व्यक्तिमत्त्व चाचणी हा नागरी सेवा परीक्षेचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. ही लेखमाला जानेवारी २०२५ मध्ये सुरू झाली तेव्हा नागरी सेवा परीक्षा २०२४ च्या व्यक्तिमत्त्व चाचण्या सुरू होत्या आणि आता लेखमाला संपते आहे तेव्हा २०२५ च्या व्यक्तिमत्त्व चाचण्या सुरू आहेत. एका अर्थाने एक वर्तुळ यानिमित्ताने पूर्ण झाले आहे आणि तुम्हा वाचकांच्या प्रतिसादाने आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२५ च्या व्यक्तिमत्त्व चाचण्यांचा पहिला टप्पा पार पडला आहे आणि दुसरा टप्पा २०२६ साली ५ जानेवारी पासून सुरू होत आहे. गेले वर्षभर महेश मुरलीधर भागवत (IPS) आणि सुप्रिया देवस्थळी (ICAS) आम्ही दोघांनी या व्यक्तिमत्त्व चाचणीबद्दल मार्गदर्शन करणारी दर गुरुवारी प्रकाशित होत असलेली लेखमाला लिहिली. ही लेखमाला जानेवारी २०२५ मध्ये सुरू झाली तेव्हा नागरी सेवा परीक्षा २०२४ च्या व्यक्तिमत्त्व चाचण्या सुरू होत्या आणि आता लेखमाला संपते आहे तेव्हा २०२५ च्या व्यक्तिमत्त्व चाचण्या सुरू आहेत. एका अर्थाने एक वर्तुळ यानिमित्ताने पूर्ण झाले आहे आणि तुम्हा वाचकांच्या प्रतिसादाने आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

या लेखमालेत आम्ही व्यक्तिमत्त्व चाचणीचा मुख्य आधार असणारा डीटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म कसा भरावा इथपासून ते डीटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीविषयी कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात इथपर्यंत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. या फॉर्ममध्ये उमेदवाराचे नाव, जन्म तारीख, राहते गाव, आई वडील काय करतात, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी वा व्यवसाय व शेती, छंद, नेतृत्व गुण, पारितोषिक, खेळ इत्यादी विषय असतात. या फॉर्ममध्ये सर्व्हिसचे आणि काडरचे प्रेफरन्स कसे द्यावेत याबद्दलही आम्ही मार्गदर्शन केले आहे.

व्यक्तिमत्त्व चाचणी हा नागरी सेवा परीक्षेचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर आल्यावर अंतिम यशाची शक्यता ही इतर कुठच्याही टप्प्यापेक्षा जास्त असते. प्रत्येक ३ उमेदवारांमधून १ उमेदवार निश्चितच निवडला जातो. या आधीचे दोन्ही टप्पे लेखी स्वरुपाचे असतात पण व्यक्तिमत्त्व चाचणीच्या माध्यमातून उमेदवाराला प्रथमच संघ लोकसेवा आयोगाच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळते. आणि या संधीचा सदुपयोग उमेदवारांनी कसा करावा हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या लेखमालेतून केला आहे.

प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आदल्या दिवशी आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या दिवशी काय खबरदारी घ्यावी याबद्दलही सविस्तर लेखन आम्ही केले आहे. कपडे कशाप्रकारचे घालावेत, बोर्डाच्या सदस्यांशी कसे वागावे याबद्दलच्या टिप्स आम्ही आमच्या लेखांमधून दिल्या आहेत.

स्पर्धा परीक्षा या चाळणी परीक्षा असतात. बहुतेक उमेदवार गळणार आणि मोजकेच उमेदवार यशाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहचणार. त्यामुळे उमेदवारांनी ‘प्लान बी’ सुद्धा तयार ठेवणे आवश्यक असते. स्पर्धा परीक्षांच्या मागे आयुष्यातील मौल्यवान वर्ष निघून जाऊ शकतात त्यामुळे ‘प्लान बी’कडे केव्हा वळायचं याचाही विचार उमेदवारांनी करून ठेवणे गरजेचे असते.

या लेखमालेच्या निमित्ताने अनेक उमेदवारांशी आमचा संपर्क आला. डिसेंबरमध्ये ज्या उमेदवारांच्या मुलाखती झाल्या त्यांनी त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नांबद्दल आम्हाला आवर्जून माहिती दिली. अनेक वाचकांनी आमच्या लेखांवरच्या प्रतिक्रिया आम्हाला विविध माध्यमांमधून कळवल्या. हा सगळा अनुभव आम्हाला समृद्ध करणारा होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांनी परीक्षाभिमुख, स्मार्ट वर्क तयारीच त्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी कामी येणार आहे हे विसरता कामा नये. नागरी सेवा तसेच इतर स्पर्धा परीक्षांमधून प्रशासनात प्रवेश करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवाराना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा.