आर्टस, काॅमर्स , सायन्स पासून ते इंजिनिअरिंग, फार्मसी , ऍग्रिकल्चर पर्यंत कोणत्याही शाखेतील पदवीनंतर एमबीए करण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. महाराष्ट्रातील सरकारी , विद्यापीठाच्या अंतर्गत संस्था तसेच विनाअनुदानित संस्थांमध्ये प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे सीईटी परीक्षा घेतली जाते. मुंबई, पुणे,नाशिक , नागपूर , अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगांव , कोल्हापूर , नांदेड, सोलापूर, यवतमाळ,ठाणे सह अनेक शहरांमध्ये

ही परीक्षा यंदा मार्च / एप्रिल महिन्यात घेतली जाईल. परीक्षा काॅम्प्युटरवर असेल. अडीच तासांच्या या परीक्षेत चार सेक्शन्स असतील. एक सेक्शन क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड वर असेल ज्यामध्ये पन्नास मार्कांसाठी पन्नास प्रश्न असतील. दुसरा सेक्शन लाॅजिकल रिझनिंग वर असेल ज्यामध्ये पंचाहत्तर मार्कांसाठी पंचाहत्तर प्रश्न असतील तर तिसरा सेक्शन व्हर्बल ऍबिलिटी व लॅंग्वेज काॅम्प्रिहेन्शन वर असेल ज्यामध्ये पन्नास मार्कांसाठी पन्नास प्रश्न असतील. चौथा सेक्शन ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग चा असेल ज्यामध्ये पंचवीस मार्कांसाठी पंचवीस प्रश्न असतील. प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण मिळेल तर चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

विद्यार्थ्यांना ही परीक्षा जास्तीत जास्त दोनदा देता येऊ शकते आणि त्याचा स्कोअर महाराष्ट्र सीईटी सेल च्या संकेतस्थळावर जाहीर केला जाईल. जे विद्यार्थी दोनदा परीक्षा देतील त्यांना दोनपैकी ज्या परीक्षेत जास्ती पर्सेंटाइल मार्क असतील ते मार्क प्रवेश प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत. काठीण्य पातळीवर “कॅट” परीक्षेएवढी ही परीक्षा अवघड नसली तरी भरपूर विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याने उत्तम यशासाठी कठोर परिश्रम आणि कसून सराव आवश्यक आहे. या परीक्षेच्या निकालानंतर या परीक्षेतील मार्कांवर विद्यार्थ्यांना कॅप राऊंड मधून प्रवेश मिळेल.

विद्यार्थ्यांचा संस्थेचा पसंतीक्रम आणि मार्क यांची सांगड घालून संस्था प्रवेश निश्चित होईल. कॅप राऊंडमधून अर्ज करण्याआधी विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, आर्थिक मागास प्रमाणपत्र, नाॅन क्रिमी लेअर प्रमाणपत्र ( ३१/०३/२०२७ पर्यंत वैध असलेले) मिळवून ठेवणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्डावरील तसेच अपार कार्डावरील सर्व तपशील बरोबर आहे की नाही ते तपासणे आवश्यक आहे. यंदा पदवीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या सीईटी साठी अर्ज करता येईल मात्र प्रवेशाचे वेळी पदवी परीक्षा किमान पन्नास टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल. या सीईटी परीक्षेसाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने http://www.mahacet.org या संकेतस्थळावर १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत भरता येतील.

एमबीए करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या गोष्टी:

१) अशा एमबीए संस्थेमध्ये प्रवेश मिळवला पाहिजे की ज्यांच्याकडे भरपूर कंपन्या कॅम्पस प्लेसमेंट साठी येतात. आणि गेल्या ४-५ वर्षांचे प्लेसमेंट रेकाॅर्ड उत्तम आहे.
२) यामध्ये किती टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली याबरोबरच कमीतकमी पगार / सरासरी पगार / जास्तीत जास्त पगार यांची माहिती मिळवणे गरजेचे आहे.
३) ज्या संस्था विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या चांगल्या संधी उपलब्ध करुन देतात त्यांना पसंती देणं आवश्यक आहे.
४) अशा एमबीए संस्थांमध्ये प्रवेश हवा असेल तर एमबीए प्रवेश परीक्षे मध्ये उत्तम कामगिरी करणे अत्यावश्यक आहे.
५) यासाठीची तयारी तातडीने सुरु करणे आवश्यक आहे.
६) एमबीए मध्ये फायनान्स, मार्केटिंग, एच आर अशा पारंपरिक शाखांबरोबरच आता डिजिटल मार्केटिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट, आय टी मॅनेजमेंट, हेल्थकेअर मॅनेजमेंट, फार्मास्युटिकल मॅनेजमेंट, ऍग्रिकल्चर मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिझिनेस अशा अनेक शाखा उपलब्ध झाल्या आहेत. या शाखांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी पसंती अर्ज भरणे आवश्यक आहे.
७) एमबीए नंतर कॅंपस प्लेसमेंट मधून नोकरीच्या चांगल्या संधी मिळण्यासाठी एमबीए ची दोन वर्षे विद्यार्थ्यांनी लेखी आणि मौखिक इंग्रजी भाषेचं कौशल्य वाढवणे अत्यंत आवश्यक आहे तसेच कॅंपस प्लेसमेंट मध्ये बरेचदा ग्रूप डिस्कशन ची महत्वाची पायरी असते त्यासाठी बिझिनेस/ अर्थशास्त्र , चालू घडामोडी यांचं भरपूर वाचन करणे गरजेचे आहे तसेच किमान एक वर्ष छोट्या छोट्या गटांमध्ये ग्रुप डिस्कशन चा भरपूर सराव करणे आवश्यक आहे. तसेच विविध सेमिनार/ सिम्पोझियम मध्ये सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे.