जैवविविधता, पर्यावरण आणि सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन हे विषय मानवी अस्तित्वासाठी व सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्यामुळे त्या दृष्टीने त्यांचा सामान्य अध्ययन पेपर तीनमध्ये समावेश केलेला आहे हे समजून घेऊन त्यांची तयारी करायची आहे. मागील लेखामध्ये आपण आपत्ती या घटकाची संकल्पनात्मक तयारी कशी करावी ते पाहिले. या लेखामध्ये विश्लेषणात्मक तयारी कशी करावी ते पाहू.

आपत्ती व्यवस्थापनाची संस्थात्मक रचना

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे कार्यक्षेत्र, त्यांच्या जबाबदा-या, भूमिका, असल्यास मर्यादा, आव्हाने, उपाययोजना अशा मुद्यांच्या आधारे त्यांचेबाबत समज विकसित करायला हवी. या यंत्रणांमध्ये समन्वय कसा साधला जातो, जबाबदारी व अधिकारांचे विभाजन कसे आहे हे व्यवस्थित समजून घ्यायला हवे. घटना प्रतिसाद यंत्रणा Incident Response System (IRS),, आपात्कालीन मोहीम केंद्रे Emergency Operation Centres आणि नियंत्रण कक्षांच्या भूमिकेचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यांची भूमिका आणि उपयुक्तता हे मुद्दे विशेष करुन महत्वाचे आहेत. भारतातील आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सुचनांमधील महत्वाच्या तरतूदी माहित असायला हव्यात.

आपत्ती जोखीम लवचिकपणा (Disaster Resilience)

आपत्ती जोखीम लवचिकपणा ही संकल्पना मागील लेखाम्ध्ये उदाहरणासहीत समजून घेतली आहे. या संकल्पनेमध्ये समाविष्ट होणा-या बाबींचे महत्व समजून घेऊन त्यांच्या उपयुक्तता आणि आपत्ती जोखीम निवारणामध्ये तसेच जनजीवन पूर्ववत होण्यामधील त्यांची भूमिका व्यवस्थित समजून घ्यायला हवी. वेगवेगळ्या आपत्तींबाबत काही विशेष क्षामता निर्मिती, उपाययोजना आवश्यक ठरतात. अशा उपायांच्या टेबलमध्ये नोट्स काधून उत्तर लेखनासाठी मुद्दे तयार करता येतील. आपत्ती लवचिकपणामध्ये समाविष्ट लवचिक पायाभूत सुविधा, हवामान-लवचिक शेती, आपत्ती प्रतिरोधक इमारती, शाश्वत शहरे, Build Back Better संकल्पना, पूर्वसूचना प्रणाली आणि जोखीम नकाशीकरण या बाबींवर विशेष भर देऊन तयारी करायला हवी.

लवचिक समाज निर्मिती

आपत्ती कालात योग्य पद्धतीने प्रतिसाद देण्याकरता नागरीकांना प्रशिक्षित करणे ही लवचिक समाज निर्मितीच्या संकल्पनेमधील केंद्रीभूत बाब आहे. नागरीकांना योग्य प्रतिसादासाठी तयार करण्यामध्ये स्थानिक समुदायांचा सहभाग, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि युवकांची भूमिका समजून घ्यायला हवी. योग्य प्रतिसाद या मुद्यामध्ये तांत्रिक बाबींबरोबरच सामाजिक समावेशकता आणि दुर्बल घटकांच्या संरक्षणाचाही विचार करायला हवा. हा संपूर्ण मुद्दा सामान्य अध्ययन पेपर चारसाठी केस स्टडीच्या पार्श्वभूमीवर असू शकतो. किंवा एखाद्या प्रश्नाबाबत महत्वाचा आयाम ठरु शकतो. संस्थ्यात्मक रचनेमध्ये ग्राम पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन योजना, जनजागृती आणि नियमित मॉक ड्रिल इत्यादी बाबी विचारात घ्यायला हव्यात.

हवामान बदल आणि आपत्ती

पर्यावरण घटकामध्ये पूर, चक्रीवादळे, उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींचा हवामान बदलाशी असलेला परस्परसंबंध समजून घेतलेला असतोच. आपत्ती जोखीम निवारण आणि लवचिकतेच्या दृष्टीने या मुद्यांबाबत सखोल विचार करुन उपाययोजनांबाबत चिंतन करायला हवे. विशेषतः निसर्गाधारीत उपाययोजना आणि परीसंस्था आधारीत जोखीम निवारणाची संकल्पना उदाहरणांसहीत समजून घ्यायला हवी.

तंत्रज्ञानाची भूमिका

आपत्ती जोखीम निवारण आणि आपत्ती व्यवस्थापन या दोन्हींसाठी दूरसंवेदन, GIS, उपग्रह आधारीत सूचना प्रणाली, ड्रोन, कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट आफ थिंग्ज अशा तंत्रज्ञानाची उपयुक्तता, आवश्यकता, मर्यादा आणि आव्हाने व उपाय हे मुद्दे अभ्यासावेत. तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित करण्यात आलेल्या मोबाईल अलर्ट प्रणाली, डिजिटल नकाशे आणि आपत्कालीन संप्रेषण प्रणालीं यांचा व्यावहारीक वापर कसा होतो ते समजून घेऊन त्याबाबत तयारी करावी.

महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय उपक्रम

सेंदाई फ्रेमवर्क, पॅरीस अग्रीमेंट आणि शाश्वत विकास ध्येये यांच्या तरतूदी, उद्दीष्टे, अंमलबजावनी यंत्रणा, कालावधी व प्रगति, सद्यःस्थिती विशेषतः भारताची भूमिका व सद्यःस्थिती समजून घ्यावी. याबाबत डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो.