात मत असू शकते. त्यासाठी विधानाची सत्यता समजून घ्यावी लागते. उदा. ‘सत्ता भ्रष्ट करते आणि निरंकुश सत्ता पूर्णपणे भ्रष्ट करते’ यावर चर्चा करा.

इव्यलूएट (मूल्यांकन करा) : प्रश्नाबद्दलचे स्वतःचे तथ्यावर आधारित प्रामाणिक मत यात मांडायचे असते. हे मत व्यक्तिगत असते. परंतु योग्य प्रकारे तथ्याकडून विषयाकडे जाणे इथे महत्त्वाचे ठरते. अशा प्रश्नांना सामोरे जाताना आपला विषयाचा अभ्यास चांगला असणे अपेक्षित आहे. जेणेकरून दिलेला प्रश्न वा विधान याबाबत आपण योग्य तो निष्कर्ष काढू शकतो. उदा. माहितीच्या अधिकारबद्दलचे तथ्य उदा. माहितीच्या अधिकाराने आपल्या शासनप्रणालीवर लक्षणीय परिणाम केला आहे का?

डिसकस (चर्चा करा) : प्रश्नातील विषयाच्या दोन्ही बाजू सकारात्मक व नकारात्मक पद्धतीने मांडणे इथे महत्वाचे असते उदा. ‘जनुकीय सुधारित पिके ही काळाची गरज’ असे म्हटल्यास जनुकीय सुधारित पिकांचे सकारात्मक व नकारात्मक परिणाम लिहिणे अपेक्षित असते.

क्रिटीकली (‘निष्पक्ष न्याय’): जेव्हा ‘क्रिटीकली एक्सामिन’, ‘क्रिटीकली कमेंट’ असे विचारले जाते. तेव्हा ‘ क्रिटीकली ‘ चा अर्थ असतो ‘निष्पक्ष न्याय’, म्हणजेच त्या प्रश्नातील विषयाबद्दलचे प्रामाणिक मत, जे अभ्यासाच्या आधारे मांडले जाते. उदा. ‘निश्चलनीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा परिणाम’ यात निश्चलनीकरणाचा परिणाम नेमका सकारात्मक वा नकारात्मक परिणाम नोंदविणे आवश्यक ठरते.

वरील बाबी लक्षात घेवून नियमितपणे लिखाणाचा सराव करायला हवा. लेखन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे कारण यूपीएससी मुख्य परीक्षेचा तो पाया आहे.

sushilbari10@gmail.com