मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. सारं खरच छान चालले असले, तरी पायलट बनण्याच्या हट्टा पायी घर आणि देश तुटला हेच खरे. शिवाय बेकार असणाऱ्या कमर्शियल पायलटची आकडेवारी लक्षात घेतल्यावर जाणवले ते म्हणजे हे क्षेत्र ‘दुरुन डोंगर साजरे’ असेच आहे. आपला अनुभव सांगितला आहे, एका कमर्शिअल पायलटने.
फ्रँकफर्टला उतरून आमच्या टीम बरोबर मी एका हॉटेलमध्ये चेक इन करत असताना मागून हाक आली, ‘अरे मॅडी तू इथे काय करतोयस? आणि हा युनिफॉर्म कोणता? अरेच्या याच्यावर लोगो तर एमिरेट्सचा आहे.’ मी फक्त लांब निश्वास टाकला. आनंदाची एकच गोष्ट होती. ती म्हणजे तो चेक आउट करून बाहेर पडत होता त्यामुळे दोन मिनिटात ‘हाय’, ‘हॅलो’ पलीकडे गप्पा गेल्या नाहीत. पण माझ्या जखमेवरची खपली मात्र निघाली.
आठवणींचे मोहोळ उठले
शाळेतले माझ नाव माधव जगताप. भेटलेला माझा शाळकरी मित्र माझ्या शाळेपासूनच्या स्वप्नामुळे पडलेल्या ‘मॅडी’ या टोपण नावानेच मला ओळखत होता. वडील राहुरीच्या कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत, तर आई विद्यापीठातील प्रशासन विभागात नोकरीला होती. मी हायस्कूलमध्ये प्रवेश करत असताना वडिलांना ऑस्ट्रेलियातील एका कृषी संशोधन प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळाली व वर्षभर ते तिकडेच होते. त्यांना ‘बाय’ करण्याच्या निमित्ताने व परतल्यावर स्वागत करण्याकरिता मुंबईतील सहारच्या भव्य विमानतळावर जाण्याची मला पहिल्यांदा वेळ आली. प्रकल्प संपवून परत आल्यानंतर शिल्लक राहिलेल्या डॉलरच्या पुंजीतून आमच्या चौघांची काश्मीरची विमानाने ट्रीप झाली. मुंबई ते दिल्ली व श्रीनगरहून परत अशा साऱ्या विमानतळांकडे बघून माझे स्वप्न सुरू झाले पायलट बनण्याचे.
धाकटा भाऊ दत्ता अतिशय हुशार, बहुदा वडिलांवर गेला असावा. माझी गाडी ७० टक्क्यांवर कायमच रेंगाळत असे. वडिलांनी तसे सुचवलेही होते की तू कॉमर्सला जा. पण कमर्शियल पायलट होण्याकरिता बारावी सायन्सची गरज असते ही माहिती काढून झाली होती. अकरावी सायन्स झाल्यानंतर घरात हे सांगितले तेव्हा आई-वडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट काळजी दिसली होती. बारावी निम्मी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा माझ्या मार्कांचा आवाका लक्षात आला आणि गाडी ५५ च्या पलीकडे जाणार नाही हे कळले तेव्हा माझा हट्ट वाढला आणि त्याचबरोबर वडिलांची काळजीही वाढत गेली. बारावीची परीक्षा संपली तेव्हा आई-वडिलांनी मला समोर बसवून सुमारे एक तासभर कमर्शियल पायलट बनण्यातील अडचणींचा पाढा वाचून दाखवला. सगळ्या गोष्टी मी मान्य करत होतो. मला न आवडणारे व न कळणारे गणित सुद्धा मी जास्त अभ्यास करून शिकेन असे त्यांना उलट सांगितले. पण वडील पुन्हा पुन्हा यासाठी येणारा खर्च आडून आडून सांगत होते, सुचवत होते तो माझ्या डोक्यातच शिरत नव्हता.
बाल हट्ट, राज हट्ट, आणि स्त्री हट्ट यापुढे काही चालत नाही असे म्हणतात ते आमच्या घरात शब्दश: खरं ठरलं. ‘‘माधव म्हणतोय एवढं तर आपण त्याला पाठवू ना? नाहीतरी मराठी पायलट कुठे सापडतात? अहो पैसे पैसे काय करताय तुम्ही, त्याला एकदा नोकरी लागली की तो तुम्हाला पैशाच्या गादीवर झोपवेल. तुमच्या वर्षाच्या पगाराएवढा पायलटचा एका महिन्याचा पगार असतो माहीत नाही का तुम्हाला?’’ असा सारा आईचा शाब्दिक तोफांचा भडीमार आणि मला दुसरं काही शिकायची इच्छा नाही असा माझा ‘मॅड’ हट्ट यापुढे बाबांचा बुरूज कोसळत गेला. खरे तर कोर्सला लागणारी फी व त्याचा आवाका मला कळण्याच्या पलीकडे होता. त्या वयात स्वत:च्या इच्छेपलीकडे दुसरे काही दिसत नाही एवढेच खरे.
माझी बारावी संपली व भारतातील विविध उडान अकॅडमीमध्ये प्रवेशाकरता मी अर्ज केले, पण कुठूनही त्याला होकारार्थी उत्तर आले नाही. कारण माझे बारावीचे दिवटे मार्क. इथे बाबांची ऑस्ट्रेलियाची ट्रिप उपयोगी पडली. तिथे झालेल्या जुन्या संपर्कातून तिथल्या एका फ्लाइंग स्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला. साउथ एशिया रिजनमधलीच बहुतेक पोरे माझ्याबरोबर होती. एक-दोन बड्या बापाच्या दिल्लीत राहणाऱ्या मुलीही होत्या. पाहता पाहता प्रथम पीपीएलची परीक्षा पार पडली आणि आमचे कमर्शियलचे ट्रेनिंग सुरू झाले. गणित कच्चे असल्याचा फटका मला तिथेच बसला आणि सीपीएलमध्ये माझी चक्क दांडी उडली. माझे दांडी उडण्याची दु:ख आणि बाबांना पुन्हा फी पाठवायला लागण्याचा धसका पाहून कधी नव्हे ती आईने बाजू बदलली. एव्हाना बाबांनी कर्ज काढून उभे केलेले साठ लाख रुपये संपलेले होते. धाकट्या भावाचे इंजिनीअरिंगचे शिक्षण सुरू झाले होते. त्याची फी उभी करताना त्यांना त्रास झाला नाही. कारण तो हुशार असल्यामुळे त्याला कॉलेजने स्कॉलरशिप दिली होती. ती मिळाली नसती तर त्याचे इंजिनीअरिंग अडले असते हे नक्की.
दुसऱ्या प्रयत्नात मला कमर्शियल पायलटचे लायसन्स मिळाले. पण खूप प्रयत्न करून, सहा महिने राहूनसुद्धा ऑस्ट्रेलियात नोकरी मिळाली नाही. नोकरी नसल्यामुळे राहण्याचा परवानाही रद्द झाला व मी भारतात परत आलो. माझ्या बॅचपैकी फक्त तीन जणांना नोकरी लागल्याचे भारतात आल्यावर कळले. बऱ्याच मुलांनी बीएससीला प्रवेश घेऊन पुन्हा शिक्षण सुरू केले, तर काहींनी वडिलांच्या धंद्यात लक्ष घालायला सुरुवात केली होती. माझी इतर काही न शिकण्याची जिद्द आणि बालिश हट्ट अजूनही कायम होता. एव्हाना काढलेल्या कर्जाचे हप्ते फेडताना वडिलांना नाकीनऊ येऊन त्यांनी एक कठोर निर्णय घेतला. गहाण ठेवलेले राहते घर विकून टाकले व कर्ज संपवले. विद्यापीठाच्या आवारातच त्यांना दिलेल्या भाड्याच्या घरात आई-वडील राहायला गेले. नोकरीची आठ वर्षे अजून बाकी असल्यामुळे तेवढा काळ तरी त्यांना त्यातून सुटकेचा मार्ग सापडला होता.
दरम्यान, पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करणाऱ्या एका कंपनीला पायलट पाहिजे होता असे मला कळले. दैव योगाने नोकरी मिळाली. राहण्याची सोय झाली. पण पगार सांगायला लाज वाटावी एवढाच होता. त्या कंपनीने मला पाच वर्षे संभाळले. महत्त्वाचा फायदा म्हणजे माझा फ्लाईंग अवर्सचा अनुभव वाढत गेला. पायलट लायसन्स मिळाल्यानंतर स्वत: पेट्रोलचा खर्च करून हा अनुभव घ्यावा लागतो.
शोध, धडपड, निराशा
या दरम्यान वर्षातून एकदा घरी जाणे, महिन्यातून एकदा मी फोन केल्यास आईने तोंड देखली चौकशी करणे या पलीकडे घराचा संपर्क राहिला नव्हता. बाबांशी बोलण्याची माझी हिम्मत कधीच संपली होती. माझ्या सुदैवाने अनेक युरोपियन पायलटनी पगारापोटी दिलेल्या राजीनाम्यानंतर मला नवीन सुरू झालेल्या एका भारतीय लो कॉस्ट एअर कंपनीत नोकरी मिळाली. पण काही वर्षे गेल्यावर दुर्दैवाने ती कंपनीच बंद पडली. पण आता माझ्याकडे पुरेसा फ्लाईंग एक्सपिरीयन्स होता. त्या जोरावर सध्याच्या एमिरेटस कंपनीत माझा शिरकाव झाला आणि भारताचे उरले सुरले धागे तुटले.
सहा महिने झाल्यानंतर मी बाबांना फोन करून घरी गेलो. सहा महिन्यात बाजूला पडलेल्या दहा लाख रुपयाचा चेक बाबांचे समोर ठेवला. खाली वाकून त्यांना नमस्कार करणार तेवढ्यात त्यांनी तो दोन्ही हातानी फाडून, टरकावून त्याचे सहा तुकडे माझे हाती दिले… ‘माझे पेन्शन मला पुरेसे आहे. आईला धाकटा दत्ता पैसे पाठवतो ते तिला पुरतात. तुझे छान चालले आहे हा आनंद आम्हाला खूप झाला.’
माझे सारं खरच छान चालले असले, तरी पायलट बनण्याच्या हट्टा पायी घर आणि देश तुटला हेच खरे. नुकताच एका हवाई क्षेत्रातील जाणकाराकडून आकडा ऐकला की भारतामध्ये सध्या दहा हजार कमर्शियल पायलट अनुभव नाही म्हणून नोकरी विना बेकार आहेत. यामुळे माझ्या फ्लाईटमध्ये तरुण मुले किंवा त्यांचे आईबाप मला विचारतात याला पायलट व्हायचे आहे तेव्हा मी निरुत्तर होतो.
(क्रमश:)