सलील चिंचोरे
गुगल मॅप नव्हते तेव्हाचे दिवस आठवा. आपण लांबच्या प्रवासाला निघालेलो असतो. अंतिम मुक्कामाचे ठिकाण ठाऊक असते पण तिथे नेणारा रस्ता अनोळखी असतो. बराच वेळ रस्त्यातील गर्दीशी सामना करत आपण गजबजलेल्या चौकात येऊन थांबतो. तेथून रस्त्याला वेगवेगळ्या वाटा फुटलेल्या असतात. गाडीतील पेट्रोलही अर्ध्यावर आलेले असते. आता पुढे जायचे कुठे व कसे? 15-20 वर्ष नोकरीमध्ये घालवल्यावर बऱ्याच जणांना अशी भावना साहजिकपणे येते. एवढा प्रवास केल्यानंतर “आता काम करण्यात उत्साह वाटत नाही”, “करियरमध्ये एकाच ठिकाणी अडकलो आहे”, “स्वप्नांची तडजोड करून आला दिवस घालवतोय”, “पुढे काय करायचे हे कळत नाहीये” अशा प्रातिनिधिक भावना सहकारी मित्र मैत्रिणी व्यक्त करताना दिसतात. काहीजण याला ‘मिडलाइफ क्रायसिस’ म्हणतात.

या टप्प्यातील करियरची आव्हाने तरुणपणाच्या प्रश्नांपेक्षा अधिक अवघड असतात. भरपूर कष्ट घेऊन कंपनीमध्ये स्वतःला सिद्ध केलेले असते. त्याचबरोबर आपल्याला काय जमते व काय नाही याची जाणीवही झालेली असते. त्यामुळे तरुणपणात आकाशात भरारी मारणारी स्वप्ने आता वास्तवाच्या फांदीवर येऊन टेकतात. 15-20 वर्षे काम केल्याने एका क्षेत्रात चांगला जम बसलेला असतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या, कर्जाचा भार यांनी खांदा जड झालेला असतो. तब्येतीच्या कुरबुरी मान वर काढू लागतात. आज-काल करिअरचा पल्ला फारच मोठा म्हणजे वयाच्या 65-70 पर्यंत गेला आहे. पण चाळिशीतच धाप लागू लागते आणि मनाचा गोंधळ उडतो. त्यातच कंपनीमध्ये तरुण सहकारी तंत्रज्ञान प्रवीण असल्याने झपाझप पुढे जात असतात. कंपनीमधील वरिष्ठ स्तरांमधील प्रमोशनच्या संधी कमी होत जातात. काही कंपन्यांमध्ये एआयमुळे मोठ्या प्रमाणावर कंपनीत पुनर्रचना होत आहे. अशा सगळ्या गदारोळात करिअरची पुर्नमांडणी कशी करावी?

करिअरच्या मधल्या टप्प्यात पुढच्या इनिंगची बांधणी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. पहिला मुद्दा म्हणजे तुमची जोखीम घेण्याची कितपत तयारी आहे? तुमच्यावर अन्य जबाबदाऱ्या असल्यास नवीन नोकरी, नवीन क्षेत्र शोधण्याचा धोका पत्करण्याची तयारी कमी होते. याउलट तुमची आर्थिक तरतूद भक्कम असल्यास तुम्हाला नवीन संधी निवडण्यास तुलनेने सोपे जाते. दुसरे म्हणजे यापुढील करियर निवडताना एखाद्या क्षेत्रात तुम्हाला प्रभुत्व मिळेल अशा तऱ्हेचा करिअरचा पोर्टफोलिओ तयार करण्यावर भर द्या. तुम्ही एखाद्या विषयात तज्ञ असल्यास आउटसोर्सिंग, एआय यांचा परिणाम होण्याची शक्यता कमी होते. नोकरीतून सहा-आठ महिन्याची आर्थिक बचत करून नोकरीऐवजी स्वतःचे कन्सल्टिंग करनारे अनेक जण आहेत. हा मुद्दा पहिल्या मुद्द्याशी ही संलग्न आहे. एखाद्या विषयात तुम्ही तज्ञ असल्यास तुम्ही नोकरीऐवजी स्वतःची कन्सल्टिंग चालू केल्यास चांगले यश मिळू शकते. नोकरीतून कन्सल्टिंगमध्ये प्रवेश करण्याआधी थोडेफार छोटे प्रोजेक्ट करून पहा. इतर जाणकार व्यक्तींकडून आर्थिक, कायदेशीर आर्थिक कायदेशीर बाबी मार्गदर्शन घ्या. यातून व्यवसायाच्या खाचा खोचा कळून येतील. तिसरा मुद्दा म्हणजे यापुढे कंपनीत केवळ उच्च पद किंवा हुद्दा (टायटल) याच्यामागे जाण्याऐवजी तुम्हाला आवडेल आणि कंपनीतर्फे तुम्हाला हवे तसे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळेल अशा कामाला प्राधान्य द्या. आकर्षक हुद्दा असूनही जर मनासारखे काम करण्याचे स्वातंत्र्य नसेल तर आपण वैतागून जातो. एका अर्थाने या टप्प्यात यशाची व्याख्या नव्याने लिहावी लागते. चौथा मुद्दा म्हणजे जर नोकरी बदल करायचा नसेल तर सद्य कंपनीमध्ये महत्त्वाचे प्रश्न कौशल्याने सोडवणारा तज्ञ अशा भूमिकेकडे वाटचाल करा. त्यासाठी लागणारे कोर्सेस करा, विषयाची खोली वाढवा, लीडरशिप स्किल्स आत्मसात करा.

करिअरच्या पहिला टप्प्यामध्ये स्वतःला सिद्ध करणे, अर्थार्जन, क्षेत्रातील बारकावे शिकून घेणे अशा गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करतो. करियरचा दुसरा टप्पा स्वतःची खास ओळख निर्माण करणे, कामातून स्वानंद मिळवणे यासाठी राखून ठेवा. शिवाय आता या टप्प्यामध्ये दुसऱ्यांवर लक्ष द्या. सामाजिक बांधिलकी, तरुण पिढीला मार्गदर्शन, कंपनीमध्ये नव्या फळीची उभारणी यातून आपल्या जीवनाला छानसा नवा अर्थ प्राप्त होतो.

अशा तऱ्हेने दुसऱ्या इनिंगची विचारपूर्वक मांडणी केल्यास आयुष्याला चांगली दिशा आणि साफल्य मिळू शकते.