श्रीराम गीतमुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. इंजिनीअर झालेल्या मुलाने लोको पायलट होणं त्याच्या आईला कुठेतरी खटकत होतं. मात्र, त्यातील आव्हानं, जोखीम लक्षात आल्यानंतर आईची नाराजी दूर होऊन त्याची जागा कौतुकाने घेतली. माझा जन्म घाटकोपरचा. शिक्षण तिथेच झालं. हाती पदवी येण्याच्या आतच लग्न झालं आणि मी कुर्ल्याला राहायला आले. मुंबई, लोकल आणि रेल्वे या तिन्हीची लहानपणापासून माहिती असली तरी रात्रंदिवस लोकलचा आवाज ऐकलाय तो कुर्ल्याला आल्यावरच. स्टेशनला लागूनच असलेली आमची चाळ. तिसरा मजला आणि हवेशीर जागा. हळूहळू रेल्वेच्या खडखडाटाची सवय इतकी झाली की त्याच्या तालावरच रोजची कामे होऊ लागली. यांची मंत्रालयात सरकारी नोकरी त्यामुळे जायला यायला अगदीच सोयीचं. आम्हाला एकच मुलगा. चाळीतील मित्रमंडळीत रमलेला मुलगा बाल्कनीमध्ये बसून रेल्वे गाड्या मोजण्यात रमलेला असे. तसा तो फारसा बोलका नव्हता पण जेव्हा बोलायचं तेव्हा समोर दिसणाऱ्या रेल्वेचा संदर्भ नक्की यायचा. सगळ्याच पोरांना गाड्या, रेल्वे, विमाने यांचं वेड असतं. त्यातीलच हे म्हणून मी कायम दुर्लक्ष करत असे. त्याचे बाबा सकाळी नऊला घरातून बाहेर पडत ते रात्री आठलाच परत येत असत. सरकारी नोकरीत असल्यामुळे मुलाने व्यवस्थित अभ्यास करावा व सरकारी खात्यात कुठेतरी चिकटावे असे त्यांचे मत. या उलट मुलाने चांगले शिकावे इंजिनीअर बनावे आणि जमले तर मुंबई सोडून किंवा परदेशात छान नोकरी करावी असे स्वप्न माझे. सुदैवाने प्राथमिक शाळा संपल्यानंतर दुसऱ्या शाळेत पण स्टेशन ओलांडून पलीकडे मुलाचा प्रवेश झाला. शाळा बारा ते साडेपाच दरम्यान असे. पण तो साडेदहालाच घराबाहेर पडत असे. इतक्या लवकर कुठे जातोस असे त्याला दिवसाआड मी विचारत असे. शाळेत जाऊन मित्रांबरोबर खेळतो किंवा ग्रंथालयात वाचत बसतो असे त्याचे ठरावीक उत्तर असे. शाळा सुटल्यावर सुद्धा तो वेळेत घरी परत आला असे क्वचितच घडले. चाळीतील त्याच्या वर्गात किंवा बरोबर कोणी नसल्यामुळे मित्रांकडून काही माहिती मिळणेही कठीण होते. सातवीतून आठवीत जात असताना त्याच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील दोन मित्र घरी आले होते. त्यांच्या कुजबुजत बोलण्याच्या आवाजातून सतत ते ड्रायव्हरचा वाढदिवस, ड्रायव्हरने घरी बोलावले, ड्रायव्हरला काय आवडते असे बोलत होते. मुलांना खायला देत असताना मी त्यातील एकाला विचारले, ‘कोण रे ड्रायव्हर?’ दोघेही हसले आणि त्यांनी माझ्या लेकाकडे बोट दाखवले. रिक्षा, टॅक्सी, ट्रक,बस या पलीकडे डोक्यात विचार न येणारी मी मुलाला खोदून विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले मी रेल्वे इंजिनाचा ड्रायव्हर बनणार आहे. त्याचे शिकणे त्याने काम करणे त्याची नोकरी या साऱ्या माझ्या मनातील स्वप्नांवर त्या क्षणी अक्षरश: पाणी फिरले होते. संध्याकाळी वडील घरी आल्यानंतर हा सगळा प्रकार त्यांचे कानावर घातला. त्यांनी तो हसण्यावारी नेऊन मला सांगितले असते एकेका वयातील खूळ. कॉलेजला जाईल तेव्हा त्याला कळेल. लहान आहे तो. तू कशाला अस्वस्थ होतेस? माझी अपेक्षा अशी होती की त्याच्याशी ते बोलतील त्याचे कान उघाडणी करतील व डोक्यातील विषय बाजूला काढण्याकरता प्रयत्न करतील. तसे काहीच न घडता वाढदिवसाच्या करता आणलेली भेट त्याच्या हातात देऊन त्यांनी त्याला बजावले नीट अभ्यास कर चांगले मार्क मिळवून मोठ्या कॉलेजात शिकायला जा. खरे तर मला मुलाचा जितका राग आला होता त्यापेक्षा जास्त राग माझ्या नवऱ्याचा आला होता. घरात तीनच माणसे असताना दोघांवर राग धरून कसे चालेल? त्यातही दोघेजण दिवसभर बाहेर असल्यामुळे माझ्या डोक्याचा विचारांनी भुगा झाला होता. पण नंतर मुलाने रेल्वे हा विषय माझ्याकडे कधीच काढला नाही आणि माझा राग हळूहळू निवळत गेला. शाळा संपली. दहावीला ६२ टक्के मार्क मिळवून पास झाला. फर्स्ट क्लास मिळाल्याचा आनंद तिघांनाही झाला होता. तो आम्ही मंत्रालया जवळच्या एका हॉटेलमध्ये साजराही केला. त्यानिमित्त फास्ट लोकलने आम्ही सीएसटीला पोहोचलो. जाताना त्याने एक वाक्य उच्चारले, मुंबईतील लोकल चालवणे हे खूप कठीण काम असते आणि जोखमीचे असते. त्या मानाने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या ड्रायव्हरचे काम खूप साधे वाटते. हे अचानक तो काय बोलतो आहे याचा संदर्भ मला लागलाही नाही. पण त्याने डिप्लोमाला प्रवेश घेणार आहे हे जेवताना सांगितले ते ऐकून मला बरे वाटले. डिप्लोमा पासून सुरुवात करून का होईना मुलगा इंजिनीअर होणार, चांगल्या नोकरीत जाणार याची माझी खात्री पटली होती. कधी नव्हे ते पहिल्या वर्षी त्याला ७० टक्के मार्क मिळाले. ते टिकवून तीन वर्षात त्याच्या हातात इंजिनीअरिंगची पदविका आली. पुढे पदवी शिक्षण घ्यायचे का दोन वर्ष नोकरी बघायची अशी आमच्या दोघांच्या मनात चर्चा चालू असताना पुन्हा एकदा मुलाने लोकलचा कर्कश्य भोंगा वाजतो तसेच काहीसे सांगून टाकले की मी लोको पायलटची परीक्षा देणार आहे. माझा अन्य नोकरीचा विचार नाही. आता मात्र माझा संयम पूर्ण सुटला होता आणि मी मुलाशी पूर्ण अबोला धरला. चाळीतील इतर शेजारी, नातेवाईक मंडळी मुलगा इंजिनीअर झाला सध्या काय करतो म्हणून जेव्हा विचारत तेव्हा माझी बोलती बंद होत असे. खरंतर असं व्हायचं काही कारण नव्हतं कारण तो रितसर सरकारी नोकरीत जाणार होता हेही मला आतून कळत होते. पण ड्रायव्हर हा शब्द कुठेतरी सतत मनात खटकत असे. हे काम जोखमीचे आहे कठीण आहे त्यासाठीचे प्रशिक्षण खूप कठीण असते हे सारे कळायचे होते. नंतर हळूहळू कळत गेले आणि मुलगा नेमका काय स्वरूपाची काम करणार आहे याचा उलगडाही होत गेला. सुदैव आणि मुलाचा मनाचा चांगुलपणा असा की या साऱ्या गोष्टी मागे टाकून त्याने आम्हाला आश्चर्याचा धक्काच दिला. नोकरीची दोन वर्षे पूर्ण झाल्यावर त्याने संपूर्ण उत्तर भारताचे राउंड ट्रीपचे एसी बोगीचे रिझर्वेशन करत असल्याचे सांगून बाबांना रजेचा अर्ज टाकण्याची जवळपास आज्ञाच दिली. या पद्धतीचा प्रवास करण्याचे स्वप्नही आम्ही दोघांनी कधी पाहिले नव्हते ते आता मुलामुळे प्रत्यक्षात येत होते. मुले कोणकोणती स्वप्ने बघतात व ती कशी प्रत्यक्षात आणतात तो सारा चमत्कार माझ्या घरातच घडला होता.